
‘
मी निर्मोही’संस्थेचा स्तुत्य उपक्रम
नागपूर,ता. २२ ऑक्टोबर: सुर्योदय म्हणजे जीवन आणि सुर्यास्त म्हणजे मृत्यू.मानवी जीवनाच्या प्रवासात जन्म आणि मृत्यू या दोनच वेळा खूप खास असतात,आयुष्य हे या दोन वेळांमधला फक्त एक प्रवास असतो.मूळ भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जन्म-मृत्यू मधील हा प्रवास मात्र खूप भिन्न,खूप वेगळा असतो.आजच्या आय.टी.पिढीमध्ये मात्र हा प्रवास धड भारतीय नाही, धड पाश्चिमात्यही नाही अश्या संक्रमणावस्थतून जाणारा प्रवास आहे,शेवटी भारतीय संस्कृतीच हीच श्रेष्ठ असून पैसा,पॅकेज आणि स्टेट्स यापेक्षा नात्यांचा जिव्हाळा,कर्तव्याचं जग हेच सर्वश्रेष्ठ का आहे ,लेखक रोशन नंदनवंशी लिखित,दिग्दर्शित ’काही क्षण आयुष्याचे’हे दोन अंकी नाटक हेच मूलभूत व शाश्वत सत्य आजच्या तरुण पिढीला सांगून जातं.
भट सभागृहात निर्मोही संस्थेतर्फे आज हे नाटक सादर झालं.तब्बल दीड वर्षांनंतर मायबाप सरकारच्या परवानगीनंतर उघडल्या गेलेल्या नाट्यगृहात म्हणूनच नागपूरकर रसिक प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली.२२ आॅक्टोबर पासून नाट्यगृहे खुली करण्याची परवानगी मायबाप सरकारने दिली आणि निर्मोही व स्वानंद सांस्कृतिक संस्थेने आज या संधीचे सोने केले.
एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर नागपूरातील पहीले प्रायोगिक नाटक ‘काही क्षण आयुष्याचे‘भट सभागृहातील रंगमंचावर सादर झाले.रोहीणी मोहरील व मनीष मोहोरील या दोनच पात्रांनी ‘आयुषी आणि क्षीतीज’च्या भूमिकेत आपल्या ताकदीच्या व दमदार अभिनयाने संपूर्ण रंगमंच व्यापून टाकला.२ तास १५ मिनिटे या दोन्ही पात्रांनी संपूर्ण प्रेक्षकांना आपल्या सहज,सुंदर अभिनयातून खिळवून ठेवले.
संवेदनशील मनाचा लेखक रोशन नंदनवंशी याने समाजात जे घडतंय तेच आपल्या समर्थ लेखणीतून संहितेत उतरवले.आय.टी.कंपन्यांच्या पॅकेज मागे धावणारी आजची पिढी ही, सायंकाळी देवघरात तेवणा-या दिव्याकडे आशेने बघणा-या,डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट बघणा-या,आपल्या वयोवृद्ध जन्मदात्यांच्या प्रतीक्षेकडेही लक्ष देईनाशी झाली.

