फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशआपुलीच प्रतिमा होते आपलीच वैरी....

आपुलीच प्रतिमा होते आपलीच वैरी….

Advertisements
‘ऑपरेशेन सिंदूर’आणि भाजप नेत्यांचा उद्दामपणा

नागपूर,ता.२७ मे २०२५: स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी…आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी..घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा..उघड दार देवा आता उघड दार देवा’चित्रपट आम्ही जातो आमच्या गावा‘ यातील  सुधीर फडके यांनी १९६८ साली गायलेले हे मराठी भक्ती गीत आज पुन्हा एकदा आठवण्याचे कारण म्हणजे,या भक्तीगीतातील प्रत्येक शब्द आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांवर, त्यांच्या बेताल व उद्दामपणाच्या विधानांमुळे चपखळ बसत आहे.इतकंच नव्हे तर भारतीय जनमानसात पराकोटीची चिड निर्माण करी त आहेत. ते विधान मग समस्त भारतीयांचा अभिमान असणा-या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेली मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शहा यांचे असाे किंवा पहलगामच्या घटनेवर महिला पर्यटकांचे दहशतवाद्यांसमोर हात जोडण्यावर केलेले भाजपचे हरियाणाचे राज्यसभेचे खासदार रामचंद्र जांगडा यांचे अतिशय निंदनीय विधान असो.
जांगडा यांनी अकलेचे तारे तोडत, पहलगाममध्ये महिलांनी दहशतवाद्यांसमोर हात जोडण्या ऐवजी त्यांच्याविरुद्ध लढा द्यायला हवा हाेता’असे आश्‍चर्यजनक विधान करुन ते कोणत्या कुवतीचे राज्यसभेचे खासदार आहेत याची प्रचिती दिली!मूळात एके -४७ सारख्या क्षणात माणसांचा जीव घेणा-या बंदूकीसमोर महिला या तर साेडा स्वत: जांगडा यांनी तरी निधड्या छातीने लढा दिला असता का?हा प्रश्‍न त्यांनाच माध्यमकर्मींनी विचारायला हवा होता.साक्षात मृत्यू समोर असताना जीवितेची याचना न करणारे ते इतके धाडसी आहेत तर सीमेवर सैन्याच्या खांद्याला खांदा लावून ते देशाची व देशातील निरपराध महिलांच्या कूंकवावी सुरक्षा का करीत नाही?असा सवाल त्यांच्या या र्निबुद्धीमत्तेवर विचाराला जात आहे.
पहलगाम घटनेच्या वेळी महिलांमध्ये धाडसाचा भाव नव्हता,त्यांचे हे विधान जणू एखाद्या कवितेचे सहज समीक्षण करावे असे आहे.जांगडा यांनी महिलांना झांशीची राणी व अहिल्याबाई होळकर यांच्यासारखे धाडस दाखविण्याचा फूकाचा सल्ला देखील दिला. झांशीची राणी व राणी अहिल्याबाई होळकर हातात तलवार घेऊन रणांगणात शत्रूविरुद्ध उतरल्या होत्या.पहलगाममध्ये ज्या महिलांचे कूंकू पुसल्या गेले,त्या आपल्या कुटूंबियांसोबत पर्यटनासाठी गेल्या होत्या,लढण्यासाठी नाही तसेच त्यांच्या हातात त्यावेळी स्वरक्षणासाठी तलवारी देखील नव्हत्या,तरी देखील भापजचे एक उन्मादी  खासदार इतक्या गंभीर घटनेवर अशी मुक्ताफळे उधळतात तेव्हा,त्यांची किवा त्यांच्या विचारांची कीव करण्याशिवाय आणि मराठी चित्रपटातले आपुलीच प्रतिमा...हे  गीत आठवण्याशिवाय दूसरा पर्याय भारतीयांकडे उरत नाही.
मूळात भाजप श्रेष्ठींनी रामचंद्र जांगडा यांना राज्यसभेत जातीय समीकरण साधण्यासाठीच २०२० मध्ये पाठवले आहे.तसेही काँग्रेस असो किवा भाजप,यांच्या सत्ताकाळात राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह राजकीय पुर्नवसनासाठीच उपयोगी पडत आहे.संविधान निर्मात्यांचा मात्र या वरिष्ठ सभागृहाकडून वेगळ्या अपेक्षा होत्या.जांगडा यांना राज्यभेवर पाठवून हरियाणाच्या निवडणूकीत अनुसूचित जातीची मते आपल्याकडे खेचण्यात भाजपने यश मिळवले होते.मात्र,जांगडा यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नावर दिलेले असे उत्तर निदान देशाच्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदाराकडून तर निश्‍चितच अपेक्षीत नव्हते.लोकसभेच्या निवडणूकीत हरियाणाच्या रोहतक मतदारसंघातून जांगडा यांना कधीही यश मिळाले नाही,यातच त्यांची कुवत सिद्ध होते.व्होट बँकसाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी जांगडा सारख्या उद्दाम नेत्याला राज्यसभेवर पाठवून देश,वीर सैनिक,दहशतवादाला बळी पडलेले हूतात्मा,त्यांचे कुटूंबिय यांच्या अस्मितेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे,यात शंका नाही.
मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी तर कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी ‘दहशतवाद्यांची बहीण‘असा उल्लेख केला,ज्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली व या महान मंत्र्यांच्या विरुद्ध विशेष तपास पथकाची (एसआयटी)स्थापना केली!कर्नल कुरेशी यांच्यावरील अपमानस्पद टिपण्णीबद्दल शहा यांना न्यायालयाने फटकारले व त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी चक्क एसआयटी स्थापन केली.असे मंत्री आज ही मंत्री पदावर कायम आहेत!‘ऑपरेशन सिंदूर’ची कामगिरी माध्यमांसमोर मांडण्याची भारतीय लष्कराची जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी ज्या धाडसाने व संयमाने मांडली ते बघता संपूर्ण भारतीयांची मान गर्वाने उंच झाली मात्र,ज्यांच्या नावात कुंवर आहे जे आज ही स्वत:ला लोकशाही देशातील एका राज्यातील मंत्री समजत नसून राजेशाहीच्याच जगात वावरत असल्याचा प्रत्यय येतो.

