

सकारात्मक पाऊलची रंगली चर्चा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर, ता. ३ मे: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ३ जून ,आज वाढदिवस!महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्या कक्ष्ात जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. महापौर यांचे पाऊल म्हणजे ’एक सकारात्मक सुरवात’असा याचा अर्थ घेण्यात आला असल्याची चर्चा आज मनपात चांगलीच रंगली.
मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो तरुणाई तसेच मुंढेच्या कामाचे समर्थक असणा-या नागरिकांनी आज आपला व्हॉट्स ॲपवरील ’डीपी’हा मुंढे यांचा ठेऊन स्टेट्स ही ’आम्ही तुमच्या सोबत आहोत’ठेवला होता,यावरुन नागपूर शहरात मुंढे यांची फक्त तीन महिन्यातील कार्यकाळातील, सोशल मिडीयावरील प्रसिद्धी किती शिगेला पोहोचली आहे,याची प्रचिती येते.
गेल्या काही दिवसात ‘मुंढे वर्सेस महापौर’ असा चांगलाच वाद माध्यमांमध्ये रंगला होता. महापौरांनी मुंढे यांना ‘कडक’भाषेत पत्र देखील पोहोचवले होते.मात्र या सर्व वादांवर पडदा टाकून मुंढे यांच्या वाढदिवशी महापौरांनी त्यांची अनौपचारिक भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच नव्हे तर कोरोना पूर्वी देखील मुंढे आणि महापौरांमध्ये कोणताही ‘संवाद’साधल्या गेला नव्हता. आजच्या अनौपचारिक भेटीदरम्यान देखील महापौर आणि आयुक्तांमध्ये ,औपचारिक किवा अनौपचारिक संवाद झाल्या असल्याची शक्यता ही ‘शून्य’असल्याचे वर्तवले जात आहे,मात्र मुंढे यांचे अभिष्टचिंतन करुन महापौरांनी एक पाऊल मागे घेतल्याचा ‘संकेत’मुंढे व नागपूरकर जनतेला दिला असल्याचे बोलल्या जात आहे.
वास्तविक पाहता महापौर म्हणजे ‘सरकार’आहे.मुंढे म्हणजे ‘प्रशासन’आहे. परिणामी मुंढे यांनीच महापौरांची अनौपचारिक भेट घेणे ईष्ठ ठरले असते किंबहूना परंपरेला धरुन असते मात्र असे घडले नाही. मुंढे हे मनपात आयुक्त पदी २७ जानेवारी रोजी नियुक्त झाले.२८ जानेवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त हे महापौरांची औपचारिक भेट घेतात.आजवर रुजू झालेल्या सर्व मनपा आयुक्तांनी ही परंपरा जोपासली मात्र मुंढे याला अपवाद ठरले होते. कार्यभार स्वीकारल्याच्या अनेक आठवड्यांनंतर मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांची अनौपचारिक भेट घेतली होती,माध्यमात हा विषय चांगलाच गाजला होता.
आजही मुंढे महापौरांच्या भेटीला येणार नाहीत,हे सर्वविदीतच असल्यामुळे,महापौरांनी पुढाकार घेऊन मुंढे यांची भेट घेऊन,सकारात्मक पाऊल टाकले,असे म्हटल्या जात आहे.
मात्र दूसरीकडे मुंढे यांची प्रचंड लोकप्रियता पाहून महापौरांनी एक पाऊल मागे घेतले असल्याचा अर्थ देखील या भेटीतून काढण्यात आला.महापौरांनी मुंढेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला,असा देखील संदेश या भेटीतून गेला असल्याचे बोलले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
