

‘आप‘ च्या कार्यकर्त्यांमुळेच कुटुंबात सुखरुप परतले
नागपूर,ता. १२ फेब्रुवरी: लिंबोनी नगर,मेकोसाबाग नागपूर येथील ५५ वर्षीय किरण प्रदीप मानमोठे या ऑगस्ट २०१६ मध्ये वर्षा नागदेवते नावाच्या दलालाच्या आमिषाला बळी पडून आपला पती,मूलगा,सून,नातवंडे यांना सोडून त्याच भागातील इतर १८ ते २० महिलांसोबत सऊदी अरेबियात पोहोचली.भारतातले २७ हजार रुपये म्हणजे सऊदीचे ९०० दीनार एवढा पगार घरकामासाठी दर महिन्याला मिळणार असे त्यांना सांगण्यात आले.सुरवातीला दोन महिने पगार हा नव-याच्या खात्यात बरोबर जमा झाला मात्र त्यानंतर……एक अनन्वित छळाची व माणूसकीला लाजवणारी छळकथा त्यांच्यासोबत सुरु झाली.नुकतेच ‘आप’पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्या सुखरुप आपल्या कुटुंबात परतल्या.
माध्यमांशी आज त्यांनी संवाद साधताना त्यांच्यावर तिथे गुदरलेली कहाणी बयान केली.घराचे कर्ज फेडण्यासाठी तसेच स्वत:चे घर होईल या आशेने त्या दलाल वर्षा यांच्या भूलथापांना बळी पडल्या.ज्या कुटुंबात त्यांना घरकामासाठी ठेवण्यात आले त्या मुख्य मालकीणीचेच एकूण दहा भाऊ-बहीणी होते.यानंतर त्यांचे चुलते,मावस असे मिळून ५० लोकांच्या त्या घरात किरण यांचे अनन्वित हाल होऊ लागले.पहाटे ५ वा.झोपायला मिळायचे तर सकाळी पुन्हा लवकर कामाला त्यांना जुंपल्या जायचं.
पाच वर्षे फक्त खरखटं अन्नावरच जगले!
तेथील प्रथेप्रमाणे आधी घरातील सर्व पुरुष मंडळींची जेवणे व्हायची मग त्याच ताटात घरातील महिला जेवायच्या.यानंतर घरातील लहान मूलांनाही त्याच ताटात जेवायला देत असे.मुले सर्व अन्नाची ताटात भेसळ करुन ठेवत असत.मुलांच्या ताटातील ते भेसळ झालेले अन्न किरण यांच्या वाट्याला यायचं….!
इंडियन्स आर फूल्स!
तुम्ही भारतीय हे एक नंबरचे मूर्ख आहात,घाणेरडे आहात,कुठे कुठे पैसे आणि सोने लपवून आमच्या देशातून नेता असे टोमणे सतत किरण यांना ऐकावे लागत असे.मग भारतीय बाईकडून काम कशाला करुन घेता अशी मुजोरी करताच किरण यांना त्या कुटुंबातील बाया व एक घरगडी जबर मारहाण करायचा…..!
नव-याला लकवा मारला किरण बेखबर!
किरण यांच्या काळजीत नवरा प्रदीप मानमोठे यांना लकवा मारला मात्र किरण यांचे कुटुंबियांशी बोलणेच व्हायचे नाही त्यामुळे नव-याची ही गलितगात्र झालेली स्थिती त्यांना कळलीच नाही. २०१६ ते जानेवारी २०२१ या दरम्यान किरण फक्त चार ते पाच वेळाच आपल्या कुटुंबियांशी बोलू शकल्या.किरण यांनी विद्रोह नाही करावा यासाठी २०१६ पासून फक्त सहा वेळा नव-याच्या बँक खात्यात अधून मधून पैसे जमा करुन तिला रसीद दाखवायचे.
पती प्रदीप आणि सून,नातवंडे व मूलानेही किरण यांना इतक्या दूर देशात जाऊ नकोस म्हणून खूप समजावले होते.एवढेच नव्हे तर शेजार पाजारचेही किरण यांना एवढ्या दूर नका जाऊ म्हणून समाजवत होते मात्र विनाशकाळे विपरित बुद्धी सूचली असे किरण सांगते.मला आपल्या कुटुंबियांच्या सुखासाठी पैसा हवा होता मात्र….सऊदी सारख्या देशात जणू मी आधूनिक काळातील ‘गूलाम’बनले. मला माझं मत नव्हतं,अस्तित्व नव्हतं,जगणं ही नव्हतं….!

