फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाआरोग्य अधिकारी करीत आहे सभागृहाची दिशाभूल:तानाजी वनवे यांचा आरोप

आरोग्य अधिकारी करीत आहे सभागृहाची दिशाभूल:तानाजी वनवे यांचा आरोप

कचरा संकलनात दोन्ही कंपन्यांचे काम असमाधानी

नागपूर: पूर्वी नागपूर शहरातील दहा ही झोनच्या कचरा संकलनासाठी कनक रिर्सोसेस या कंपनीकडे जवाबदारी देण्यात आली होती,त्यांनी अत्यंत बेजवाबदारपणे काम केल्याने शहरातील स्वच्छतेचा बट्याबोळ झाला असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होता,परिणामी कनकसोबत करार संपुष्टात आणून ‘एजी इनवेरा इन्फ्रा’ आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या दोन कंपन्यांसोबत शहरातील कचरा संकलनाचा करार महापालिकेने केला मात्र अडीच महीने झाले तरी नागरिकांच्या घरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न सुटला नाही. यावर सोमवार दि. २० जानेवरी २०२० रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत चर्चेदरम्यान विचारलेल्या प्रश्‍नांना प्रशासकीय अधिकारी देत असणारी उत्तरे ही सभागृहाची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप मनपा विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी केला.

कचरा संकलन आणि परिवहन याकरीता स्थायी समितीने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी नवीन निविदा काढून ‘एजी इनविरो इन्फ्रा’ तसेच ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्यावर कचरा संकलनाची जवाबदारी सोपवली. या कराराला ७ सप्टेंबर २०१९ रोजी मंजूरी प्रदान करण्यात आली. या दोन्ही कंपन्यांसोबत निविदाप्रमाणे करण्यात आलेल्या करारातील मुसद्याला सभागृहाची परवानगी मिळावी यासाठी हा मुद्दा सभागृहात चर्चिला जात असताना तानाजी वनवे यांनी पूर्वीच्या कनक रिर्सोसेसमधून किती कर्मचारी या दोन्ही कंपन्यांनी कामावर घेतले याची माहिती विचारली. यावर उपायुक्त निर्भय जैन यांनी एजी कंपनीकडे ११२८ कर्मचारीपदे मंजूर असून त्यातील ७३९ कर्मचारी हे कनकमधून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय बीव्हीजी कंपनीकडे ९३३ कर्मचारी पदे मंजूर असून त्यातील ६३७ कर्मचारी हे कनकचे असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावर कनकच्या इतर कर्मचारी यांची भर्ती या दोन्ही नवीन कंपन्यांनी का केली नाही असा प्रश्‍न वनवे यांनी उपस्थित करता त्यांची डिमांड जास्त असल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी सांगितले. इतर ५०४ पदांवर कनकने इतरांची नियुक्ती केली असल्याची माहीती त्यांनी दिली. नियुक्त झालेल्या कर्मचारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे का?हा प्रश्‍न वनवे यांनी उपस्थित केला यावर एजी कंपनीने ५०४ तर बीव्हीजीने ६१६ कर्मचारी यांना नियुक्ती पत्र दिले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी यांनी सांगताच, प्रशासकीय अधिकारी हे सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप वनवे यांनी केला.

अधिकारी हे खोटी माहिती सभागृहाला देत आहे. अद्याप नियुक्त झालेल्या एकाही कनकमधून घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांला नियुक्ती पत्र मिळाले नसल्याचा आरोप वनवे यांनी केला.नियुक्ती पत्र,कायद्यानुसार मिळणार असणारे किमान वेतन पत्र अद्याप त्यांना मिळाले नसून या दोन्ही कंपन्यांना जानेवारी २०२० ची देयके थांबवण्याचे पत्र अारोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त केल्याचे वनवे यांनी सांगितले. या दोन्ही कंपंन्यांचा भोंगळ कारभार सुरु असून अनेक नगरसेवकांच्या प्रभागात तर कचरा संकलन करणारी गाडीच जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्याही प्रभागात तेच हाल असल्याचे त्यांनी सांगितले. यावर दोन्ही कंपन्यांना ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली. मात्र या दोन्ही कंपंन्या कर्मचाऱ्यांना धमकी देत असल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे शिष्टमंडळासह जाऊन केली असल्याची माहिती वनवे यांनी सभागृहाला दिली.कंपन्यांना काम करण्याचा अधिकार आहे तसा कर्मचाऱ्यांना देखील आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराच्या स्वच्छतेसाठी आम्ही सहकार्य करीत आहोत पण संबंधित कंपन्यांचे काम समाधानकारक नाही. या कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली. प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी लक्ष्मीनगर मधील ४ प्रभाग मिळून ३२ कचरा गाड्या लागतील, मात्र कंपन्यांनी फक्त ८ गाड्या उपलब्ध केल्या आहेत, दररोज कचरा संकलनच होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. स्नेह नगर ते पांडे ले-आऊटपर्यंचा परिसर जर धरला तरी एका ठिकाणाहून कचरा संकलनाला सुरवात केली तर चौथ्या ठिकाणी पोहोचायला एकाच गाडीला चौथा दिवस उजाडतो,हे एकच उदाहरण आहे,संपूर्ण शहराचे हेच हाल आहेत,चार-चार दिवस कचरा पडून राहत असल्याची समस्या प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी महापौरांच्या निदर्शनास आणली. या दोन्ही कंपन्यांसोबतचा करार काही काळासाठी थांबवण्यात येऊन धोरणात्मक निर्णय सभागृहाने घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

माजी महापौर प्रवीण दटके यांनी कंपन्यांसाेबत करार थांबवण्यापेक्षा दर महीन्याला कराराप्रमाणे या दाेन्ही कंपन्या काम करीत आहे किवा नाही याची तपासणी करण्याची माणगी केली. दर महिन्यात घेण्यात आलेला आढावा सभागृहात मांडावा,अशी सूचना केली. या दोन्ही कंपन्यांचे ‘कनक’ होऊ नये,आरोग्य अधिकारी अडचणीत येऊ नये त्यामुळे दर महिन्याला या दोन्ही कंपन्यांच्या कामाचा आढावा घेण्यात यावे,अशी सूचना केली.गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी एकाच अधिकाऱ्यांवर दोन-दोन जवाबदाऱ्या सोपवण्यात आल्याकडे महापौरांचे लक्ष् वेधले. माझ्याच प्रभागात शाळा आणि बाजार देखील आहे मात्र तेथील कचरा संकलन तर सोडा घरासमोरील गल्ल्यांवरील कचरा देखील संकलन होत नसल्याचा आरोप केला.स्वच्छतेचे ‘गूण’ फक्त कचरा उचलण्यावर मिळणार आहेत का कि स्वच्छतेवर ही मिळणार आहे?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.शहरातील गल्लीबोळे हे देखील स्वच्छ राहीले पाहिजे. चोकेजसाठी मागणी करुन देखील पंधरा दिवस त्यांच्या प्रभागात गाडी पाठवण्यात आली नसल्याची तक्रार त्यांनी केली.

यावर नगरसेवक प्रकाश भोयर, जितेंद्र घोडेस्वार, प्रवीण दटके,तानाजी वनवे आदींनी केलेल्या सूचना करारात समाविष्ट करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या