विजय शहा हे मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील अनुसूचित जाती समुदायासाठी आरक्षित असलेल्या हरसूद विधानसभा मतदारसंघातून सातत्याने आठ वेळा निवडून आले आहेत!आदिवासी विकास मंत्री असलेल्या इतक्या वरिष्ठ आमदाराकडून त्यामुळेचआवेशाच्या भरात बोललेले ते बोल नसून, त्यांच्या मूळ मानसिकतेचा प्रत्यय आणून देणारे ते विधान होते.देशात अशी परिस्थिती असताना मंत्र्यासारख्या जबाबदार व्क्तीने घटनात्मक पदाचा आब राखून,तोलूनमापून बोलणे अपेक्षित असते,असे असताना तुम्ही कशा प्रकारची वक्तव्ये करता?अश्‍या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या या महान मंत्र्यांची कानउघाडणी केली.घटनात्मक पद भूषविणा-या व्यक्तीने संयम बाळगणे अपेक्षित आहे,असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मात्र,एका घटनात्मक पदावर बसलेल्या मंत्र्याला कानपिचक्या दिल्यावरही ,याचा कोणताही परिणाम मध्यप्रदेशचेच उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्यावर झाला नाही व त्यांचा देखील उद्दामपणा बहरुन आला व त्यांनी तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देताना चक्क देश व लष्करच देवडा यांनी मोदींच्या चरणी नतमस्तक केले!‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो,सगळा देश आणि लष्कर हे मोदी यांच्या पायी नतमस्तक झाले आहे!’त्यांचे हे विधान लष्कराच्या प्रतिष्ठेला तडा पोहोचवणारे आहे,याचे भान देखील एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेखी असू नये! मोदी यांच्यावर स्तृतिसुमने उधळताना अकलेचे संपूर्ण ताळतंत्र त्यांनी सोडल्याची पुष्टि त्यांची ही विधाने करतात.

