

हाैशी कलावंतांना काय मिळाले?निवेदनात उल्लेख ही नाही
ऑकेस्ट्रा कलावंतही नाराज:फक्त ‘कलावंत‘ म्हणून घेतला सहभाग
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १२ ऑगस्ट:क्रांती दिनाचा मुर्हुत साधून महाराष्ट्र राज्याच्या रंगकर्मींनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले.लॉकडाऊनमध्ये सरकारने सर्वांसाठी निर्बंध शिथिल केले मात्र गेल्या १६ महिन्यांपासून रंगभूमी आणि स्टेज बंदिस्त ठेवण्यात आले आहेत परिणामी रंगभूमी आणि स्टेजचे कलाकार हे रंगभूमी सुरु करण्यासाठी रस्त्यावर आले मात्र शेवटी अगदी आंदोलनस्थळी देखील रंगकर्मींचेच आपापसात‘नाट्य’हे घडलेच,नागपूरात संविधान चौकात सकाळी १०.३० वाजता आंदोलनाला सुरवात झाली मात्र बघता बघता आंदोनलाचा ‘नूरच’पालटला आणि आंदोलन हे रंगकर्मींचे आंदोलन न राहता दिवाळी-मिलन सारखा कौटूंबिक सोहळा झाला असल्याची टिका आता खासगीत केली जात आहे!
रंगभूमी सुरु व्हावी या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी नागपूरकर रंगकर्मींनी ‘एकोपा’तर दाखवला मात्र ‘टिकवता’आला नाही याची चर्चा नागपूरकर रंगकर्मीमध्ये चांगलीच रंगली आहे. रेकॉर्डिंग स्टूडियोचे संचालक चारुदत्त जिचकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले,मूळात रंगकर्मींच्या आंदोलनाचे नेर्तृत्व ज्येष्ठ रंगकर्मींनीच का नाही केले?या नागपूरकरांना पडलेल्या प्रश्ना मागील सत्य म्हणजे रंगकर्मींनाच रंगकर्मी चालत नाहीत,शहरातील अनेक रंगकर्मी यांनी तर आंदोलनस्थळीही एकमेकांचा चेहरा बघण्यास ही टाळले!त्यामुळे ‘रंगभूमीकार’नसलेल्या चारुदत्त जिचकार यांच्या नावावर आंदोलन समितीमध्ये शिक्कामोतर्ब होऊ शकले!

अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष् नरेश गडेकर हे देखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देईपर्यंत सोबत होते मात्र पुन्हा आंदोलनस्थळी फिरकलेच नाहीत,तिथूनच गायब झालेत याची देखील चांगलीच चर्चा झडली.आंदोलनाच्या सुरवातीला नरेश गडेकर हे उत्साही होते मग नंतर असे काय घडले?काेणाकोणामध्ये घडले कि फक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यापुरतीच ते थांबलेत?नागपूरच्याच नाट्य परिषदेचे अध्यक्ष् शेख सलीम व ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे यांनी तर एकमेकांना बघून ही न बघितल्यासारखे केले,हे अनेकांच्या लक्ष्ात आले.‘सत्ताधीश’ने याबाबत संजय भाकरे व राजेश चिटणीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नॉट रिचेबल लागला.
निवेदन देताना फक्त ‘ठराविक’ मंडळी गेलीत त्यामुळे संजय भाकरे हे नाराज होऊन आंदोलनस्थळापासून तडक घरी रवाना झाले तर सलीम शेख यांना देखील निवेदन देताना जाताना साधी विचारणा देखील झाली नाही!सर्वात दु:खाची बाब म्हणजे ८० वर्षीय मधू जोशी हे ज्येष्ठ रंगकर्मी गर्दीत सर्वात मागे उभे होते मात्र सन्मानाने त्यांना मंचावर आणण्याची तसदी देखील घेण्यात आली नाही.
मंचावर तर हाैसे-नवसे-गवसे यांचाच गराडा रंगकर्मींना दिसला.शहरभरातून आंदोलनस्थळी आलेल्या रंगकर्मींनी मंचावरचा हा नूर बघताच काढता पाय घेतला.जी काही ९०० लोकांची नोंदी झाली त्यात रंगकर्मींपेक्ष्ा ध्वनि व प्रकाश व्यवस्थापकांची तसेच त्यांच्यावर अवलंबून असणा-या कर्मचा-यांचीच संख्या जास्त असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत पार पडलेल्या आंदोलनात चक्क अनेक आंदोलनकर्त्यांना अटक झाली मात्र नागपूरात तर सगळं काही आलबेल होतं.कोणी गाणी म्हणत होतं,कोणी नृत्य करीत होते.पथनाट्य सादर झाली मात्र ती ऐकून घेणा-यांची मने इतरत्र भटकत असताना दिसत होती.
स्वत:समितीमध्ये असतानाही आंदोलनस्थळीच संजय भाकरे,नरेश गडेकर यांचे आंदोलन समितीच्या इतर सदस्यांसोबत तोंड वाजले,हे अनेकांच्या लक्ष्ात आले.जो तो आपलाच ‘अजेंडा’ पुढे रेटत असल्याचे चित्र उमटले होते.राजधानी मुंबईच्या आंदोलनात चक्क नऊवार नेसून पारंपारिक वेशभूषेत रंगभूमी कलावंतानी आपली कला आंदोलनस्थळी सादर केली, नागपूरात मात्र आॅकेस्ट्रामधील नृत्यांगणा या देशभक्ती गीतांवर देखील ‘लहरताना’ दिसल्या!
शहरातील हौशी रंगभूमीचे कलावंत यांची देखील गर्दी होती त्यांची मागणी एवढीच होती रंगभूमी सुरु झाली तर त्याचा त्यांना ही फायदा होईल मात्र हौशी रंगभूमी ही संपूर्णत:राज्य नाट्य स्पर्धा तसेच कामगार कल्याण नाट्य स्पर्धा या दोनच स्पर्धा महोत्सवावर निर्भर असतात.मात्र निवेदनात या स्पर्धा मायबाप सरकारने सुरु कराव्यात अशी साधी मागणी देखील नव्हती,यामुळे हे कलावंतही चांगलेच दुखावले गेले आहेत.
ऑकेस्ट्राचे कलावंत हे देखील आतून नाराजच होते.एका ऑकेस्ट्रा संघटनेच्या सचिवाने तर या आंदोलनात सहभागी होण्यास विरोध केला होता,याचे कारण म्हणजे पहीले लॉकडाऊन लागले व हा लॉकडाऊन प्रदीर्घ काळ चालला तेव्हाच ऑकेस्ट्राच्या कलावंतांची हिंमत सुटली होती,अश्यावेळी त्यांनी रंगभूमी कलाकरांनाही त्यांच्यासोबत एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान केले होते मात्र त्यावेळी त्यांच्या आंदोलनात रंगभूमीच्या कलावंतांनी सहभाग नोंदवला नव्हता.
दुसरा लॉकडाऊन लागला आणि झाडीपट्टीच्या कलावंतांची पुंजी ही संपली अश्यावेळी त्यांना आंदोलनाची गरज पडली अश्यावेळी ऑकेस्ट्राच्या कलावंतांनी त्यांना जुने सगळे विसरुन साथ दिली.एवढंच नव्हे तर अमृत भवन मधील सभागृह बैठकांसाठी नि:शुल्क उपलब्ध ही करुन दिले मात्र जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना ऑकेस्ट्राचे संचालक यांना साधी विचारणा देखील आंदोलन समितीच्या सदस्यांनी केली नाही ना मंचावर आदराचे स्थान दिले.गायक प्रवीण मून,ड्रमर यश मदनकर सारख्या तरुण ऑकेस्ट्रा कलावंतांनी लॉकडाऊनमुळे निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न ही केला होता.मात्र असे असतानाही निवेदनात ऑकेस्ट्रा सुरु करण्याविषयी काहीच नमूद करण्यात आले नाही,यामुळे शहरातील ऑकेस्ट्रा कलावंत हे देखील चांगलेच नाराज आहेत.
सर्वात आक्ष्े पार्ह्य बाब निवेदनात जर कोणती असेल तर ‘माथाडी कामगारांसारखा कलावंत संघ सुरु करावा’ही मागणी होय.कलावंत हा माथाडी कामगार कधीपासून झाला?तो आपल्या मनाचा राजा आहे,त्याला लोकाश्रय आणि राजाश्रय नाही मिळाले तरी तो कलावंतच असणार आहे,अश्यावेळी अशी बाब नमूद करण्यामागे आंदोलन समितीच्या सदस्यांनी इतरांचे मत का नाही घेतले?हा मुद्दा देखील ऐरणीवर आला!
याशिवाय मायबाप सरकारने ५ हजार रुपयांचे मानधन देण्याचे आश्वासन दिले त्यालाही अनेक रंगभूमी कलावंतांनी विरोध केला आहे. सरकारने लोककलावंतांसाठी ही योजना जाहीर केली असली तरी राज्यात सर्वच कलावंत हे लोककलावंतांच्या श्रेणीत येत नाहीत,मग रंगभूमी व स्टेेेेेेेेेेेेेेेजवर निर्भर असणा-यांनी उपाशी मरायचं का?असा साधा सवाल ही निवेदनात उमटला नाही,मग हे आंदोलन तरी कशासाठी होते?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आंदोलन यशस्वी होण्यासाठी शहरातील रंगभूमीकारांसाठी जो व्हॉट्स ॲप ग्रूप निर्माण करण्यात आला होता त्यावर आंदोलनादरम्यानचे ‘सेल्फी ‘टाकण्याची जणू स्पर्धाच रंगली!यामुळे देखील अनेक ज्येष्ठ रंगकर्मी नाराज झाले.शेवटी चारुदत्त जिचकार यांनी हा ग्रूपच डिलीट केला व त्यांच्या खासगी व्हॉट्स ॲपवर कलावंतांना संपर्क साधण्याचे आवाहन केले.
लास्ट बट नॉट लीस्ट आंदोलन यशस्वी झाले अशी पाठ आंदोलन समितीच्या सदस्यांनी थाेपटून घेतली असली तर महाराष्ट्रात ज्या दर्जाचे व ज्या स्तराचे इतर ठिकाणी आंदोलन झाले त्याची सर ही नागपूरच्या आंदोलनाला आली नसल्याचे खासगीत बोलले जात आहे.नियोजनशून्य आयोजन हे नेतृत्वाचे अपयशच होते असे उघडपणे आता बोलले जात आहे.
साऊंड,लाईट,नृत्य,गायक वादक इ.कलावंतांचा हा एक सांस्कृतिक कार्यक्रमच होता याला आंदोलन म्हणता येणार नसल्याची टिका करीत आंदोलनस्थळी ‘अनेकांनी अनेकांसोबत’ जमवून घेतलेच नसल्याने आंदोलनस्थळी रंगलेले नाट्य हे उपस्थितांसाठी आंदोलनापेक्ष्ाही जास्त मनोरंजक ठरले….!




आमचे चॅनल subscribe करा
