फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआली जवळ मनपाची निवडणूक...आठवले स्वामीजी!

आली जवळ मनपाची निवडणूक…आठवले स्वामीजी!

Advertisements

स्वामी विवेकानंद स्मारकाची महापौरांनी केली पाहणी

स्वच्छता, डागडुजी, देखरेखीकडे लक्ष देण्याचे दिले निर्देश

नागपूर, ता. २८ डिसेंबर २०२१ : अंबाझरी तलावालगत साकारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी मंगळवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्मारक परिसराची पाहणी करून परिसरातील स्वच्छता, स्मारकस्थळाची डागडुजी आणि संपूर्ण देखरेखीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.या स्मारकाचे २०१७ च्या ऐन मनपाच्या निवडणूकी पूर्वी लोकार्पण करण्यात आले होते,हे विशेष.

२०१७ नंतर विकासाचे बरेच ‘पाणी’ या स्मारकाच्या खालून  नाग नाल्यात वाहून गेले आहे! स्मारकाच्या खाली मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेली स्वामी विवेकानंद यांच्या जीवनप्रवास दर्शवणारी गॅलरी याचे देखील त्याच दिवशी लोकार्पण झाले होते मात्र लगेचच ती प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आली.स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवनचरीत्र दर्शविणारे म्यूरल लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक म्यूरलखाली एक टिव्ही स्क्रीन आणि हेडफोन आहेत. या टिव्ही स्क्रीनवर स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील कथा दृकश्राव्य माध्यमात दाखविण्यात येणार होते. या भागामध्ये पाणी झिरपत असल्यामुळे भिंतींची अवस्था खराब झालेली असून ती तातडीने दुरूस्त करणे, वरील भागातून पाणी झिरपत असल्याने तिथेही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश ‘आता कुठे’ महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

फक्त निवडणूक बघून भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधा-यांनी त्यावेळी लोकार्पणाचा जो सपाटा लावला होता,त्यात भांडेवाडीच्या प्रकल्पासोबतच गांधी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण याचा ही समावेश होता.

या सर्व ‘विकास’कामांचे गोड फळ सत्ताधा-यांना निवडणूकीत चाखायला मिळाले व मनपात भाजपचे १०८ नगरसेवक मनपाच्या इतिहासात पहील्यांदा निवडून देखील आलेत मात्र त्यानंतर आपणच केलेल्या लोकार्पणाच्या वास्तूंची दूर्दशा बघण्याचा ‘निवांतपणा ’सत्ताधा-यांना नंतर लाभलाच नाही.

आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वामी विवेकानंद स्मारक स्थळाला भेट देताच मनपाच्या निवडणूका जवळ आल्या असल्याची ‘उपरती’नागपूरकरांना झाली.

. स्वामी विवेकानंद स्मारक स्थळी स्वामी विवेकानंदांचे काही म्यूरल उभारण्यात आलेले आहेत. या म्यूरलची स्वच्छता व त्यांची रंगरंगोटी करणे. स्मारकाच्या आतील परिसरातील काही ठिकाणी टाईल्स तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी टाईल्स निघालेल्या आहेत. या सर्व भागाची दुरूस्ती करणे. स्मारक परिसरात लावण्यात आलेल्या मार्बलवर काईली चढल्याने स्मारकाच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून त्वरीत काईली काढण्यात यावे, असे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

स्मारकाच्या बाजूने ओव्हरफ्लो ठिकाण असल्याने स्मारकाच्या सौंदर्यात भर पडते. सध्या ओव्हरफ्लो बंद असल्यामुळे पाणी वाहणा-या भागामध्ये गवत, कचरा वाढलेला आहे. याबद्दल स्वच्छता विभागाद्वारे तातडीने कर्मचारी नियुक्त करून संपूर्ण कचरा साफ करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

उद्यान परिसरात ‘माय लव्ह माय नागपूर’ हे कटआउट नागपूर शहराची ओळख दर्शवित आहेत. या मागील भागात काही महिन्यांपूर्वी झाडाच्या फांद्या खचून पडल्या. तुटलेल्या झाडाच्या फांद्या, इतर कचरा तातडीने साफ करणे. तसेच परिसरातील इतरही झाडांची छाटणी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

स्मामी विवेकानंद स्मारकापुढील मार्गावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे रस्त्याच्या बाजूचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात मलबा पडून आहे. हा मलबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने साफ करून घेण्याचेही महापौरांनी निर्देशित केले.

स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकस्थळी नागपूर शहरातील नागरिकांसह बाहेरील लोकही भेट देतात. शहरातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळामध्ये या ठिकाणाची नोंद होते. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य नेहमी राखले जाणे आवश्यक आहे,असे महापौरांचे ’म्हणने’आहे, यासाठी परिसरात नेहमी स्वच्छता राहील, योग्य देखरेख राहरल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

एवढंच नव्हे तर परिसरातील कामामध्ये ‘झालेल्या ’दुर्लक्षाबद्दल जबाबदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या