
आयुक्तांच्या कक्षासमोर काँग्रेसची निर्दशने
आयुक्तांनी काँग्रेसच्या आमदारांवर घातली पाचच प्रतिनिधी भेटण्याची अट!
नगरविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
नागपूर,ता. २७ मे २०२२ : काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आज सकाळी ११ वाजता नागपूर महानगरपालिकेत आयुक्त राधाकृष्णन बी.यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी गेले असताना आयुक्तांनी फक्त पाच प्रतिनिधींनाच भेटण्याची परवानगी दिली.यावर आमदार विकास ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारुन त्यांच्या कक्षासमोरच ठिय्या मांडला.मनपाच्या प्रशासकीय कार्यकाळात नागपूरकर जनतेचे प्रचंड हाल होत असून,पाणी,कचरा संकलन यासारख्या मुलभूत सोयी-सुविधांचा पुरवठा तसेच पावसाळ्या पूर्वी नाले स्वच्छता इ.विषयाकडे आमदार ठाकरेंनी आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी आयुक्तांचे कक्ष गाठले होते मात्र आयुक्तांच्या आडमुठे धोरणामुळे आज काँग्रेस पदाधिका-यांनी आयुक्तांच्या कक्षासमोरच ठिय्या मांडला व जोरदार निर्दशने केली.
आयुक्तांच्या अधीन शासनाचे प्रशासक म्हणून सुरु असणा-या प्रशासकीय कारभारात नागपूरकर जनता ही अक्षरश: भरडली जात असून, मनपाचे विविध विभागाच्या प्रमुखांवर तसेच अधिका-यांवर मनपा आयुक्तांचे मुळीच वचक नसल्याची कठोर टिका त्यांनी यावेळी केली.यासोबतच मनपात गाजलेला जवळपास पाऊण कोटींचा स्टेशनरी घोटाळा या प्रकरणात आयुक्तांनी मोठे अधिका-यांना पाठीशी घालून फक्त लहान कर्मचा-यांवर गुन्हे दाखल केले व त्यांना कारागृहात पाठविले असल्याचा आरोप त्यांनी केला.
आयुक्तांच्या प्रशासकीय कारभारात आज नागपूरकर नागरिकांना अनेक वस्त्यांमध्ये अपूरा पाणी पुरवठा होत आहे. अनेक भागात नागरिक दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास बाध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.स्वच्छ पाणी,चांगले रस्ते,क्रीडा मैदाने,उद्याने तसेच दररोज शेकडो टन कच-याची विल्हेवाट हे काम स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मनपाचे आहे मात्र शहरात बीव्हीजी सारख्या खासगी कंपंन्या ज्या पद्धतीने कचरा संकलनाचे काम करीत आहे ते बघता या कंपनीला कोणाचे अभय आहे?असा सवाल त्यांनी केला.

या कंपनींना कचला संकलनासाठी वजनाच्या प्रमाणे भुगतान केले जाते,वास्तविक पाहता संपूर्ण भारतात कोणत्याही महानगरपालिकेत असा करार नाही.वजनाप्रमाणे भुगतान मिळत असल्यानेच बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी हे कचरा ऐवजी चक्क बांधकाम साहित्यांची उचल करुन डंपिंग यार्डमध्ये नेऊन टाकतात,शहरातील गल्लोगल्लीचा कचरा हा तसाच पडून राहतो मात्र या कंपनीला कोट्यावधीचे भुगतान बिनधोकपणे केले जात आहे.
कच-या ऐवजी बांधकाम साहित्याची उचल या संदर्भातील व्हिडीयोज मीच ६ महिन्यांपूर्वी पुरावे म्हणून आयुक्तांना दिले होते.आमचे नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी देखील याचे पुन्हा एकदा पुरावे दिले,सभागृहात चर्चा देखील झडली मात्र या ए.जी.इन्वहायरो व बीव्हीजी प्रा.लि.या दोन्ही कचरा संकलन कंपन्यांवर प्रशासक म्हणून आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही,यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अतिक्रमणाच्या नावावर शहरातील गरीब नागरिकांच्या झोपड्यांवर कारवाई करणारे अतिक्रमण विभागाचे अधिकारी मोठ्या धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर मात्र हतोडा चालवित नाही,अनेक धनदांडग्यांनी अनाधिकृतपण शासकीय जमिनींवर लॉन्स, हॉटेल्स व हॉस्पीटल्स उभारले मात्र त्यांच्याकडून ‘नियमित हप्ता’घेणा-या मनपाच्या या काही अधिका-यांवर कोणतीही कारवाई करण्यास आयुक्त धजत नाही,असा खळबळजनक आरोप याप्रसंगी आ.विकास ठाकरे यांनी केला.
पावसाळा तोंडावर आला असताना मनपा आयुक्त व त्यांचे अधिकारी चैनीत आपापल्या कक्षात बसले आहेत,अद्याप ३० टक्के ही नाले सफाई झाली नाही,उद्या नागरिकांची घरे तुंबली तर याला जवाबदार हे शासनाचे प्रतिनिधी राहणार आहेत का?असा सवाल त्यांनी केला.
जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे आमदार आयुक्तांना भेटण्यासाठी जात असता, आयुक्त हे त्यांच्यावर अटी लादतात!याची देखील तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येत्या आठ दिवसात करणार असल्याचा इशारा विकास ठाकरेंनी दिला.
याप्रसंगी आमदार अभिजित वंजारी,उमाकांत अग्निहोत्री,माजी नगरसेवक मनोज सांगोले,संदीप सहारे,हरीश ग्वालबंशी आदी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.




आमचे चॅनल subscribe करा
