

मनपा सभेत प्रशासनाचे उत्तर :बदलीचा अधिकार आयुक्तांचाच
नागपूर,ता. ४ ऑक्टोबर २०२१: विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी आज पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासनात एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांबाबत प्रश्न उपस्थित केला .एकच अधिकारी एकाच विभागात एकाच पदावर ५-५,६-६ वर्षे काम करताे मात्र दूसरीकडे मर्जीतल्या नसलेल्यांची बदली ३ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच केली जाते मग त्या अधिका-यांची बदली का केली जात नाही?या प्रश्नावर प्रशासनातर्फे वनवेंना उत्तर मिळाले हा अधिकार आयुक्तांचा आहे.
बदली अधिनियमाच्या अंमलबजावणीचा अधिकार मनपा आयुक्तांचा असून कोणत्याही अधिका-याचा सर्वसाधारण कालावधी अधिकतम ३ वर्षेच असला तरी काही विशिष्ट परिस्थितीत आयुक्त कितीही वर्षे एकाच अधिका-याला एकाच विभागात एकाच पदावर कायम ठेऊ शकतात.प्रशासनाचे काम विस्कळीत होणार असेल तर,प्रशासकीय कामकाजात त्या अधिका-याची नितांत गरज असेल तर,धोरण निश्चितीच्या संदर्भात व प्रशासकीय अंमलबजावणीत अडथळा निर्माण होत असल्यास इ. अश्या अनेक कारणांमुळे अायुक्त हे अधिका-यांना कितीही मुदत वाढ देऊ शकतात.
यावर वनवे यांनी वाटेल तेवढा काळ?जे मर्जीतले नाहीत त्यांची वारंवार बदली होत असते ही परंपराच चुकीची असल्याचे ते म्हणाले.यावर माजी स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी साधारणत:दोन अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन सहायक आयुक्त नितीन कापडीया यांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार बदल्यांच्या संदर्भात एक परिपत्रक काढले असल्याचे सांगितले.यात तीन वर्षांपेक्षा तसेच ५ वर्षांपेक्षा एकाच पदावर कायम असणा-या अधिका-यांची संख्या गोळा करण्याचे निर्देश होते.अशी माहिती प्रशासनाने गोळा केली आहे का?असा प्रश्न झलकेंनी उपस्थित केला.
यावर प्रशासनाने २० मे २०१८ रोजी हे परिपत्रक जारी झाल्याचे सांगितले.वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिका-यांसाठी ३ वर्ष,वर्ग-३ च्या अधिका-यांसाठी ५ वर्ष आणि वर्ग-४ च्या कर्मचा-यांसाठी ७ वर्षांचं टेन्यूअर काढण्यात आलं होतं,असे उत्तर प्रशासनाने दिले, मग किती लोकांच्या बदल्या केल्या?असा प्रश्न झलके यांनी उपस्थित केला.
यावर मनपा प्रशासनात कर्मचा-यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे डेटा उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रशासनाने दिले.लवकरच असा डेटा गोळा करण्याचे काम करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले.यावर वनवे यांनी एकीकडे डेटाच उपलब्ध नाही म्हणता व दुसरीकडे कर्मचा-यांची संख्याही खूप जास्त असल्याचे सांगताय,मला मूळात एकूण कर्मचा-यांची संख्या किती हे माहिती करुन घ्यायचे नसून वर्ग-२ चे सध्या किती अधिकारी कार्यरत आहे ही माहिती देण्यात यावी,अशी विनंती त्यांनी महापौरांना केली.
यावर प्रशासनाने सध्या एकूण १२ सहायक आयुक्त कार्यरत असून वर्ग-१ अंतर्गत १०३ पदांवर तर वर्ग-२ मध्ये २३ पदांवर, वर्ग-३ मध्ये १६५८ पदांवर अधिकारी वर्ग कार्यरत असल्याची माहिती दिली.वर्ग-१ ची मंजूर पदे १९९ असून सध्या कार्यरत १०३ असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सामान्य प्रशासन विभागात उपायुक्त पदावरील महेश धामेचा यांचा कार्यकाळ १७ सप्टेंबर २०१६ पासून सुरु झाला असून अद्याप ते त्याच पदावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली तर महसूल विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांची त्या पदावर २४ जून २०१५ रोजी नियुक्ती झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
विशेष म्हणजे महेश धामेचा यांच्या विरोधात माजी विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी अनेक पत्र परिषदा घेऊन सुरक्ष्ा रक्ष् कांचा कंत्राट,स्टेशनरी,गाड्या पुरविण्याचा कंत्राट इ.कारभारात कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप केले होते मात्र याची कोणतीही दखल एकमेव तुकाराम मुंढे सोडले तर कोणत्याही आयुक्तांनी घेतली नाही.
