फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआता झाडीपट्टी ‘कलावंत’ संघटनेने घातला आसावरी नायडूंवर बहीष्कार!

आता झाडीपट्टी ‘कलावंत’ संघटनेने घातला आसावरी नायडूंवर बहीष्कार!

Advertisements

अधिकृत व नोंदणीकृत महामंडळाच्या बैठकीत मात्र बंदीचा निर्णय ’मागे’

‘झॉलिवूड‘चा वाद शमता शमेना

नागपूर,ता.२६ जुलै २०२२: ‘बंदी’हा शब्दच असंवैधानिक आहे.संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तर हा शब्द मुळीच अभिप्रेत नाही,त्यातल्या त्यात ही ‘बंदी’जर एखाद्या गुणी व प्रतिभावंत स्त्री कलावंताच्या अविष्कारावर घालण्याची बोलली जात असले तर ती असमर्थनीयच ठरते.गाजलेल्या ‘झॉलिवूड’ या चित्रपटाची लेखिका व ज्येष्ठ कलावंत आसावरी नायडू यांच्यावर एकीकडे झाडीपट्टीतील अधिकृत व नोंदणीकृत संघटना असलेल्या झाडीपट्टी महामंडळाने रविवारी तातडीची बैठक घेऊन,झाडीपट्टी निर्माता संघटनेतर्फे त्यांच्यावर लादण्यात आलेली बंदी मागे घेतली असली तरी आता झाडीपट्टीतील नोंदणीकृत नसलेल्या ‘कलावंत’संघटनेने मात्र उघडपणे आसावरी यांच्यावर लादलेली बंदी मागे घेण्यास ठामपणे नकार दिला आहे!
व्हायरल झालेल्या व्हॉट्स ॲप ग्रूप्समधील चॅटिंगमध्ये या संघटनेतील २५४ सदस्यांनी आपापली मते या ग्रूपवर ठामपणे व्यक्त केली आहे.झाडीपट्टीतील महामंडळ तसेच निर्मात्यांच्या संघटनांनी रविवारी ‘झॉलिवडू’चित्रपटावरील वादाच्या पार्श्वभूमीवर, बैठक आयोजित केली होती.अर्थात यासाठी आसावरी यांना हुडकेश्‍वर पोलिस ठाणे गाठावे लागले होते.

या पोलिस ठाण्यात त्यांनी लिखित तक्रार नोंदवली होती.पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत एखाद्या कलावंतावर हेतूपुरस्सर डूग धरुन,कटकारस्थान करुन बंदीची भाषा बोलणे हे बेकायदेशीर असल्यानेच त्यांनी न्यायासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.पोलिसांनी देखील हा विषय संवेदनशीलतेने हाताळला व कोणाच्याही उपजिविकेवर, कटकारस्थान करुन आघात करणा-या या कृत्याच्या विरोधात, नोंदणीकृत व अधिकृत नसलेल्या झाडीपट्टी निर्माता संघटनेचे अध्यक्ष परमानंद गहाणे यांना पोलिस ठाण्यात पाचारण केले.

गहाणे यांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात येताना अनेक समर्थक सोबत आणले मात्र हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिका-याने गहाणे यांना कडक शब्दात समज दिली.भारत या देशात कोणत्याही कारणास्तव कोणावरही ‘बंदी’घालता येत नाही,ही बेकायदेशीर कृती असून त्वरित संघटनेची बैठक बोलवा,त्याची व्हिडीयो शुटींग करा व आसावरी नायडू यांच्यावरील घातलेली बंदी मागे घेत असल्याची घोषणा करा,अशी सूचना गहाणे यांना देण्यात आली.

कायद्याला अनुसरुन झाडीपट्टीच्या महामंडळ संघटनेचे अध्यक्ष अरुन वनकर यांनी पुढाकार घेत ही बैठक रविवारी आयोजित केली.या बैठकीत निर्माता संघटनेचे अध्यक्ष परमानंद गहाणे यांची देखील उपस्थिती होती मात्र या बैठकीवरच झाडीपट्टी‘ कलावंत’ संघटनेने बहीष्कार घातला व बैठकीला अध्यक्ष येणे अपेक्षीत असताना प्रतिनिधी पाठवून दिला.

