Advertisements


पुणे: शिवसेना आणि भाजपमधील मुख्यमंत्रिपदाच्या वादावर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खोचक टीका केली आहे. आपलं काम सरकार आणणं आहे, कुणाला मुख्यमंत्री करणं नाही, असा टोला नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लगावला आहे. मात्र गडकरी यांनी हा टोला शिवसेनेला लगावला की भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या महाराष्ट्रात वेगाने घटना घडताहेत. काही लोकांना मुख्यमंत्रिपद हवं आहे. पण आपलं उद्दिष्ट सरकार स्थापन करणं आहे. कुणाला मुख्यमंत्री करणं हे आपलं उद्दिष्टं नाही, असा टोला त्यांनी हाणला.
‘चांगल काम केलं की ते विसरलं गेलं पाहिजे. त्याची जाणीव करून देऊ नये. आपण तोंडाने आपले काम सांगू नये. लोक काम विसरत नाहीत. आपलं काम राष्ट्राच निर्माण करणं हे आहे. राष्ट्र निर्माणाचा विचार करतो तो पुढील शंभर वर्षांचा विचार करतो’, असंही ते म्हणाले. राज्यात सुरू असलेला सत्ताकारणाचा गोंधळ आणि भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, या देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी हे वक्तव्य करून या मुद्यातील हवा काढून टाकली आहे. त्यामुळे गडकरी यांनी त्यांच्या या प्रतिक्रियेतून एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे.
Advertisements

Advertisements

Advertisements
