फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपा आर्थिक डबघाईत मनपाच्या स्थायी समितीने केल्या २२ कोटी ५३ लाखच्या निविदा मंजूर

 आर्थिक डबघाईत मनपाच्या स्थायी समितीने केल्या २२ कोटी ५३ लाखच्या निविदा मंजूर

नागपूर,१० डिसेंबर २०१९:  एकीकडे नागपूर महानगरपालिका आर्थिक डबघाईशी झुंजत असताना दुसरीकडे छत्तीसगडी महोत्सव,उद्यानाचे सौदर्यीकरण,विविध सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी,मल वाहिनी लिकेज व दूषित पाणी उपसासाठी टाटा कंपनीच्या ९ गाड्या विकत घेणे इत्यादी कामांच्या निविदा मनपाच्या स्थायी समितीकडून मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आल्या असून वरील सर्व बाबींवर ११ कोटी ३६ लाख १३ हजार २९३ रु.चा खर्च मंजूर करण्यात आला आहे. स्थायी समितीने एकूण २२ कोटी ५३ लाख १० हजार १४९ रु. च्या निविदा मंजूर केल्या असल्याची माहिती मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहोणे यांनी पत्र- परिषदेत दिली.

एकीकडे कर्मचाऱ्यांचे पगार,सातवा वेतन आयोग,मालमत्ता कर वसुली सारखे गंभीर प्रश्न मनपाला भेडसावत असताना ‘ छत्तीसगडी लोक महोत्सवावर’ एकूण ३८ लाख ८० हजार रु. खर्चाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. आर.टी. ओ.मैदानात ३ दिवस आयोजित या महोत्सवात देशातील नामवंत कलावंताचा समावेश असणार आहे.

याशिवाय शहरातील मलवाहिनी लिकेज,नाले,इतर बाबी,खाजगी विहिरींचे दूषित पाणी इ.च्या उपसा यासाठी टाटा कंपनीच्या ९ गाड्या विकत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. अग्निशमन विभागात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असताना पुन्हा नव्या गाड्या यांच्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी कंत्राट द्यायचे,का द्यायचे,त्यांना प्रशिक्षण देण्यासंबंधी पुन्हा स्वतंत्र प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप पोहोणे यांनी दिली.
स्थायी समितीने लता मंगेशकर उद्यानाच्या सौदर्यीकरणासाठी २ कोटी ४० लाखाच्या खर्चाला अनुमती प्रदान केली असून हे उद्यान एमआयटीकडून मनपाला हस्तांतरीत झाले असल्याची माहिती प्रदीप पोहोणे यांनी दिली. या उद्याना विषयी अनेक वर्षांपासून अनेक तक्रारी नागरिकांच्या होत्या त्यामुळे या उद्यानाचे सौदर्यीकरण, विविध स्थापत्य कामे यांना मंजुरी देण्यात आली. येत्या रविवारी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय श्री दक्षिणामुर्ती चौकात स्टोन फ्लोरिंगसाठी ४९९९१८१ रु. चे प्रावधान मंजूर करण्यात आले आहे.

गांधी सागर तलावच्या नातीक चौकाच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्याचे सौन्दर्यीकरण,सिमेंट रस्ते यांच्यासोबतच, डांबरी रस्त्यांवरील खड्यांची दुरुस्ती साठी नवे तंत्रज्ञान अंतर्भूत असलेली पॅचर मशीन खरेदीलाही मंजुरी प्रदान करण्यात आली. ही मशीन पावसाळ्यात देखील खड्डे बुजवण्याचे काम प्रभावीपणे करू शकते अशी महिती पोहोणे यांनी दिली. बजाज इनोव्हेशनची एकूण १,७८,३६,२५० रकमेची निविदा स्वीकारण्यात आली असून १२ टक्के जीएसटी मिळून १,९९,७३६०० ची निविदा मंजूर करण्यात आली.वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षात पहिला टप्पा रु.५०,००,००० पर्यँतच्या मर्यादीत कामाला स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली.

उद्धव सरकारने नगरोत्थानचे पैसे परत घेतल्याची चर्चा सुरू असताना नागपूर महानगरपालिका कश्याच्या भरवश्यावर ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. फडणवीस सरकारने १२० कोटी मनपाला मंजूर केले होते, त्या पैशांचाच अपव्यय होत असल्याची टीका चर्चिली जात आहे.

छत्तीसगढी लोक महोत्सवातील कार्यक्रम व कलावंत-
साई बाबा महानाट्य,तिजनबाई,दिलीप संडगी,पप्पु चंद्रकांर-सुभाष उमरे,सुनील सोनी,लोकरंग,लोकमंडल,दुकालु यादव,अरुण साहू,गरिमा दिवाकर-स्वणा दिवाकर,राऊत नाच्या,अल्का चंद्रकांर,करण खान,निवेदक,गोविंद साव यांच्या ऑरकेसट्रा, डान्स ग्रुप.
महोत्सव महत्वाचा की शाळा महत्वाची-मनोज सांगोले( नगरसेवक, कॉंग्रेस पक्ष)
तीन दिवसांच्या महोत्सवावर ३८ लाख,८० हजार रु. खर्च करणारी भाजप सरकार खरंच अभिनंदनास पात्र आहे. यांची मानवता,छत्तीसगढी गरीब मुलांसाठी एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची नाही किंवा गरिबांसाठी रुग्णालय किंवा कोशल्य विकास केंद्र सुरू करण्याची नाही मात्र तीन दिवसांच्या महोत्सवावर ४० लाख रु. खर्च करणे यांना गरजेचे वाटत आहे. मल-मूत्रात काम करणाऱ्या जिवंत कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, सत्तेच्या मदामध्ये यांची मानवता मरून गेली आहे.

महापालिका म्हणून सर्वच लोकांचा व घटकांचा विचार करावा लागतो. प्रत्येक कामाचे बजेट असते.नागपूर शहरात महापालिकेतर्फे विविध सात ते आठ सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरात राबवले जातात, यात छत्तीसगढी लोक महोत्सवाची आणखी भर पडली. त्यांच्यासाठी शैक्षणिक धोरणं तर सुरूच आहेत मात्र त्यासोबत मनोरंजनात्मक सांस्कृतिक उवक्रमही गरजेचा आहे. या लोक महोत्सवामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडेल असा मला विश्वास आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी सांगतात रस्ते,वीज,शाळा यासारख्या भौतिक गरजांसोबत पारंपरिक लोक वैभवाने नटलेली मनोरंजनात्मक सांस्कृतीक गरज देखील भागली पाहिजे.
प्रदीप पोहोणे( स्थायी समिती अध्यक्ष)

……………………..

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या