यात या पिढीचा दोष नसतो.त्यांनाही एकदाच मिळालेल्या आयुष्यात पैसा,प्रतिष्ठा प्राप्त करण्याचाही त्यांचा अधिकार लेखक नाकरात नाही मात्र फक्त पैसा ,प्रतिष्ठा आणि नश्वर सुखं या पलीकडेही एक स्त्री म्हणून,एक पुरुष म्हणून त्यांना अनेक भूमिका वठवाव्या लागतात,त्याकडे मात्र त्यांना पाठ फिरवण्याचा कोणताही हक्क भारतीय संस्कृती देत नाही.
यात आई-वडील,भाऊ-बहीण,प्रियकर-प्रेयसी,सासू-सून,वडील-मुलगी,आई-मुलगा,अश्या अनेक भूमिका वठवाव्या लागतात.निसर्गाने फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच पात्रांना धरणीवर पाठवले.भूमिका मात्र समाज,संस्कार आणि संस्कृतीतून निर्माण होत जातात.असं असलं तरी ‘आयुषी’ ही भारतातच राहून वडीलांची शंभरी पूर्ण होईपर्यंत आणि जन्म-मृत्यूचं एक ‘वर्तुळ’पूर्ण होईपर्यंत आपलं कर्तव्य पार पाडते तर दूसरीकडे आईचा लाडका ‘क्षीतीज’ मोठं पॅकेज मिळताच पत्नी अवनी व एकुलता एक लेक अंबरीशला घेऊन केलिर्फोनियाचा रस्ता धरतो.
ज्यावेळी शंभरी गाठलेले बाबा आयुषीच्या मांडीवर प्राण सोडतात त्याच वेळी कुठे तरी एक बाळ पुन्हा जन्माला आलं असतं….पुन्हा ‘कर्तुत्व श्रेष्ठ की कर्तव्य?’या दोन मुल्यांमधला जन्म-मृत्यूच्या प्रवासाला पुन्हा कुठे तरी कोणाच्या तरी आयुष्यात नव्याने सुरवात झाली असते….!त्या एका क्षणी…तो बाबा….बाबा राहत नाही तर ७ नंबरचा रुग्ण असं त्याचं नामकरण झालं असतं....!पुन्हा एकदा सुर्योदय आणि सुर्यास्ताचा प्रवास सुरु झालेला असतो.
नाटकात स्त्री-पुरुषामधलं प्रेम म्हणजे नेमकं काय?हे अतिशय सुंदर शब्दात लेखकाने आपल्या लेखणीतून साकारलं.ते प्रेम भैरवीमधली आलापी होतं,तबल्यामधील त्रिताल होतं,रविशंकरची सुरेल सतार होते,हरिशंकर चौरसियाची सुरेल बांसरी होते.‘संवाद’या नाटकाला एक वेगळी उभारी,एक वेगळी उंची प्रदान करुन जातात.
क्षीतीज जेव्हा आईला सांगतो तू माझ्यासाठी मुलगी पाहू नकोस मी प्रेमात आहे तेव्हा ती नव-याला सांगते,मी शर्यत हरले…तुम्हाला खसखसीचा हलवा हवा मात्र माझ्या मनात खदखदणा-या खसखसकीचं काय होणार?‘मॉल‘संस्कृतीचा एक धागा या प्रसंगात ही असा हा प्रेक्षकांना बघायला मिळतो.

रोशन नंदनवंशी लिखित या नाटकाला राज्य कामगार नाट्य स्पर्धेत देखील लेखन,दिग्दर्शन,संगीत,अभिनय,ध्वनि,प्रकाशयोजना इ.सगळ्याच श्रेणीत पहीले बक्षीस मिळाले होते.तेव्हाच अनेकांनी लेखकाला हे नाटक व्यवसायिक रंगभूमीवर आणण्याचा दिला.लेखकाची देखील एकच मागणी आहे प्रत्येक दिग्दर्शनाने एक तरी व्यवसायिक एकांकिका किवा नाटक रंगभूमीवर आणायला हवे.रसिकांनी देखील कलांवतांसाठी काही तरी करायला हवे ते म्हणजे रसिकांनी निदान नाट्यगृहापर्यंत पोहोचावे,अशी अपेक्षा खास ‘सत्ताधीश’जवळ लेखक व्यक्त करतो.
आजच्या सादरीकरणानंतर जो काही निधी ‘मी निर्मोही’संस्थेला प्राप्त झाला तो संपूर्ण निधी ही संस्था करोना काळात कलावंतांच्या हलाकीची आर्थिक परिस्थितीत मदत करण्यात,त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे निर्मोहीचे अध्यक्ष चारुदत्त जिचकार, सचिव अविनाश सोनुले,उपाध्यक्ष वीरेंद्र लाटणकर यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी महापौर नंदा जिचकार यांनी आर्वजून उपस्थित राहून कलावंतांच्या प्रयत्नांना दाद दिली.नाटक संपल्यानंतर भारावलेल्या रसिक प्रेक्षकांनी रंगमंचावर एकच धाव घेतली.प्रदीर्घ कालावधीनंतर रंगमंचाला स्पर्श करण्याची संधी त्यांना मिळाली होती.प्रदीर्घ काळानंतर प्रकाश योजनाकार मिथून मित्रा,नेपथ्यकार,ध्वनि संयोजक,रंगभूषाकार यांच्या चेह-यावरील हास्य आणि समाधान बघण्यासारखे होते.




आमचे चॅनल subscribe करा