कलावंत संघटनेचे अध्यक्ष शेखर पटले हे असून कोणत्याही परिस्थितीत अासावरी नायडू यांच्यावरील बंदी कलावंत संघटना मागे घेणार नसल्याची मुक्ताफळे या व्हॉट्स ॲप ग्रूपवर उधळण्यात आली. रविवारची ही बैठकच या संघटनेच्या सदस्यांनी ‘चुकीची’ठरवली.हा प्रश्‍न एकट्या निर्माता संघटनेचा नसून झाडीपट्टी कलावंतांच्या अस्मितेचा असल्याचा कांगावा या ग्रूपवर करण्यात आला.

निर्माता म्हणजे कलावंत नाही तर कलावंतांमुळे निर्माता आहेत!असा ’जावई’ शोध ही ग्रूपच्या कलावंतांने लावला.झाडीपट्टी महामंडळ किवा निर्माता संघटनेने घेतलेला निर्णय कलावंत संघटनेने मान्यच केला पाहिजे,अशी आमच्यावर कोणतीही जबरदस्ती नसल्याचे इशारेे देखील देण्यात आले.ज्ञानेश्‍वरी कापगाते या झाडीपट्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीने तर भर सभेत अासावरी यांना श्रीमुखात लावणार असल्याची धमकी दिली होती.

हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला मात्र काहीही झाले तरी वाहिनी तसेच यू-ट्यूबवर प्रदर्शित होता कामा नये,यासाठी या चित्रपटाच्या निर्माता,दिग्दर्शक व लेखकालाच बैठकीत बोलावून जाब विचारयला हवा,असे देखील सूचित करण्यात आले.लेखिका आसावरी नायडू यांनी एखाद्या वारांगणालाही लाजवेल असे प्रदर्शन झाडीपट्टीचे आपल्या चित्रपटात केले असल्याचा आरोप ही करण्यात आला.

जो कलावंत झाडीपट्टीमध्ये काम करतो,नाव कमावतो तोच कलावंत झाडीपट्टीची बदनामी करीत असेल तर अश्‍या कलावंतासोबत कलावंत संघटना काम करणार नसल्याचा पुर्नउच्चार करण्यात आला.

मूळात या चित्रपटाला विरोध आहे की फक्त चित्रपट लेखिकेच्या प्रतिभेला? याबाबत मात्र कोणीही उघडपणे बोलत नाही. महामंडळ संघटनेच्या बैठकीत कलावंत संघटनेच्या अध्यक्षाने येणे अपेक्षीत असताना या संघटनेचे अध्यक्ष शेखर पटले हे अनुपस्थित राहतात कारण त्यांना आपण नायडू यांच्यावर बंदी अथवा बहिष्कार का घालत आहोत याचे कारण सांगावे लागेल जे त्यांनी टाळले.

सात वर्षांच्‍या अथक प्रयत्‍नांनंतर पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची पार्श्‍वभूमी लाभलेला ‘झॉलिवूड’ हा चित्रपट तयार झाला आहे. ‘झॉलिवूड’ हा चित्रपट झाडीपट्टीचा इतिहास सांगणारा ‘माहितीपट’ नसून झाडीपट्टी रंगभूमीवर घडलेल्‍या काही ‘निवडक’ सत्‍य घटनांचा आधार घेऊन त्‍यांना एका ‘काल्‍पनिक’ कथेत गुंफून अत्‍यंत प्रामाणिक हेतूने तयार केलेला चित्रपट आहे.

या चित्रपटाची कथा आसावरी नायडू यांची असून दिग्दर्शन व पटकथा तृषांत इंगळे यांची आहे. हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. फ्रान्स चित्रपट महोत्सवात स्पेशल ‘ज्युरी अवॉर्ड’ ने सन्मानित करण्‍यात आले असून ‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातर्फे ही या विदर्भात तयार झालेल्‍या चित्रपटाच्‍या कलावंतांना विशेषत्‍वाने आमंत्रित करण्‍यात आले होते.