[वर्षा नागदेवते]
अडकलेले लाखो रुपये मिळवून देण्यासाठी वर्षा हीच पुन्हा पैसा मागते!
जवळपास ६० महिने काबाडकष्ट केले मात्र हक्काचा पगार सऊदीच्या त्या कुटुंबियांकडून मिळवण्यासाठी वर्षा यांना भारतात आल्यानंतर फोन केला असता,तू काम सोडले आता आधी माझे पैसे फेड नंतरच त्या कुटुंबियांकडून तूझा लाखोंचा पगार वसूल करुन देईल,असा उरफाटा निरोप तिने दिला….!
वर्षा या भारतातल्या दलाल असून गरीब वसत्यांमध्ये फिरुन माझ्यासारख्या स्वप्नवेडी,ध्येय वेड्यांना हेरत असते,त्यांना लाखोंच्या पगाराचे व चांगल्या नोकरीचे आमिष दाखवते,तिला भारतातून गूलाम पाठवण्याचे कमिशन सऊदीच्या लोकांकडून मिळत असावे,माझा पगार मला मिळत नव्हता मात्र वर्षाला दिलेले पूर्ण पैसे फिटेपर्यंत तुझी सूटका नाही,असे सऊदीतील मालकीण म्हणायची,तुझे मरण येथेच आहे आमच्या दफनभूमीत,घरच्या माणसांना आता विसर,अशी ती म्हातारी मालकीण दम देत असे,असे किरण सांगते.
आणि…तिचे केस ही कापले!
सऊदीमध्ये हिजाबची पद्धत असून महिलांचे एवढेसे ही केस हिजाबच्या बाहेर दिसू दिल्या जात नाही.भारतीय संस्कारामध्ये वाढलेली किरण ही जरी हिजाब डोक्यावर घेत होती मात्र तरी देखील तिला त्याची सवय नव्हती,परिणामी एकदा हिजाबमधून तिच्या कानाजवळचे केस हे मालकीणीला दिसले आणि….तिने न्हाव्याकरवी तिचे केस कापून टाकून तिला विद्रूप बनवले…..!

’आप’ची सक्रियता आणि किरणची सूटका…!
मानस चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला आम आदमी पक्ष्ाचे प्रभात अग्रवाल व इतर कार्यकर्ते हे माल्यापर्ण करण्यासाठी पोहोचले असता प्रदीप यांनी त्यांच्या पत्नीची आपबिती त्यांना सांगितली व मदत करण्याची याचना केली. किरण यांना अल-जौफ सऊदी अरेबिया येथे बंधक बनवून ठेवल्याची माहिती प्रदीप यांनी प्रभात अग्रवाल यांना दिली. ४ डिसेंबर २०२० रोजी पत्नीसोबत बाेलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.किरण तिथे खूप दू:खात असल्याचे सांगून त्यांना रडू कोसळले.
प्रभात यांनी किरण यांना देशात परत आणण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडली.सर्वात महत्वाचं श्रेय हे आपच्या त्या प्रभागातील कार्यकर्त्या जया लिंगारे यांना जातं. त्यांनी प्रदीप यांना आपच्या प्रभात अग्रवाल यांच्याशी भेटा म्हणून मार्ग सूचवला. त्या आधी प्रदीप यांनी त्यांच्याच प्रभागातील उर्जामंत्री नितीन राऊत,राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे उंबरठे झिजवले असल्याचे प्रभात यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असून देखील या गरीब कुटुंबाच्या मदतीला कोणीही सरसावले नसल्याचा झणझणीत आरोप प्रभात यांनी केला.
यानंतर आम आदमी पक्ष्ाने दिल्ली स्थित विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला.विदेश मंत्रालयाने तात्काळ हालचाल करुन सौदीतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून किरण यांची भेट घेण्यास सांगितले.किरण यांना तेथील अधिका-यांनी भारतीय दूतावासात आणले व भारतात परत जायचे आहे का म्हणून विचारले.किरण यांनी कुटुंबियांकडे तातडीने परत जायचे असल्याचे सांगितले मात्र माझा व्हिजा,कागदपत्रे सर्व मालकीणीने जप्त करुन ठेवले असल्याची माहिती किरण यांनी दिली.