विजय शहा यांनी तर २०१३ साली झाबुआ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते,त्यामुळे त्यांना मंत्रीपद ही गमवावे लागले होते.याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या ‘शेरनी’या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असताना त्यावेळी वन मंत्री असलेले विजय शहा यांनी विद्या बालनला भोेजनासाठी आमंत्रित केले ,जे विद्या यांनी विनम्रपणे नाकारले.परिणामी,सूडबुद्धीच्या शहा यांनी त्यांच्या वन खात्याने दिलेली चित्रिकरणाची परवानगी रद्द केली,इतकंच नव्हे तर चित्रिकरणासाठी जाणा-या पथकालाही वन क्षेत्रात प्रवेशापासून रोखले होते.शहा यांनी मात्र हे आरोप फेटाळले होते!याच शहा यांची भाषा ‘गटार’असल्याचे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले मात्र,भाजप सारखा ‘देशप्रेमी’पक्ष अद्यापही त्यांचा राजीनामा घेण्यास धजावला नसल्याने या पक्षाच्या देशप्रेमासोबतच ,मंत्रीप्रेम आणि प्रतिमाप्रेम याचे हे अमंगळ दर्शन समस्त भारतीयांना घडले.
देवडा यांनी तर लष्कराच्या शौर्यालाच मोदीं चरणी नतमस्तक करुन,भारतीयांच्या संतापात भरच घातली.त्यांना देखील दिल्लीश्‍वरांकडून अभय मिळाले असल्याने, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची मानसिकता समजून घेण्याची नव्याने गरज आता भासू लागली आहे.
इतका उद्यामपणा फक्त सत्ताधारी भाजपच्याच नेत्यांच्या अंगी मुरलेले नसून उत्तरप्रदेश सारख्या राज्यात अनेक दशके राज्य करणा-या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार राम गोपाल यादव यांच्याही मानसिकतेत तो मुरला आहे हे सिद्ध झाले.‘विंग कमांडर व्योमिका सिंह आणि एअर मार्शल ए.के.भारती हे कोण आहेत,हे जर या लोकांना माहिती असते तर त्यांनी त्यांना शिवीगाळ केली असती!’असे उद्दामपणाचे विधान करुन विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या अनुसूचित जातीकडे या वरिष्ठ सभागृहाच्या या महान मानसिकतेच्या खासदाराने अंगुलीनिर्देश केला!टिकेची झोड उठताच,उत्तर प्रदेशात अल्पसंख्यांक,दलित आणि मागावर्गींयावर होत असलेल्या अत्याचारांचे संदर्भ त्यांनी दिले!

मूळात लष्करात जात,धर्म,प्रदेश,भाषा,लिंग असा कोणताही भेदाभेद नसताना,काही राजकीय नेत्यांचा अति असंवेदनशीलपणा व उद्दामपणा हा लष्कराच्या अस्मितेवरच कठोर कुठाराघात करताना दिसून पडत आहेत,यातून अनेक माजी लष्करी अधिकारी हे पराकोटीचे संतप्त झाले असून,तुमच्या तुच्छ राजकारणापासून भारतीय लष्कराला दूरच ठेवा,असे आव्हान सोशल मिडीयावर व्हिडीयो पोस्ट करुन करीत आहेत ज्याला मोठ्या प्रमाणात भारतीयांकडून प्रतिसाद मिळत आहे.
देशाची सुरक्षा लष्कर करीत असते.उद्या लष्कराने त्यांचे कर्तव्य नाकाराले तर,देशाचा पंतप्रधान मंत्रीमंडळाला घेऊन सीमेवर जाऊन लढणार नाही,याचे भान तरी राजकीय नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे.मोदींची प्रतिमा उजळताना आपल्या देशाच्या लष्कराच्या प्रतिमेला,शौयाला ठेस लागता कामा नये, हे देशातील खासदार व मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाला सांगावे लागत आहे,शिकवावे लागत आहे,याची तरी लाज खासदार आणि मंत्री म्हणून मिरविणा-यांनी बाळगावी आणि ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलकीच वैरी’हे बोल लक्षात ठेवून कृती करावी,एवढीच अपेक्षा सध्या समस्त भारतीय या राजकारण्यांकडून करीत आहे.
………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या