Advertisements


पंतप्रधानांपासून सर्व पक्षीय राजकीय नेतेच करतात हिंदू-मुस्लिमांचे राजकारण :पत्रकाराने
मतदानाचे आकडे प्रसिद्ध करने झाला गुन्हा
नागपूर,ता.१९ जून २०२४: हल्लीची पत्रकारिता ही ज्या वळणातून किंबहूना संक्रमणातून जात आहे, ती पत्रकारितेच्या विश्वासहर्तेवर फार मोठे आव्हान उभी करणारीच आहे.अशातच आपापसातील भांडणाचे उट्टे हे पत्रकार परिषद घेऊन काढण्यात येत असतील तर सुजाण नागरिकांवर डोके बदडून घेण्याचीच वेळ आली,असेच आता म्हणावे लागेल.
मागील बुधवारी नागपूरातील पत्रकार भवनात काँग्रेसचे नेते मोहम्मद वसीम यांनी एका प्रतिष्ठित दैनिकाच्या पत्रकाराच्या विराेधात पत्रकार परिषद घेतली.यामध्ये त्यांनी पत्रकाराने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत मुस्लिम बहूल बूथवरुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना १६ हजार ४१४ मत पडली तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी त्या बूथवरुन ७६,००९ मते घेतली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.या वृत्तानंतर वसीम यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांचा भडीमार संबंधित पत्रकार व दैनिकावर केला.
मात्र,त्या पत्रकारासाेबत वसीम यांचे वैयक्तिक भांडण होते व याच भांडणाची परिणीती हाणामारीत देखील झाली होती,हे वास्तव समोर आले आहे.काँग्रेस नेहमीच मुस्लिमांचा कैवार घेते मात्र,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील या देशातील मुस्लिम धर्मियांची शैक्षणिक,सामाजिक,राजकीय आणि आर्थिक प्रगतीचा सच्चर आयोगाचा, डोळे उघडणारा अहवाल त्यांना देशात लागू करण्यापासून कोणी रोखले होते?केंद्राच्या सत्तेत सहा दशकांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता राहीली मात्र,मुस्लिमांच्या सामाजिक,राजकीय व आर्थिक उत्थानासाठी कोणत्याही ठोस योजना राबविण्यात आल्या नाही.केवळ,भाजपची भीती दाखवून व्होट बँकसारखा मुस्लिम मतदारांचा उपयोग काँग्रेस करीत आली असल्याचा आरोप देशातील अनेक बुद्धिजीवी मुस्लिम उघडपणे करतात.
वसीम यांची पत्रकार परिषद मुस्लिम मतांच्या मुद्दावर असून त्यांना अशी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडण्याचा संवैधानिक अधिकार आहे मात्र,भाजपला मिळालेली १६ हजार मते आणि त्याची झालेली माध्यम प्रसिद्धी, ही काँग्रेसमध्ये अनेकाना न रुचणारीच होती.त्यामुळे ज्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वसीम यांना पक्षात आणले अशी माहिती काँग्रेसचा कार्यकर्ता देतो, त्यांची वसीम यांच्या या विषयावरील पत्रकार परिषदेला संमती होती का?राजकारणाचा हा स्तर त्यांनाही अपेक्षीत होता का?असा सवाल विचारला जात आहे.
मुस्लिम मतांवर फक्त काँग्रेसचीच परंपरागत मक्तेदारी आहे,असा त्यांचा दावा आहे का?इतर राजकीय पक्षांनी मुस्लिमांची मतेच घेऊ नये,असा त्यांचा होरा आहे का?पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा ही विरोधी पक्षाच्या मतांचाही आदर करणारी आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या उपराजधानीत गडकरी यांना स्व-प्रतिमेवर मिळालेली साढे सोळा हजार मुस्लिम मते, याचा खरे तर दिलदार मनाने काँग्रेसच्या नेत्यांनी स्वागत आणि ‘आत्मचिंतनही’ करायला हवे होते मात्र,असे घडले नाही.काँग्रेसचा एक नेता चक्क पत्रकार परिषद घेऊन पत्रकाराने प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर प्रखर टिकेची झोड उठवतो.तो ही असा नेता ज्याची वैयक्तीक खुन्नस त्या पत्रकारासोबत होती!वसीम यांनी वारंवार संपादकाचाही उल्लेख करीत, संपादकांनी दिलगिरी व्यक्त करीत आमच्या ‘ज्यूनिअर’ने ते वृत्त लिहल्याचे संपादकांनी सांगितले अशी माहिती वसीम पत्रकार परिषदेत सांगतात यावरुन त्या संपादकांचीही ‘कुवत’ लक्षात येते.
आपल्या पत्रकाराने संशोधन करुन आकडेवारीसह वृत्त लिहले व ते मुख्य बातमीदार ते संपादकांच्या नजरेखालून गेल्यावरच प्रसिद्ध ही झाले.अशावेळी आपल्या पत्रकाराच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याऐवजी आक्षेप घेणा-यांची बोळवण,हे पत्रकारीतेच्या तत्वाला अपेक्षीत होतं का?असा सवाल आता केला जात आहे.
शहरातील काही बुद्धिजीवींनी तर मुस्लिम मतांची अशी आकडेवारी प्रसिद्ध करण्यावरच आक्षेप नोंदवत, हा गुन्हा असून असे वृत्त प्रसिद्ध करणा-यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे,असा संताप व्यक्त केला.मात्र,मुस्लिम या देशाचे नागरिक नाहीत का?मतदानात त्यांचा सहभाग नसतो का ?मग एखाद्या पत्रकाराने तसेच दैनिकाने जाहीर केलेली आकडेवारी ही लोकशाही देशात इतकी गांर्भीयाने घेणारी बाब कशी?असा सवाल केला जात आहे.देशांच्या पंतप्रधानापासून तर सर्वच पक्षाचे राजकीय नेते हे हिंदू-मुस्लिम धर्माचे राजकारण करीत, आपापली राजकीय पोळी शेकतात तेव्हा मतदानाच्या प्रसिद्ध होणा-या आकडेवारीवर आक्षेप घेणारे बुद्धिजीवी त्या राजकारण्यांना न्यायालयात का ओढत नाही?‘सोयीस्कर’धार्मिक प्रेम कसं होऊ शकतं?
मूळात अश्या प्रकारच्या राजकारणाच्या,या देशातील सुजाण मतदार किती आहारी जात असतो,हे यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाने दाखवून दिले आहे त्यामुळे,मुस्लिमांसह काेणत्याही जाती,धर्माच्या मतदानाची कितीही टक्केवारी आणि आकडेवारी प्रसिद्ध झाली तरी पत्रकारितेच्या मूल्याच्या चौकटीत ती चुकीची ठरु शकत नाही,उलट आपले वैयक्तिक उट्टे काढण्यासाठी पत्रकारितेलाच साधन बनविणा-यांचा निषेध करने गरजेचे ठरते ,यात दूमत असू शकत नाही.
‘सत्ताधीश’ने या आरोपांबाबत वसीम यांची बाजू समजून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले मात्र,संपर्क होऊ शकला नाही.
……………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
