
१५ जूनच्या निवडणूकीत पॅनलच बदलण्याचे शेखर सावरबांधे यांचे आवाहन

जवाहर विद्यार्थी गृहाच्या विद्यमान पॅनलवर केले गंभीर आरोप
दहा वर्षांपासून संस्थेची निवडणूकच नाही:धर्मादाय आयुक्तांचे १५ जून रोजी निवडणूक घेण्याचे आदेश
नागपूर,ता.३१ मे २०२५: सिव्हिल लाईन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह ही नागपूरातील एक नामवंत संस्था असून २०१५ पासून या संस्थेची निवडणूकच झाली नाही!परिणामी,धर्मादाय आयुक्तांनी १५ जून २०२५ रोजी जवाहर विद्यार्थी गृहाच्या सभागृहात निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे.गेल्या ३३ वर्षांपासून विद्यमान अध्यक्ष रमेश गिरडे व पॅनलवरील इतर सभासदांवर माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे.
गिरडे यांची संस्थेत एकाधिकारशाही चालत असून नवीन सभासद बनण्यापासून लोकांना ते वंचित ठेवत आहेत.इतकंच नव्हे तर फक्त आपल्या नातेवाईकांना सभासद करुन घेत वारंवार सत्ता काबिज करीत असल्याचा आरोप सावरबांधे यांनी केला.
धर्मादाय आयुक्तांनी २०१५ नंतर मागच्या दाराने सभासद झालेल्यांना या निवडणूकीत मतदान करण्यास बंदी घातली असल्याचे त्यांनी सांगितले.या निवडणूकीत विद्यमान पॅनल विरुद्ध ‘संताजी विकास पॅनल’ने दंड थाेपटले असल्याची माहिती त्यांनी दिली.या निवडणूकीत ते संताजी विकास पॅनलतर्फे अध्यक्ष पदाची निवडणूक लढत असून, नितीन कुंभलकर,धर्मराज रेवतकर,अॅड.जगदीश गायधने,नाना ढगे,डॉ.यशवंत खोब्रागडे,ॲड.पुरुषोत्तम घाटोळे हे पॅनलचे मार्गदर्शन करीत आहेत.
गिरडे यांच्यासह पॅनलवरील सभासदांवर न्यायालयाच्या आदेशानुसार भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले असून, त्यांना अटक होण्याची शक्यता ही नाकारात येत नाही,असे ते म्हणाले.एक सभासद कार्यकारीणीमध्ये एका पदावर जास्तीत जास्त दोनच वेळा निवडणूक लढू शकेल अशी व्यवस्था असणारी घटना दुरुस्ती करणार असल्याचे सावरबांधे यांनी सांगितले.
३३ वर्षांपासून एकच एक कार्यकारणी असल्यामुळे कमकुवत झालेली कार्यक्षमता,आर्थिक प्रशासकीय अनियमितता,हूकूशाही वृत्ती तसेच बोकाळलेला आर्थिक भ्रष्टाचार यावर सावरबांधे यांनी बोट ठेवले.जवाहर विद्यार्थी गृहाचा विकास पूर्णपणे ठप्प झाला असून मतदारांनी आम्हाला कल दिल्यास या वसतीगृहाचा चेहरा-मोहर बदलवून टाकू,असे आश्वासन त्यांनी दिले.
मी व रमेश गिरडे हे दोघेही काँग्रेसी आहोत मात्र,ही समाजाची निवडणूक असून यात राजकारणाचा संबंध नाही असे सावरबांधे म्हणाले.आमच्या पॅनलमध्ये सगळे उच्च विद्याभूषित असून ते वेगवेगळ्या व प्रतिष्ठित कुटूंबातील असून त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आपापली प्रतिभा सिद्ध केली आहे.महत्वाचे म्हणजे आमच्या ‘संताजी विकास पॅनल’मध्ये कोणीही कोणाचा नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले.विद्यमान अध्यक्ष गिरडे यांनी लाखो समाजबांधवाना सभासद होण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी त्यांनी गिरडे व त्यांच्या पॅनलवर अकार्यक्षमता,आर्थिक भ्रष्टाचार,अनियमिततेचे आरोप करीत, सुराबर्डी येथील जागा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले.यावर कायदेशीर कारवाई होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय दंडविधानाच्या कलम ४२०,४६४,४६८ व ३४ अन्वये विद्यमान अध्यक्ष रमेश गिरडे,गुलाब जुननकर,शंकरराव भुते,मिलिंद माकडे,चंद्रकांत ढोबळे व प्रमोद महाजन यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याचे सांगितले.
अनेक चांगले विकल्प उपलब्ध असताना बुटीबोरी येथे भुखंड घेण्यात आला यामध्ये देखील पारदर्शी व्यवहार करण्यात आला नाही.तसेच कुठलेही विकास कामाचा आराखडा नसताना १८ लक्ष रुपये विद्युत ट्रान्सफॉमर काही वर्षां आंधी लावण्यात आले ज्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप याप्रसंगी सावरबांधे यांनी केला. विद्यमान अध्यक्ष व त्यांच्या पॅनलने संस्थेचे पैसे मृत गुंतवणुकीत टाकले असून यामुळे संस्थेचा कोणताही फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले.

………………………….




आमचे चॅनल subscribe करा
