Advertisements

‘महान’मराठी दिग्दर्शक आशिष उबाळे यांची नागपूरात आत्महत्या!
कलाकार सृष्टि स्तब्ध: आर्थिक विवंचनेतून उचलले पाऊल
मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार व उबाळे यांच्या एक्झिटचा ‘योगायोग’
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,शनिवार दिनांक १७ मे २०२५: नागपूरातील संपूर्ण कलासृष्टिला स्तब्ध करुन जाणारी घटना आज शनिवारी दुपारी उघडकीस आली.मूळचे नागपूरकर व पुढे मुंबईच्या सिनेसृष्टित स्थायिक झालेले सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आज धंतोली येथील रामकृष्ण मठात सेवेकरी असलेल्या भावाच्या खोलीत दुपारी आत्महत्या केली.हे वृत्त नागपूरसह मुंबईतील सिने जगतात पसरताच हळहळ व्यक्त झाली.आर्थिक विवंचनेतून उबाळे यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांचे जवळचे काही नाट्यकलावंत मित्र देतात.मात्र,अडीच-तीन कोटींसाठी नागपूरसह मुंबईतील सिनेजगत एक ‘महान’दिग्दर्शकाला कायमचा मुकला,अशी हळहळ व्यक्त केली जात आहे.आशिष यांनी मूळचे नागपूरातील वडीलोपार्जित घर विकून नव्वदीच्या दशकात आई-वडीलांसह मुंबई गाठली होती.ते ६० वर्षांचे होते.
मखमली आवाजाचे धनी असलेले जगजित सिंह यांनी त्यांच्या हयातीतील शेवटची गझल आशिष उबाळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ’आनंदाचे डोही’या चित्रपटात गायली होती.’तुझ्यामुळे आला नवा अर्थ माझ्या जिवनाला’असे त्या गझलेचे शब्द असून, महान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यावर या गझलेचे चित्रण झाले होते.अमर हळदीपूर यांनी संगीत दिले आहे.मात्र,हा आनंदाचा डोही अचानक आज काळोखात निजला व संपूर्ण जिवलग मित्र, परिवाराला दु:ख व हताशेच्या सागरात लोटून गेला.
धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी आशिष हे नागपूरात आले होते.धंतोलीतील रामकृष्ण मठात भावाला भेटण्यासाठी ते गेले असता मठामध्ये सेवेकरी असलेल्या भावाच्या विनंतीवरुन त्यांनी तिथेच मुक्काम केला.आज शनिवारी दुपारी दीड वाजता जेवण केले.सायंकाळी चहा घेण्यासाठी ते बाहेर न आल्याने सारंग उबाळे यांनी खोलीत जाऊन बघितले असता त्यांनी पंख्याला गळफास घेतला होता!
मिळालेल्या माहितीनुसार ’त्या शिवाय’चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आशिष उबाळे कलावंतांच्या चमूसह परदेशात केले होते मात्र,चित्रपटाला भांडवल पुरवणारे यांच्यात आपापसातील वादामुळे चमूला स्वत:चे पैसे खर्च करुन परत यावे लागले.या गोष्टीचा आशिष यांना जबर मानसिक धक्का बसला होता.या घटनेतून त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला होता.यातून ते सावरलेच नाहीत.;या घटनेमुळे अनेक कलावंतांसोबत संबंध ताणल्या गेले ज्यात त्यांचा कोणताही दोष नव्हता.
यानंतर लगेच मार्च २०२० पासून तब्बल दोन वर्षे कोराना या जागतिक महामारीने संपूर्ण जगासह सिनेसृष्टितील अनेक कलावंतांचे आर्थिक कंबरडे मोडले ज्यात आशिष उबाळे यांचा देखील समावेश आहे.तब्बल अडीच ते तीन कोटींचे कर्ज त्यांचावर होते.देणीदारांचे फोन कॉल्स त्यांच्या अतिशय संवेदनशील प्रतिभेवर क्रोर्याचे घाव घालत होते.ज्यांच्याकडून उसणे पैसे घेऊन चित्रपटात गुंतवणूक केली होती ते अतिशय ’क्रूर‘झाले होते,असा सरळ आरोप आशिष यांचे काही जवळचे मित्र करतात.
आशिष यांनी कोणालाही मदत देखील मागितली नाही.त्यांच्या आत्मसन्मानाला पंख्याला लटकून इहलोकाची यात्रा संपवणे मंजूर होते मात्र,नागपूरातील आपले जुने जिवलग मित्रांकडे त्यांनी आत्म्यावरील ओझे बोलूनही दाखवले नाही!दूसरीकडे नागपूरचेच सुप्रसिद्ध कलावंत डॉ.