भारतीय दूतावासाच्या सूचनेप्रमाणे तेथील मालकिणीला किरण यांचा व्हीजा,पासपोर्ट इ.संपूर्ण कागदपत्रे तिच्या हवाली करावे लागले.ज्या वेळी किरण मालकीणीचे घर सोडणार होती व स्वत:चे सामान भरत होती त्यावेळी सामानातील ‘टूथपेस्ट’ आणि आंतरवस्त्र देखील मालकीणीने तपासले असल्याचे घृणास्पद मर्म किरण यांनी खास ‘सत्ताधीश’कडे उलगडले.
१५ दिवसांच्या विलगीकरणानंतर किरण या आता नागपूरात आपल्या घरी पोहोचल्या व खूप आनंदी आहेत.
आपच्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन किरण यांचे स्वागत केले.किरण यांच्या माणूसकीच्या संघर्षामध्ये ‘आपचे’ नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले व नीलेश गोयल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, उत्तर नागपुर समन्वयक रोशन डोंगरे, नागपुर युवा अध्याक्ष गिरीश तितरमारे, नागपुर सहसचिव मयंक यादव, हरीश गुरबानी, अलका पोपटकर, विलसन लियोनार्ड, प्रदीप पौनिकर, विश्वजीत मसराम, शुभम सेन, धीरज शर्मा कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.
काय आहे मोडस ऑपरेंडी?
भारतात दलालांची एक मोठी चमूच गरीब,गरजू,तरुण मुलामुलींवर लक्ष् ठेऊन असते.यानंतर त्यांच्याशी आपुलकीचे व विश्वासाचे संबंध जोडले जातात. त्यांना आर्थिक मदतही केली जाते.एकदा विश्वास बसला की त्यांना भारतापेक्ष्ा परकीय देशामध्ये खूप जास्त पगाराचे आमिष दिले जाते.गरीब,अज्ञानी व अशिक्ष्ति असल्यामुळे मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी ते सहज तयार होतात मात्र परकीय देशात भारतातील या गरीब,गरजू माणसांना गूलामासारखी वागणूक मिळते,त्यांना मारझोड केली जाते,त्यांना उपाशी ठेवले जाते,त्यांचे अतोनात हाल केले जातात,या भू-तळावर ते देखील ‘माणूस’च आहे हे सौदी असो किवा दुबई,अमिरात असो,त्यांच्या लेखी भारतीयांची किंमत ही ‘गूलामा’सारखीच असते.
त्यांची कागदपत्रे,व्हिजा,पासपोर्ट जप्त केली जातात,किरण सांगते त्याप्रमाणे तेथील पोलिसांची त्यांना वारंवार धमकी दिली जाते,चोरीचा आरोप करुन तुरुंगात जन्मभर डांबून ठेऊ,या भीतीने मुक्याने भारतीय माणसे परकीय देशात अन्याय सहन करीत असतात.अनेकांचा मृत्यू ही होऊन जातो आणि भारतात त्यांचे आप्त-स्वकीय त्यांच्या येण्याकडे डोळे लाऊन असतात….!भारतीय तरुणींना तर लैंगिक शोषनालाही बळी पडावं लागतं…किरण या भाग्यवान होत्या…त्यांची त्या नरकातून सूटका झाली…आज त्यांचे पती प्रदीप यांच्या डोळ्यात किरणला सुखरुप परत आलेली बघून आनंद मावत नव्हता….!
परकीय देशात भूलथापांनी पळवून नेलेल्या अनेक तरुणींच्या बाबतीतील खटले न्यायालयाच्या उंबरठय्ापर्यंत गेले आहेत.न्यायालयाने देखील या मोडस ऑपरेंडीविषयी वेळोवेळी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
किरण यांना आज ‘आपला देश’याची किंमत चांगल्याचे कळली असून परकीय देशाचा सोन्याचा घास ही नको,असा त्यांचा कटू अनुभव आता सांगत आहे..इतर गरजू किमान किरण यांच्या या आपबितीतून बोध घेतील का?




आमचे चॅनल subscribe करा
