फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम‘अरेस्ट मी टू....राधाकृष्णन ’चा ट्रेंड चालवायचा का?नागपूरकर तरुणाईचा संताप

‘अरेस्ट मी टू….राधाकृष्णन ’चा ट्रेंड चालवायचा का?नागपूरकर तरुणाईचा संताप

Advertisements

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्याकरवी दोन तरुणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल!

तेलंगखेडी उद्यानासमोरील सी-२० साठी लावण्यात आलेल्या कुंड्यांवर विनय पांडेंनी तयार केला आयुक्तांचा ‘मीम’

आयुष नेवतिया या तरुणाने ‘वॉकर स्ट्रीट’वरील ‘चिडीमार जोडी’बाबत केला व्हिडीयो व्हायरल

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी!एका प्रकरणात न्यायालयाचेच आहे मत

नागपूर,ता.२३ मार्च २०२३: नागपूर महानगरपालिका आयुक्त बी. राधाकृष्णन यांच्यावर मिम्स तयार करीत त्यांची बदनामी केल्याप्रकरणी ते व्हायरल करणाऱ्या दोघांवर सदर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२३) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त कार्यालयातून सदर पोलिसांना केलेल्या तक्रारीवरुन करण्यात आली आहे हे विशेष.

विनय पांडे आणि आयुश नेवतिया अशी दोन्ही युवकांची नावे आहेत. मात्र,आयुक्तांच्या या कारवाईनंतर आता तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने ज्याप्रकारे महिलांविषयी योजनेबाबत सत्ताधा-यांची ट्टीटरवर एका मीमद्वारे टिंगल उडवल्यानंतर प्रदीप नावाच्या एका तरुणाना तेथील पोलिसांनी अटक केली व या कारवाईनंतर तिथे ’ArrestMeToo_stalin’हा ट्रेंड सुरु झाला त्याच धर्तीवर आता नागपूरात ‘अरेस्ट मी टू_राधाकृष्णन’हा ट्रेंड सुरु करायचा का?असा संताप तरुणाईमध्ये उमटला आहे.

शहरात जी-२० च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सी-२० निमित्त, ठिकठिकाणी सौदर्यीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे तेलंगखेडी उद्यान परिसरात विशेष ‘गाला डिनरचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तेलंगखेडी उद्यानामध्ये सुशोभिकरण करीत विविध झाडांच्या कुंड्या लावण्यात आल्या होत्या. त्या कुंड्या कार्यक्रम होताच काढण्यात आल्यात. सुशोभीकरणासाठी शहरातील नर्सरीमधून अक्षरश:पॉलिथिन बॅगांसह रोपे जशी त्या तशी लावण्यात आली व ही परिषद संपताच पॉलिथीनसह परत ती रोपे जशी त्या तशी उचलून वाहनांमध्ये घेऊन जात असतानाचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला .

दरम्यान त्यातील एक फोटो पकडून विनय पांडे याने महानगरपालिका आयुक्ताचा फोटो टाकून एक ‘मिम्स’तयार करीत व्हायरल केले.‘मनपाने तुमच्यासोबत गंमत केली,मनपाकडे बघून तुम्ही ही हात हलवून द्या’अश्‍या शब्दांसोबत पांडे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचा फोटो त्यात लावला.परिणामी,मनपा आयुक्त व नागपूर महानगरपालिकेची बदनामी करण्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

याशिवाय आयुष नेवतिया यानेही ‘वॉकर स्ट्रीट’ वर असलेल्या ‘चिडीमार जोडी’लिहलेल्या दोन तरुणांचे पुतळे ज्याचे नंतर ‘द बॉईज’ असे नामकरण करण्यात आले. त्याबाबत संदेश टाकून एक व्हिडीयो व्हायरल केला. त्यावरुन पोलिसांनी त्याच्याही विरुद्ध कलम ५०० आणि ५०१ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे ३१ एप्रिल २००२१ रोजी कारोनाच्या दुस-या लाटेचे गंभीर संकट देशासमोर उभे ठाकले असताना एखादी व्यक्ती तिचे म्हणने सोशल मिडीयाचा वापर करुन मांडत असेल तर तिचा आवाज दाबता कामा नये,हा आवाज आमच्यापर्यंत ही पोहोचू द्या,सोशल मिडीयातून उपस्थित केल्या जाणा-या सगळ्या तक्रारी या खोट्या आहेत,असे समजण्याचेही कारण नाही….असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते.सोशल मिडीयावरील माहितीच्या मुक्त प्रवाहावर कोणत्याही प्रकारची बंधने आणण्याचा प्रयत्न केला गेल्यास अथवा एखाद्या व्यक्तीने मदत मागितल्यानंतर तिचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल,असा इशाराही न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिला होता.न्या.डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली होती.

एखादी व्यक्ती ऑक्सिजनचा तुडवडा,बेड्स आणि डॉक्टरांबाबत तक्रारी करत असेल तर तिच्यावर कारवाई करता करता कामा नये,असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले होते,उत्तर प्रदेश सरकारने करोनाविषयक चुकीची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करण्यास मज्जाव करताना तसे करणा-यांवर, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे उपरोक्त मत किती महत्वपूर्ण होते हे सिद्ध होतं.

