
स्थायी समितीने दिली ६१ कोटींच्या प्रशासकीय कामाला मंजुरी
भाजप खड्डयांवर लढणार निवडणूक:समाज माध्यमांमध्ये चर्चा
नागपूर,ता. २९ ऑक्टाेबर: मनपाच्या निवडणूका तोंडावर आल्या,नोव्हेंबरच्या पहील्याच आठवड्यात आचार संहिता लागण्याची शक्यता आहे ,त्यानंतर विकास कामांना मंजुरी देता येणार नाही,राजकीय दृष्टिकोणातून सांगायचे झाल्यास मतदारांना प्रलोभन देता येणार नाही,ज्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून पाच वर्षांसाठी निवडून गेलेत व ज्यांनी निवडून पाठवले अश्या जनतेची सेवा करता येणार नाही,परिणामी भाजप सत्ताधा-यांना आचार संहिता लागण्यापूर्वी कोट्यावधींची कामे मंजूर करण्याची ‘अतिघाई’ झाली व आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकूण ६१ कोटी ८२ लाख ५१ हजार ५७७ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची चांगलीच चर्चा आज समाज माध्यमात रंगली.
गेल्या पावणे दोन वर्षांपासून करोना काळ होता त्यात अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय असणारे तुकाराम मुंढे हे मनपा आयुक्त पदी नियुक्त झाले होते,त्यांनी स्थायी समितीने मंजूर केलेल्या तसेच ज्याचे वर्क आर्डर निघालेत अश्याही कामांना चक्क बासनात गुंडाळले, त्यामुळे संपूर्ण विकास कामांना खिळच बसली होती.मुंढेंची गच्छंती झाली,राधाकृष्णन बी.आयुक्त पदी आलेत त्यांनी देखील ‘हात आखडताच’घेतल्याने सत्ताधा-यांची चांगलीच कोंडी झाली होती,अखेर सामंजस्याने ‘तोडगा’ निघून निदान शहरातील खड्डे बुजवण्यासाठीच्या निविदा वा-याच्या वेगाने मंजूर होऊन आता नागपूरकरांची सुटका निवडणूकांपूर्वी जीवघेण्या खड्ड्यांपासून होणार आहे,हे मात्र निश्चित.
आज पार पडलेल्या बैठकीत सर्वाधिक मंजुरी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना देण्यात आली.यात प्रभाग क्र २३ मधील वर्धमान नगर, प्रभाग क्र.१ मधील जरीपटका, प्रभाग क्र.२४ मधील पुंजाराम वाडी डिप्टी सिग्नल धंतोली झोन क्र.४ मधील शताब्दी चौक ते बेसा टी.पॉईंट,प्रभाग क्र. ३४ येथील ओंकार नगर ते बेलतरोडी रोड,प्रभाग क्र.३१ अंतर्गत क्रीडा चौक ते अप्सरा चौक,सजरंजीपुरा झोन क्र.७ जवळील रस्तयाचे डांबरीकरण,प्रभाग क्र.१३ येथील अभ्यंकर नगर ते सर विश्वेश्वराय चौक,राम नगर चौक ते लाल बहादूर शास्त्री चौक,रामनगर ते मद्रासी मंदिर चौक रस्तयाचे डांबरीकरण,प्रभाग क्र.२४ अंतर्गत डिप्टी सिग्नल नाल्याच्या भिंतीचे बांधकाम,प्रभाग क्र ३४-ड अंतर्गत कल्याणेश्वर नगर येथे सिमेंट क्रांक्रिट रस्त्याचे बांधकाम,प्रभाग क्र.३१(ब)अंतर्गत रघुजीनगर येथे गजानन मंदिर ते झाडे कॉर्नर रस्त्याचे डांबरीकरण, व आय ब्लॉकचे काम,धंतोली झोन क्र.०४ अंतर्गत येणा-या नरेंद्र नगर पूल ते वर्धा रोडपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण,प्रभाग क्र. ३१-ड अंतर्गत हनुमान नगर येथील मेडीकल चौक ते क्रीडा चौक ते रेशीम बाग चौक पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम,प्रभाग क्र.५(ड) अंतर्गत किनखेडे ले आऊट व जामदारवाडी येथे डांबरीकरण,लक्ष्मी नगर झोन क्र.१ अंतर्गत प्रभाग क्र. ३६(ब)अंतर्गत सिंधी कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण व ब्लॉक लावण्याचे काम,लक्ष्मीनगर झोन क्र.१ अंतर्गत प्रभाग क्र..३६ (ड)अंतर्गत शिवशक्तीनगर १ व २ आणि विजय सोसायटी येथील रस्त्याचे डांबरीकरण,ब्रदीनाथ सोसायटी येथील रस्त्याचे डांबरीकरण व ब्लॉक लावण्याचे काम,प्रभाग क्र.३३ (ब)अंतर्गत नाईक नगर मित्र नगर येथे महात्मा फुले साेसायटी व डोबी नगर सोसायटी येथे रस्तयांचे डांबरीकरण,या प्रभागातील न्यू ज्ञानेश्वर नगर वाघमारे ले आऊट,उत्कर्ष नगर गृह निर्माण संस्था येथे रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण व फूटपाथचे बांधकाम इ.रस्त्यांचा समावेश आहे.
