फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमआरोपी पत्रकाराचा कबुलीनामा!‘वर’ देखील रक्कम पोहोचवणे आहे,ध्वनिफित व्हायरल

आरोपी पत्रकाराचा कबुलीनामा!‘वर’ देखील रक्कम पोहोचवणे आहे,ध्वनिफित व्हायरल

Advertisements

सुनील हजारी विरोधात आणखी एक खंडणीची तक्रार दाखल
कानून के लंबे हात ‘वर’पर्यंत पोहोचतील का?वाचकांचा सवाल
दैनिकाचे वरिष्ठ गप्प का?वृत्त देखील दैनिकात प्रसिद्ध न करण्या मागे कोणता हेतू?
नागपूर,ता.४ सप्टेंबर २०२४: दैनिक भास्कर या हिंदी वृत्तपत्राचा खंडणीखोर नागपूर शहर संपादक सुनील सुकलाल हजारी (४४, रा. राहुल रेसिडेन्सी, एसटी बस स्टँडजवळ, पाचवा माळा, गणेशपेठ) याने आणखी एका आरटीओ दलालाकडून चार लाखांची खंडणी उकळली. तसेच आणखी एका लाखाच्या खंडणीसाठी तो दलालावर दबाव टाकत होता. त्यामुळे दलालाने थेट पोलीस आयुक्तांकडे हजारीविरुद्ध लेखी तक्रार दिली. या दलालासोबतच्या वार्तालापाची ध्वनिफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून ,यात खंडणीखोर शहर संपादक दलालावर पैशांसाठी दबाव टाकत,‘वर‘सुद्धा रक्कम पोहोचवणे आहे,असे स्पष्टपणे सांगताना ऐकू येत आहे.
आरटीओमध्ये दलाल असलेल्या बलराज साहनी यांच्याविरुद्ध जुलै महिन्यांत दैनिक भास्करमध्ये बदनामीकारक वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे बलराज यांनी हजारी यांना बदनामी न करण्याची विनंती केली. मात्र, हजारीने त्याला देखील १० लाख रुपयांची खंडणी मागितली. शेवटी पाच लाख रुपयांसाठी त्याने धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या साहनी यांनी ३१ जुलैला,दैनिक भास्कर वृत्तपत्र कार्यालयासमोर हजारीला ३ लाख दिले. मात्र, त्यानंतर हजारी हा एक लाख रुपयांसाठी साहनी यांना फोन करून धमक्या देत होता.
ध्वनिफितमध्ये हजारी स्पषटपणे सांगताना ऐकू येतोय की ‘वर’चार लाखांचे सांगून ठेवले आहे तर चार लाख द्यावेच लागतील!याच संभाषणात हजारी याने ‘मॅनेजमेंट’चा देखील उल्लेख केला आहे.चार लाख देण्यासाठी फिर्यादी ’राजीखुशी’सहमत झाला,असे देखील हजारी म्हणतोय.चार लाखांमध्ये तो सहमत झाला त्यामुळेच तर मी ‘उपरवाले’यांना देखील तसे कळवले.आमच्या छायाचित्रकाराने साहनीला दैनिक कार्यालयात बघितले असून,हजारी याला याबाबत विचारले की साहनली कार्यालयात आला होता का?कारण हा छायाचित्रकार आरटीओ मधील अनेक दलालांना व्यक्तीगत ओळखतो.अश्‍यावेळी मी त्या छायाचित्रकाराला सांगितले की,आपण त्याची बातमी छापली होती त्यामुळे तो हे सांगायला आला, की खंडण छापा नाही तर तुमच्यावर मी मानहानिचा खटला दाखल करेल,तुम्हाला कधी तो छायाचित्रकार भेटला तर त्याला तुम्ही हेच सांगा की साहनी, मानहानिबाबतच दैनिक भास्करच्या कार्यालयात बोलायला गेला होता.
मी ‘वर’चार लाख सांगितले असल्याने चार लाखच द्यावे लागतील.असा व्यवहार हा लेखी होत नसतो त्यामुळे जे काही आहे तो व्यवहार,विश्‍वासावरच होत असतो.मॅनेजमेंटने कमिटमेंट केले तर ते त्याचे योग्य पालन करतात,समोरच्याने देखील दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे.चार लाखांमध्ये आपले ठरले होते.चार लाख देण्यास तो सहमत झाला त्यामुळेच आपण पुढे गेलो होतो ना?चार लाखात तो सहमत झाला,हसीखुशी सहमत झाला त्यामुळेच मी ते ‘वरच्यांना’देखील सांगितले!त्याला सांग दक्षता पथक त्याला एखादवेळी विचारपूस करु शकतात पण,मी त्याला काय बोलायचे ते समजावून सांगून देईल असे हजारी सांगतोय,यावर फिर्यादीचा हितचिंतक हजारीला,त्याला सांभाळून घ्या साहेब, तो खूप भाबडा असल्याची मखलशी करताना ऐकू येतोय,यावर हजारी त्याला,घाबरु नका मी एकदा वचन दिले आहे तर पूर्ण करणार,असे हजारी सांगतोय.
