

…आणि पाणी परीक्षेत महापौर ‘नापास’
डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)
नागपूर: सध्या शहरातील ‘पाणी’ प्रश्न हा प्रत्येक नागरिकाला जीवघेण्या पद्धतीने भेडसावतो आहे. एका दिवसा आड पाणी पुरवठा शहराला होत आहे. यातही गढूळ,अशुद्ध पाण्याचा पुरवाठा सातत्याने होत आहे. अर्धे शहर हे फक्त पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. डॉक्टरांकडे पोटाच्या रुग्णांची संख्या लक्ष् णीय स्वरुपात वाढली अाहे. ‘पाणी उकळून प्या’या सल्ल्यासोबत पॉवरचे एंटिबायटिक गोळ्या शहरवासियांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावी लागत आहे. नुकतीच २१ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय चांगलाच गाजला.आरो पाण्याने देखील नागरिक आजारी पडत असल्याचा आरोप विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी सभागृहात केला. पाण्याचे नमूने घेण्यात आले आहेत का?हा प्रश्नही नगरसेवकांनी उपस्थित केला. ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी त्यांच्याही प्रभागात अतिशय गढूळ पाणी येत असल्याचे महापौरांच्या निर्दशनास आणले. एवढेच नव्हे तर सभागृहात सभासदांना तसेच पत्रकारांना दिले जाणारे पाणी हे सुद्धा गढूळ असून यातून दुर्गंधी येत असल्याचे आभा पांडे यांनी सांगितले. पाण्याचा ग्लास त्या सरळ महापौरांच्या आसनासमोर घेऊन आल्या,महापौरांनी ग्लास मधील पाण्यात डोकावून पाहीले…गंध घेतला आणि ‘नाही पाणी तर शुद्धच आहे’अस प्रमाणपत्रही क्ष् णात देऊन टाकले. तेव्हा आभा पांडे यांनी ‘तुम्ही हे पाणी पिऊन दाखवा’असे आव्हान महापौरांना केले असता…महापौरांनी ग्लासमधले पाणी न पिता टेबलवरील बिसलरीचे पाणीच पिणे पसंद केले!
महापौरांना चांगली संधी होती ‘पाणी’ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची मात्र त्या पाणी परीक्षेत ‘नापास’ झाल्याची चर्चा नंतर सभागृहा बाहेर चांगलीच रंगली. एकीकडे लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी देशातील दलित नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी महापौरांच्या पक्ष्ाचे राष्ट्रीय अध्यक्ष् अमित शहा असो किंवा देशातील सर्वात मोठ्या राज्यातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो, दलितांच्या घरी जाऊन,जमिनीवर पालथी मारुन चक्क जेवायला बसले होते, येथे तर महापौरांना फक्त ग्लासभर पाणीच प्यायचे होते मात्र ते त्यांनी पिण्याचे टाळले. शहरातील महापौर ३० लाख नागरिकांना जे पाणी प्यायला देतात,ते पाणी त्या स्वत: सभागृहात पित नाहीत असे चित्र बाहेर उमटले. मनपा आयुक्त यांच्याही टेबलवर बिसलरीचे पाणी ठेवले होते, शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ज्या महानगरपालिकेवर आहेत त्या संस्थेचेच प्रमुख स्वत: बिसलरीचे पाणी पितात मात्र नागरिकांना एका दिवसा आढ येणारे पाणी देखील शुद्ध देऊ शकत नाही याचा राग आता नागरिकांच्या मनात खदखदतोय.
सध्या तोतलाडोहमध्ये ३२.२३ दशलक्ष् घनमीटर पाणी उपलब्ध आहे. शहराला दररोज ६६० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. कामठी-खैरी व गोधनी या दोनच ठिकाणी पाण्याच्या शुद्धतेसाठी फिल्टर बसविण्यात आले आहे.पाण्याच्या शुद्धतेसाठी पाण्यात मिसळले जाणारे क्लोरिनची मात्रा पीएच व्हॅल्यूप्रमाणे ७ राहीली पाहीजे मात्र कितीप्रमाणात हे औषध मिसळण्यात आले,याची माहिती अधिकार्यांना देखील नाही.
अनेक प्रभागात डायरेक्टर गडरलाईनमधून पाणी पुरवठा!
नागपूर शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून कितीही वाखाण्याजोगे होत असले तरी या शहराची संपूर्ण पाण्याची पाईप लाईनच ही जीर्ण झाली आहे. अनेक प्रभागात तर गडर लाईनमधूनच पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा होत आहे. ओसीडब्ल्यूसोबत करार करताना मनपाने तत्कालीन बजेट लक्ष्ात घेऊन शहरातील फक्त ३० टक्केच पाईप लाईन बदलण्याचा करार केला. या ३० टक्क्यांपैकि जवळपास दहाही झोनमध्ये ९८ टक्के काम ओसीडब्ल्यूने पूर्ण केले मात्र उर्वरित ७० टक्के जीर्ण पाईप लाईन बदलण्यासाठी महापालिकेकडे कोणतेही नियोजन नाही. दृरदृष्टि नाही किंवा ईच्छाच नाही. अद्यापही ’सब चलता है’याच मानसिकतेमध्ये पालिका प्रशासन व सत्ताधारी मनपा चालवित असल्याचे बघावयास मिळतंय. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे देखील मनपाच्या एकंदरित कामकाजाने त्रस्त्र आहेत. अनेक सभांमध्ये त्यांनी उघडपणे मनपाच्या ढिसाळ आणि सुस्त कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र एका दिवसा आड पाणी पुरवठा सुरु झाला, उन्हाळा नको तेवढा लांबला, पेंच,कन्हान,तोतलाडोह येथील पाण्याच्या पातळीने कधी नव्हे इतका खोल तळ गाठला आणि पोटाच्या विकारांनी नागरिक चांगलेच हैराण होऊन आता असहनीय होऊन पोट विकार तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये रांगा लाऊ लागल्याचे दृष्य बघायला मिळतंय.यावर एकमेव उपाय म्हणजे ४०-५० वर्षांपूर्वीची उर्वरित ७० टक्के देीखल जुनी आणि जीर्ण पाईप लाईन बदलून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हाच आहे अन्यथा महापौर या स्वत: विसलीरचे शुद्ध पाणी पित राहतील व सभागृहातील मान्यवर नगरसेवक,पदाधिकारी व पत्रकारांना दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यातच समाधान मानावे लागेल.
एकूण चार टप्प्यात ओसीडब्ल्यू करते पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया
कन्हान व पेंचमधील पाणी प्रक्रिया प्लान्टवर चार पातळीवर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते यात क्लोरिनची मात्रा व्हीटीपीद्वारे, इएसआर इनलेट आणि आऊटलेट तसेच टेल एन्डवर पुन्हा तपासली जाते. याचा अर्थ शहरातील नागरिकांचे पोटाचे आरोग्य बिघडण्यासाठी फक्त मनपाचा वेळकाढूपणा आणि निष्काळजी धोरणच जबाबदार आहे,असेच म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