एवढंच नव्हे तर करोना रुग्णवाढीबद्दल निवडणूक आयोगाला दोष देणा-या न्यायालयाच्या तोंडी टिपणीबाबत वार्तांकनावर निर्बंध आणण्याची मागणी निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालात केली असता, न्यायालयाने ती फेटालून लावीत,मुख्य न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी व न्या.सेंथीलकुमार यांनी ,सध्याच्या करोनावाढीच्या स्थितीला निवडणूक आयोग जबाबदार आहे आणि त्याबद्दल आयोगावर हत्येचा गुन्हा नोंदविण्याची गरज असल्याची अतिशय तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती.एप्रिल २०२१ मध्ये करोनाच्या दुस-या लाटेचा उद्रेग देशभरात उच्चांकांवर पोहोचला असतानाही निवडणूक आयोगाने चार राज्यात निवडणूका घेतल्या होत्या,हे विशेष!

न्यायालयाच्या या तिखट टिपण्णीचे वार्तांकन देशभरातील सर्वच माध्यमांनी केले होते,यावर निर्बंध घालण्याची मागणी केली असता,वार्तांकनावर निर्बंध शक्य नसल्याचे न्यायालयाने ठणकावले होते.

समाज माध्यमांवर अंकूश लावण्याचे धोरण केंद्रासह विविध राज्यातील सरकारे करीत असतानाच नागपूरात देखील त्याच धर्तीवर दोन तरुणांवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मनपा आयुक्तांनी या शहरात तीन हजार झाडांवर वीजेची रोषणाई करण्यासाठी एक लाख खिळे ठाेकणा-या आपल्याच विद्युत विभागाच्या अधिका-यावर कोणती कारवाई केली?असा प्रश्‍न विचारला जात आहे.महत्वाचे म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण मराठी माणसांचे आराध्य दैवत आहेत त्यांचीच प्रतिमा रेडीसन ब्ल्यूसमोर मावळ्यांसोबत मेट्रो पुलखाली प्रस्थापित केली!ते ठिकाण लोकांनी मलमूत्र विसर्जन करुन घाण केले होते.याचा विसर मनपा आयुक्तांना पडला का?आज ही नागपूरकर पायात पादत्राणे घालूनच महाराजांच्या प्रतिमेसाेबत सेल्फी घेताना,त्यांच्या प्रतिमेला धक्काबुक्की करताना दिसत आहेत,हा महाराजांचा अपमान नाही का?छत्रपतींना मनपा आयुक्तांनी रस्त्यावर बसवले,यावर गुन्हा दाखल होईल का?असा खोचक प्रश्‍न आता विचारला जात आहे.

मूळात वॉकर स्ट्रीटवरील दोन तरुणांच्या पुतळ्यांना ‘चिडीमार जोडी’असे संबोधून मनपाने नागपूरकरांच्या भावना पराकोटीच्या दुखावल्या होत्या.विशेष म्हणजे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॉकर स्ट्रीटचे उद् घाटन पार पडले तेव्हा त्यांनी देखील हे असे शब्द नागपूरची शान घालवणारे,मर्यादा ओलांडणारे असल्याचे प्रशासनाला सुनावले नाही.यावर एका तरुणाने व्हिडीयो व्हायरल करताच, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचीसाठी मनपा आयुक्त सरसावले याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या तरुणांनी आपापल्या भावना अभिव्यक्त करताना कोणतीही शिविगाळ केली नाही,अश्‍लील शब्दांचा वापर केला नाही तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणा-या मनपा आयुक्तांनी तितक्याच तातडीने परदेशी पाहूणे येणार यासाठी तेलंगखेडी भागात सीसीटीव्ही कॅमरे लावले असते तर या ठिकाणी सी-२० साठी लावलेले झेंडे व दिवे चोरीला गेले नसते,असा खोचक उपदेशही तरुणाई मनपा आयुक्तांना देण्यास विसरली नाही.

तेलंगखेडीत गाला डिनरसाठी परदेशी पाहूणे येणार असल्याने उद्यानाच्या परिसरात स्टीलच्या खांबांवर विविध देशांचे झेंडे लावण्यात आले होते.या कार्यक्रमानंतर मंगळवार दिनांक २१ मार्च रोजी चार खांबांसह झेंडे गायब झाल्याची बाब उघडकीस आली!प्रत्येक खांब हा दहा हजार रुपयांचा होता.नंतर ते खांब उद्यानाच्या एका भागात फेकण्यात आल्याचे आढळले.मात्र,भारत व कॅनडा देशांचे झेंडे चोरीला गेल्याची माहिती अधिका-यांनी दिली.उद्यानाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमरे नसल्यानेच अश्‍या घटना घडल्या.

दोनशे कोटी रुपये पाहूण्यांच्या तीन दिवसीय सी-२० परिषदेवर खर्चून देखील मनपा प्रशासनाचा जर असा कारभार असेल तर त्यावर समाज माध्यमांवर व्यक्त होणे ही आता गुन्हा झाला आहे का?असा संताप व्यक्त होत आहे.या तरुणांवरील गुन्हे मागे न घेतल्यास ‘अरेस्ट मी टू_राधाकृष्णन’हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालविला जाईल असा इशारा नागपूरकर तरुणाईने समाज माध्यमांवरच दिला आहे!

…………………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या