आणि शेवटी साहानीकडून हजारीने बळजबरी एक लाख रुपये आणखी उकळले. गेल्या पाच दिवसांपूर्वी सुनील हजारीने आरटीओ दलाल टिटू शर्मा यांच्याविरुद्ध बातमी प्रकाशित न करण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली होती. मात्र, टिटू शर्मा यांनी हजारी याला बदनामीच्या भीतीपोटी १ लाख ८० हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम देण्यापूर्वी त्याने पोलिसात तक्रार केल्यामुळे सुनील हजारीला अटक करण्यात आली. सध्या हजारी मध्यवर्ती कारागृहात आहे.
धनराज उर्फ टिटू साधूराम शर्मा (५५) रा. बाबा दिपसिंगनगर, प्लॉट नंबर ५६४, सुगतनगर, पीएस कपिलनगर असे फिर्यादी पिडीताचे नाव आहे. शर्मा हे आरटीओमध्ये एजंट म्हणून काम करतात. ही कारवाई गुरुवारी सदर पोलिसांनी सिव्हील लाईन स्थित व्हिसीए मैदानाजवळील चहा टपरीजवळ केली होती. वृत्तपत्रात बातमी प्रकाशीत करुन बदनामी करण्याची आरोपीने धमकी देऊन टिटू शर्मा यांना ही खंडणी मागितली होती.
आता आरोपी हजारीविरुद्ध तक्रारीचा ओघ वाढत आहे. सदर पोलिसांनी हजारीविरुद्ध आणखी दुस-या तक्रारीचीही नोंद घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी फिर्यादीसह एका छायाचित्रकाराचे बयान नोंदविल्याचे सांगितल्या  जाते.
थोडक्यात,वृत्तपत्रात जगतात चक्क एक शहर संपादक लाखोंच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक होतो,त्याला जामीन देखील मिळत नाही,तुरुंगात डांबल्या जातो तरी देखील लोकशाहीच्या चौंथ्या स्तंभाचा टेंभा मिरविणारे आरोपीचे दैनिक, एक सिंगल कॉलम देखील या घटनेचे वृत्त छापत नाही!ही वाचकांची दिशाभूल नाही का?या मागे ‘वर’च्या मॅनेजमेंटच्या लोकांच्या गप्प बसण्या मागे काय कारण आहे?आरोपीने तोंड उघडू नये,अन्यथा खंडणीखोरांचे पूर्ण रॅकेटच वाचकांसमोर उघडे पडले,अशी त्यांना भिती आहे का?असा खडा सवाल समाज माध्यमांवर विचारला जात आहे.
महत्वाचे म्हणजे दैनिक ‘लोकमत’ ने वृत्तपत्राचे मालक विजय दर्डा यांना कोळशाख्या खाणीच्या खटल्यासंबधी न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा,ठलकपणे लोकमतमध्ये प्रसिद्ध केली होती.हेच वृत्तपत्राच्या मूल्यात आणि तत्वाला अपेक्षीत देखील होते मग तीच मूल्ये या हिंदी दैनिकाने का नाही स्वीकारली?कोट्यावधीची कमाई आपल्या वाचकांच्या विश्‍वासावर कमावणारे हे दैनिक त्याच वाचकांपासून नेमके काय दडवू इच्छित आहे?बातम्या छापण्या मागचा हेतू ‘सत्य’ वाचकांसमोर आणण्या ऐवजी ,बदनामीची भीती दाखवून लाखोंची खंडणी ऐठण्याचा धंधा पत्रकारितेच्या नावावर काही दैनिकात जो सुरु आहे,त्यावर अंकूश लागणे आता गरजेचे झाले आहे.वेश्‍येच्या बाजारात पत्रकारितेला नेऊन ठेवणा-यांची जागा ,दैनिकांच्या कार्यालयातील खुर्च्या उबवण्यासाठी नसून तुरुंगातच आहे,नागपूर पोलिसांनी ते निष्पक्षपातीपणाने करावे,अशी अपेक्षा नागपूरकांना आहे.
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांनी कोणत्याही ‘राजकीय’ किवा ‘अराजकीय’दबावाला बळी न पडता,कानून के हात या घटनेत किती लंबे आहेत,हे सिद्ध करावे व ध्वनिफितीत आरोपी हजारी वारंवार जे ‘वर’सांगितले असल्याची व त्यांनाही रक्कम देण्याची स्पष्टोक्ती देतोय ,त्या मागील खरे-खोटे शोधून काढून,सत्य वाचकांसमोर आणावे व लोकशाहीची बूज राखावी,अशी मागणी केली जात आहे.
…………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या