विलास उजवणे यांना जेव्हा पहील्यांदा पक्षाघाताचा झटका आला त्यावेळी त्यांच्या खर्जातला भारदस्त आवाज व राजबिंडे व्यक्तिमत्व हरवले.मुंबईतील चित्रपट नगरीत तसेही जे ‘चलनात’असतात त्यांचीच कारर्कीद खणखणीत असते.ज्या कलावंतांचा उताराचा काळ असतो,त्यांची साधी तोंडओळखही ठेवण्याचा प्रघात मुंबईत नाही,असा आरोप नेहमीच केला जातो.डॉ.उजवणे यांचे आरोग्य व आर्थिक खर्चाची तोंडमिळवणी बघता त्यांच्या पत्नीने अंजली यांनी भावनिक पोस्ट फेसबुकवर केली होती.ज्याला संवेदनशील मनाच्या कलावंतांनी भरभरुन प्रतिसाद देत ,आर्थिक हातभार लावला होता.परिणामी,डॉ.उजवणे हे त्या पक्षाघातानंतर जितके पण आयुष्य जगले ते त्यांच्यावर प्रेम करणा-या जिवलगांकडून बोनस आयुष्य होते,असे म्हटल्या जाते.
आशिष यांनी मात्र,आपल्या मनातील आणि जिवनातील कोणतीही निराशा,मानसिक,भावनिक आंदोलने जिवलग मित्रांसोबत शेअर केलीच नाही,अखेर इतका निष्ठूर मार्ग,त्या निराशेतून सुटण्यासाठी स्वीकारला आणि नागपूरची कलावंतसृष्टि मनापासून हळहळली.
महत्वाचे म्हणजे आजच सकाळी राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांचे गृहनगरच नागपूर शहर आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी ११ ते २ वाजे दरम्यान हैदराबाद हाऊस येथे जनता दरबार घेतला आणि अवघ्या काही तासांनंतरच आशिष यांच्या आत्महत्येची बातमी सर्वदूर धडकली!आशिष यांनी अवघ्या अडीच ते तीन कोटींच्या कर्जासाठी आपल्या उपजत पारलौकिक प्रतिभेला अश्यारितीने संपवण्या ऐवजी, एकदा तरी मुख्यमंत्री यांची भेट घेतली असती तर कलाप्रेमी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच गृहनगरातील एका महान व प्रतिभावंत कलावंतांला अश्यारितीने अकाली मरणापासून वाचवले असते,असे अनेकांचे म्हणने आहे.दूर्देव,असे घडले नाही.
उगवत्या सूर्यालाच नमस्कार करणारी मुंबईची चित्रपटसृष्टि ही अतिशय निष्ठूर,असंवेदनशील व व्यवहारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.विदर्भाच्या मातीतच जगाला नि:स्वार्थपणे फक्त भरभरुन देणी देत राहणा-या स्वभावाच्या कलावंतांना त्यामुळेच, मुंबईतील चित्रसृष्टितील पराकोटीची व्यवहारिकता ही मनावर आघात करुन जाणारी ठरत असते.कलावंत हा मूळातच संवेदनशील असतो मात्र,हीच अगतिकता,हतबलता कौटूंबिक व व्यवसायिक पातळीवर अनुभवल्याने आशिष यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.महत्वाचे म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी स्वत:लाच एक मॅसेज टाकला असून,त्यात आपली भावना व्यक्त केली आहे.त्या मॅसेजमधील मजकूर अद्याप समोर आला नसला तरी,हाच संवाद त्यांनी मुख्यमंत्री यांच्या जनता दरबारात साधला असता तर….!नागपूरसह मुंबईची सिनेसृष्टि ही एका अतिशय महान दिग्दर्शकाला अश्यारितीने मुकली नसती.
आशिष यांचा गाजलेला चित्रपट ‘गार्गी‘याने आंतरराष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळवला होता.हा चित्रपट २००९ साली नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ सादर करण्यात आला होता.या चित्रपटाचे लेखन नागपूरातील आणखी एक अतिशय प्रतिभावंत व तितकेच संवेदनशील मनाचे लेखक श्याम पेठकर यांनी केले होते.प्रेमासाठी वाट्टेलते,बाबुरावला पकडा,या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील उबाळे यांनी केले होते.
मराठी वाहीन्यांमध्ये अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन आशिष उबाळे यांनी केले होते.यात अग्नि,एका श्र्वासाचे अंतर,गजरा,चक्रव्यूह इत्यादीचा समावेश आहे.
थोडक्यात,आनंदाचा डोही अश्यारितीने काळोखात निजल्याने नागपूरच्या कलाविश्वावर दु:ख आणि हताशाचे आभाळ कोसळले आहे,हे आशिष यांच्यासाठी शेकडो व्हॉट्स ॲपवरील मजकूर बघता सिद्ध झाले.
जगजित सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्याच ‘आखिरी हिचकी तेरे,जानो पे आये..मौत भी शायराना चाहता हूं…आ तुझे गुनगुनाना चाहता हूं…’अशी अवस्था गझलप्रेमींची झाली होती.आशिष यांच्या अकाली मृत्यूने देखील अशीच अवस्था नागपूरकर कलाविश्वाची झाली आहे…!
‘सत्ताधीश’तर्फे या महान कलावंतांला अखेरचा सलाम!
…………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