आजच्याच बैठकीत ११ कोटी ६२ लाख ५१ हजार ५७७ रु.च्या प्रशासकीय कामाला मंजुरी देण्यात आली तर १० कोटी ४२ लाख १६ हजार ५६१ रुपयांची निविदा ही मंजुरीसाठी आली होती.अश्याप्रकारे कोट्यावधींच्या कामाला मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याने येणारी निवडणूक भाजपचे नगरसेवक हे रस्त्यांच्या डांबरीकरणावर जिंकणार आहे का?असा प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत.रस्त्यां एवढेच महत्वाचे असणा-या सीवर लाईन्स किवा पावसाळ्यात नागरिकांनी जो त्रास भोगला अश्या सिमेंट रस्त्यांच्या बाजूला असणा-या खोलगट वस्तींसाठी किती निधी ठेवण्यात आला?असा प्रश्न विचारला जात आहे.
याशिवाय करोना काळात याच वर्षी नागपूरकर मतदारांनी एप्रिल व मे महिन्यात जी भयंकर,जीवघेणी व विदारक परिस्थिती अनुभवली त्या मनपाच्या आरोग्य विभागाचे अपयश हे रस्त्यांच्या डांबरीकरणाने धूऊन निघणार आहे का?असा प्रश्न विचारला जात आहे.
सत्ताधा-यांच्या हातात सत्ता होती,आरोग्य सुविधा पुरविण्याची संधी होती,किमान प्रयत्न तरी करता आले असते मात्र तरीही सत्ताधारी नगरसेवकच घरात बसलेत व मतदारांना वा-यावर सोडून देण्यात आले होते,परिणामी अनेकांनी आपले आप्त-स्वकीय गमावले,अद्याप मतदारांमधील हा रोष कमी झाला नाही,याची परिणीती मतदानात उमटणार असल्याचा दावा विरोधक करीत आहे.
भाजपची एक नगरसेविका या तर फक्त कागदोपत्रीच मनपात आहेत,मूळात त्या मुंबईत वास्तव्यास असतात मात्र महिन्याकाठी पगार त्यांना बरोबर मिळतो,नियमाप्रमाणे सलग ३ बैठकीत अनुपस्थित राहील्यास नगरसेवकाचे सदस्यत्व आपोआप रद्द होतं मात्र हे नियम सत्ताधारी नगरसेविकेवर लागूच झाले नाहीत, व प्रभाग क्र.२१ मधील विविध विकास कामांसाठीच्या निविदांवर त्या ‘अदृष्य’नगरसेविकेची सही मात्र कायम उमटत राहीली,अश्या अदृष्य नगरसेवकांना यावेळी निवडून देणार नसल्याचा निश्चय देखील जनतेने केला असल्याचे विरोधक सांगतात.
ऐन करोनाच्या काळात जनतेसाठी धावून जाण्या ऐवजी सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाला तर चक्क जुगार खेळताना अटक झाली!भाजपच्या १०८ नगरसेवकांनी मागील १५ वर्षांत ज्या प्रकारची सत्ता मनपात राबवली ते मतदारांच्या चांगलेच लक्षात आहे .त्यामुळे ऐन वेळेवर कितीही कोटींचे डांबरीकरण केले व खड्डे बुजवलेत तरी या खड्डयांमुळे भोगलेल्या त्रासाला जनता विसरु शकत नाही व यावेळी हे खड्डेच सत्ताधा-यांना घरी बसवतील असा दावा मनपातील विरोधी पक्षातील नेते करीत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