ना धामेचा यांनी या आरोपाचे खंडण केले ना त्यांना आयुक्तांमार्फत एक ही कारणे दाखवा नोटीस मिळाली.मुंढे यांनी सामान्य प्रशासनाच्या संदर्भात फक्त अति.आयुक्त जैन हेच त्यांच्याशी संवाद साधतील असा निर्णय अमलात आणला होता.मात्र माजी आयुक्त श्रावण हर्डीकर,अश्विन मुद् गल,अभिजित बांगर तसेच विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी धामेचा यांच्यावर पराकोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप होऊन देखील त्यांची बदली केली नसल्यानेच ’आहे आयुक्तांच्या मनी.. आवडते अधिकारी त्याच ठिकाणी‘चा संदेश नागपूरकर जनतेमध्ये गेला.
नागपूरला महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा असला तरी प्रशासकीय अधिका-यांच्या नियुक्तीबाबत राज्य शासनाने कायम उपराजधानीसोबत दूजाभाव केला असल्याचे ही बोलले जाते.मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवड यासारख्या मनपात सचिवस्तराचा अधिकारी आयुक्त पदी नेमला जातो मात्र उपराजधानीत अधिकारी वर्गाचा दर्जा असणा-या आयुक्तांचीच नेमणूक केली जाते.हा पायंडा नागपूरचेच भूमीपुत्र असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोडला नाही.त्यामुळे ज्याला-त्याला सोयीस्कर व आपल्या हिशोबाचेच अधिकारी नागपूर मनपात नेमायचे असतात,हे नागपूरकर जनतेलाही चांगल्याने माहिती झाले आहे.
नगर रचना विभागात तर बदली होणारे अनेक अधिकारी हे वर्ष भरात तर सोडा ६ महिन्यात त्याच विभागात परत आल्याची शेकडो उदाहरणे आहे.हा चमत्कार का आणि कसा घडू शकतो?याचे उत्तर हूशार नागपूरकरांनाही चांगल्याने माहीती आहे.
नुकतेच अति.आयुक्त राम जोशी यांची राज्य शासनाने चंद्रपूरमध्ये करण्यात आलेली बदली आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या पत्रवजा मागणीमुळे रद्द करण्यात आली.गेली ५ वर्षे राम जोशी हे देखील एकाच शहरात आपल्या पदावर कायम आहेत.
करोनाच्या आपत्तीकाळात अनुभवी राम जोशी यांच्याशिवाय प्रशासानाचे पान हलणार नाही हे आयुक्तांना देखील चांगल्याने माहिती असल्यामुळेच व तिसरी लाट आलीच तर राम जोशी यांच्याच अनुभवाचा लाभ त्यांना होईल या उद्देशाने राम जोशी यांची बदली आयुक्तांनी रद्द करुन घेतली.राम जोशी यांच्यावर देखील करोनाच्या उपाययोजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त कोट्यावधीच्या अनुदान राशीत घोळ केल्याचा आरोप पत्र परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्या व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी केला होता मात्र आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी त्यांच्या ही आरोपांना गांर्भीयाने घेतलेच नाही.
आयुक्त आपल्यासमोर या अधिका-यांची ढाल करुन वापरतात व स्वत: नामानिराळे रहात असल्याची टिका म्हणून उगाचच होत नाही.
परिणामी विरोधी पक्ष नेत्याने मनपा सभेत किती ही कंठशोष केला तरीही भ्रष्टाचाराचाअ आराेप असणा-या अधिका-यांच्या बदलीचा हा अधिकार आयुक्तांचाच असल्याकारणाने नागपूरकरांना निदान राधाकृष्णन बी.यांच्या कार्यकाळात तरी मनपातील काही भ्रष्ट अधिका-यांच्या कारभारापासून त्यांची सूटका होईल,अशी अपेक्षा करने फोलच ठरणार आहे.
असा आहे झोनस्तरावरील सहायक आयुक्तांचा कार्यकाळ-
लक्ष्मीनगर झोन-सहायक आयुक्त गणेश राठोड-नियुक्ती २८-१०-२०२०
हनुमाननगर झोन-सुषमा मांडगे-१२-४-२०२०
धंतोली झाेन-किरण बागडे-२७-८-२०२१
नेहरु नगर झोन-हरीश राऊत-७-७-२०२०
गांधी बाग झोन-अशोक पाटील-२९-९-२०१५
सतरंजीपुरा झोन-घनश्याम पंधरे-२१-५-२०२१
लकडगंज झोन-साधना पाटील-१७-५-२०१०
अाशीनगर झोन-बावीस्कर-२१-९-२०२१
मंगळवारी झोन-विजय हूमणे-३१-५-२०२१




आमचे चॅनल subscribe करा