चित्रपट व साहित्‍य क्षेत्रातील अनेक दिग्‍गज लोकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतूकही केले . एकीकडे, सर्वत्र चर्चिल्‍या गेलेल्‍या व कौतूकाचा वर्षाव झालेल्या चित्रपटाच्याच लेखिका, आसावरी नायडू यांच्‍यावर मात्र झाडीपट्टी निर्माता संघटनेचे अध्‍यक्ष ’परमानंद गहाणे’ व झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाने बहिष्कार टाकला होता. आसावरी नायडू यांनी झाडीपट्टीची बदनामी केल्‍याचे कारण पुढे करत, या दोन संघटनांनी त्‍यांच्‍यावर आजन्‍म बंदी घातली होती!

पटले यांच्या या भूमिकेमुळे झाडीपट्टीतील निर्माते अडचणीत आलेेत कारण शेवटी त्यांना त्यांचे चित्रपट झाडीपट्टी कलावंतांसोबतच करावे लागत असतात.कलावंत संघटनेच्या या भूमिकेमुळे आता आसावरी यांना पुन्हा न्यायासाठी पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे.आसावरील यांनी झाडीपट्टी कलावंत संघटनेच्या अध्यक्षांना, त्यांच्यावर ही बंदी घातली असल्याचे लिखितमध्ये देण्याची मागणी केली आहेत.

माध्यमांशी बोलताना आसावरी यांनी लवकरच हा चित्रपट आता माध्यमकर्मींनाच दाखविला जाणार असून ,या चित्रपटात एक ही अश्‍लील किवा बदनामीकारक दृष्य नाही,अगदी नायकाने नायिकेच्या नखालाही स्पर्श केला नाही तरी देखील झाडीपट्टीची ‘बदनामी’या सबबीखाली गेल्या कित्येक दिवसांपासून माझ्या पोटापाण्यावर पाय देण्याचे व माझ्या अस्मितेवर घाव घालण्याचे कटकारस्थान सुरुच असल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.हा चित्रपट निवडक सत्य घटनांचा अाधार घेऊन काल्पनिक कथेत गुंफण्यात आल्याचे डिसक्लेमर पडद्यावर दाखविण्यात आले आहे मात्र झाडीपट्टीतील झाडूनपुसून अनेक कलावंत,निर्माते यांनी याकडे ‘सोयीस्करपणे’ दूर्लक्ष करुन एका अतिशय यशस्वी,प्रगल्भ व प्रतिभासंपंन्न कलावंतांवरच ‘झाडीपट्टीची बदनामी’ या सबबीखाली बहीष्काराची भाषा अवलंबलेली आहे.

‘चित्रपट’हे किमान या देशात तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक माध्यमच आहे.या माध्यमातून अनेक जण आपली रोजी रोटी कमावतात.प्रतिष्ठा,मानसन्मान कमावतात.ज्यांना हे जमत नाही ते मात्र आपापल्या मत्सरातून बंदी,बहीष्काराची भाषा उच्चारतात.आसावरी नायडू या गुणी कलावंतासोबत पुरोगामी महाराष्ट्रात तरी हेच अघटित घडत आहे.दूर्देवाने अनेक थोर कलावंत व मध्यवर्ती महामंडळाचे सर्वेसर्वा नरेश गडेकर याच नागपूर शहरात वास्तव्य करतात मात्र ते देखील अश्‍या अन्यायकारक ‘फतव्यां’विरोधात मौन रागात असलेले आढळून येत आहेत!

परिणामी आसावरी नायडू यांची अस्तित्व आणि स्वाभिमानाची लढाई रविवारच्या बैठकीनंतरही संपुष्टात आली नसून, ती आता वेगळ्या पातळीवर सुरु झाली आहे.या संघर्षात देखील कायदेशीर पातळीवर लढण्याची तयारी केली असल्याचे आसावरी सांगतात.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या