

पुण्याच्या विमानतळावर बोर्डीग पासच्या काऊंटरवर तूफान गर्दी:इंडिगोने कमावला डबल नफा!
नागपूर,ता. १३ जून: नागपूरातील एक तरण अनुप बळीराम क-हाडे हा गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागात अडकून पडला होता. ३१ मे नंतर विमानसेवा सुरु झाल्यानंतर त्याने ही पुणे-नागपूर प्रवासासाठी ‘इंडिगो’चे तिकीट बूक केले. गुरुवार दि.११ जूनचे दूपारी २ वाजता उड्डाण भरणा-या इंडिगो विमानाने तो नागपूरला परत येणार होता मात्र दुपारी १२ वा.म्हणजे २ तास अाधी विमानतळावर पोहोचल्यावर ही त्याला बोर्डींग पासच मिळाले नाही,कारण बोर्डीग पास देणारे दोनच काऊंटर तेथे उपलब्ध होते ज्यावर शेकडो प्रवाश्यांची तूफान गर्दी लोटली होती,परिणामी हक्काचे तिकीट काढूनही इंडिगोच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका अतिशय सामान्य कुटुंबाचा तरुणाईला,त्याची कोणतीही चूक नसताना, चक्क ४ हजार ५०० रु.चा भुर्दंड सोसावा लागला!

काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तीन महिन्यांच्या लॉक डाऊननंतर सर्वांनाच जोरदार ‘नफा‘कमावायचा असल्याने विमानसेवा असो,खाजगी शाळा असो,उद्योग,व्यवसाय असो किवा सर्वसाधारण दूकानदारी असो,प्रत्येकाने गेल्या तीन महिन्यांचे नुकसान एकमुश्त भरुन काढण्यासाठी, नीती-मुल्ये बाजूला सारुन,सर्वसामन्य माणसांची लृट सुरु केल्याचे दृष्य समाजपटलावर उमटल्याचं दिसून पडतंय.
या तरुणाचे वडील एक सामान्य किराणा दूकानदार आहे. हा तरुण मुंबईत एका खासगी कंपनीत काम करतो.मात्र मुंबईत झपाट्याने वाढती रुग्णसंख्या लक्ष्ात घेता त्याने पिंपरी-चिंचवड येथील नातेवाईकाच्या घरी राहणे पसंद केले.लॉक डाऊनचा काळ एवढा ‘प्रदीर्घ’लांबेल,याची त्यालाही कल्पना नव्हती. रेल्वे,बससेवा तसेच खासगी वाहनांना देखील लॉक डाऊनच्या काळात परवानगी नव्हती. नागपूरात त्याची आई,बाबा व धाकटा भाऊ हे सतत चिंतित होते.
अद्यापही रेल्वेसेवा अखंडीत नसल्याने हिंमत करुन एकदाचे विमानाचे तिकीट काढले. ४५ मिनिटात नागपूराला पोहोचू,अशी आशा या तरुणाने उराशी बाळगली होती,मात्र नफेखोर इंडिगो कंपनीने या आणि अश्या कितीतरी प्रवाश्यांना बोर्डींग पासच्या नावाखाली हेतूपुरस्सर बाहेरच ताटकळत ठेवले व त्यांनी वेळेत विमानतळावर पाेहोचले असताना इतरांना त्यांच्या जागी दुहेरी-तिहेरी नफा कमावून विमानाचे उड्डाण केल्याची तक्रार तेथील प्रवाश्यांनी केली.
हा तरुण पिंपरी-चिंचवड ते पुणे विमानतळ ५०० रु.ची कॅब करुन पोहोचला होता. परिणामी त्याला ५ हजार रुपयांचा फटका बसला असून अजूनही तो मानसिक धक्क्यात आहे.प्रवाश्यांची कोणतीही चूक नसताना इंडिगो व्यवस्थापानाने प्रवाश्यांची अशी लृट माजवली असल्याने आता या तरुणाने कन्झ्यूमर फोरममध्ये दाद मागण्याचा निश्चय केला आहे. त्यासोबतच पुणे विमानतळावर कोरोनापासून बचावासाठी अत्यावश्यक असणारे सुरक्ष्ति अंतराचे कोणतेही नियम या दोन्ही काऊंटरवर पाळण्यात आले नसल्यामुळे शेकडो नागरिकांचाही जीव धोक्यात आले आहे.
या तरुणाने तेथील कर्मचा-यांना वारंवार विनंती केली,त्याला आधी आत जाऊ द्यावे कारण त्याची २ वा.ची फ्लाईट आहे,मात्र तेथील कर्मचा-यांनी वेळेचे कोणतेही गांर्भीय पाळले नाही,बोर्डींग पासच्या नावाखाली अतिशय शुल्लक माहितीही हळूहळू भरली जात होती.परिणामी गर्दीचा अतिरेक झाला व या तरुणाला हताश होऊन पुन्हा पिंपरी चिंचवडला परतावे लागले.
विशेष म्हणजे गूगलवर इंडिगोची साईट उघडली असता त्यावर केवळ विमानसेवेची माहिती अपलोड असून एकाही जवाबदार पदाधिकारी यांचा संपर्क क्रमांक यात देण्यात आला नाही,त्यामुळे या प्रकरणावर इंडिगो व्यवस्थापनाची बाजू समजून घेता आली नाही.या आधी लॉक डाऊनच्या काळातच अनेक विमान कंपन्यांनी तिकीट बुकींग करुन भरघोस नफा कमावला यानंतर केंद्रिय मंत्र्यांची कान उघाडणी झाल्यानंतर प्रवाश्यांचा पैसा परत केला.
नुकतेच नागपूरातील एका नामांकित शाळेने विद्यार्थ्यांना ३० रु.चा मास्कसाठी ३५० रु.दर आकारला असल्याने पालक हैरान आहे. दूसरीकडे अनेक किराणा दूकानदारांनी जिन्नसांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवले असून,ग्राहकांची लृट चालवली आहे. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे केवळ आणि केवळ आता सामान्य नागरिक,सर्वसामान्य पालक, प्रामाणिक प्रवाशी हे भरडले जात असल्याचे दिसून पडत आहे.
तरुणाने कन्झ्यूमर फोरममध्ये इंडिगोविरोधात तक्रार दाखल करावी- डॉ.अमित हेडा(अध्यक्ष्,ग्राहक न्याय परिषद)
इंडिगोच नव्हे तर सध्या सर्वच क्ष्ेत्रात ग्राहकांच्या प्रति नफेखाेर व्यवसायिकांनी जो रवैय्या स्वीकारला आहे तो अतिशय असंवेदनशील असून या तरुणाने पुढे येऊन नि:संकोचपणे, कन्झ्यूमर फोरममध्ये इंडिगो व्यवस्थापना विरोधात तक्रार दाखल करावी. यात त्याला झालेले आर्थिक नुकसान,बसलेला मानसिक धक्का,याची भरपाई मागावी.यासाठी तो सरळ ग्राहक न्यायलयात दादही मागू शकतो किवा त्याआधी इंडिगो व्यवस्थापनाला एक रजिस्टर्ड नोटीसही पाठवू शकतो.ज्याची कॉपी त्याला ग्राहक न्यायालयात सादर करता येईल. या नोटीसीत त्याने स्पष्टपणे नमूद करावे,एका आठवड्याच्या आत त्याला झालेली आर्थिक नुकसान भरपाई इंडिगोने भरुन द्यावी अन्यथा या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागितली जाईल.
या तरुणाची कोणतीही चूक नव्हती त्याने तिकीटावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले होते. हातात कोणतेही लगेज नसताना तो दोन तास आधी विमानतळावर दाखल ही झाला मात्र झालेल्या गर्दीमुळे त्याला विमानतळाच्या आतच प्रवेश करता आला नाही,यात ग्राहकाची कोणतीही चूक नाही.परिणामी त्याने का म्हणून आर्थिक भुर्दंड सहन करावा? त्याने १०१ टक्के इंडिगोच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागितलीच पाहीजे.
त्याच्यासारखा प्रसंग हा अनेक प्रवाश्यांवर गुदरला असेल. मात्र एखाद्याच न्यायालयाचे दार ठोठावतो. नागपूरातील ग्राहक न्याय परिषद या तरुणाच्या हक्काच्या लढाईत संपूर्णपणे त्याच्यासोबत अाहे. इतरांना देखील विमानसेवामधील ‘नफेखाेरीचा’असा फटका बसला असल्यास त्यांनीही समोर यावे.त्यांची देखील संपूर्ण कायदेशीर मदत ग्राहक न्याय परिषद करेल.




आमचे चॅनल subscribe करा
