फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblog‘अरवली’ते ‘तपोवन: सह्याद्रीही ‘पेटले’

‘अरवली’ते ‘तपोवन: सह्याद्रीही ‘पेटले’

Advertisements
समाज माध्यमांवर गिरीश महाजन,फडणवीस प्रचंड ट्रोल

नागपूर,ता.२५ डिसेंबर २०२५: बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सह्ाद्री देवराई’ प्रकल्पाला काल बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.देवराईच्या घटनेने महाराष्ट्रातील सुजाण मन सुन्न झाले आहे.उन्हाळ्याचे दिवस नसताना इतकी मोठी वनसंपदा वणव्याने आग लागून नष्ट होऊ शकत नाही असा दावा समस्त पर्यावरणप्रेमी करीत असून,या आगीची धग समाज माध्यमात ‘तपोवन’व त्याही पुढे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे ‘उजवे हात’असलेले मंत्री गिरीश महाजनांपर्यंत पोहोचली आहे.
या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाली आहे, या आगीचे रौद्र रुप बघता जणू काही पेट्रोलचा मारा करुन त्यांना नष्ट करण्यात आले.आगीने संपूर्ण डोंगराला लवकरच कवेत घेतले होते.या आगीत नुसते हिरवेगार डोंगर आगीत भस्मसात झाले नाही तर त्यासोबत हजारो मुके प्राणी,पक्षी,त्यांची घरटी,अंडी यासोबतच एका मोठ्या संख्येतील मानवाच्या भावी पिढीचा प्राणवायूच कायमचाच नष्ट झाला आहे.
काही वर्षांपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन बीडच्या या ओसाड डोंगरावर ‘सह्याद्री देवराई’हा महत्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्प राबवला होता.हजारो वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले.बघता बघता या ओसाड डोंगराचे रुपांतर एका हिरव्यागार वनक्षेत्रात झाले.अक्षरश: टँकरने ही झाडे जगविण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला.सयाजी शिंदे यांनी जातीने लक्ष घालून ही हजारो झाडे जगवली होती,जोपासली होती.मात्र, एका ‘राजकीय’आगीने त्या श्रमावर क्षणार्धात पाणी फेरले.या आगीत प्रामुख्याने दुर्मिळ देशी वृक्ष,औषधी वनस्पती आणि नव्याने लावलेली रोपेही जळून खाक झाली.सर्वात मोठी हानि झाली ती डोंगरावरील जैवविविधतेची.ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली,याचा तपास आता वन विभाग करीत असला तरी,ही आग मानवनिर्मित असून नेमके महाराष्ट्रातील हजारो डोंगर सोडून सयाजी शिंदे यांच्याच परिश्रमातील डोंगराला आग कशी लागली?यावर आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात अाहे.या मागे नाशिक कुंभ मेळ्यातील ‘तपोवन’ची पार्श्वभूमी असून हा मुद्दा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व गिरीश महाजन मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत.
नाशिक महानगरपालिकेने तपोवन परिसरातील सुमारे १८०० परिपक्व झाडे तोडून आगामी कुंभमेळ्यासाठी तात्पुरते साधुग्राम उभारण्याचा प्रस्ताव मांडला.तेव्हाही तो एका शहरापुरता मर्यादित निर्णय नव्हता.तपोवन ही केवळ हिरवाईने नटलेली भूमी नाही ,तर तिच्या मातीमध्ये इतिहास,श्रद्धा आणि पर्यावरणीय स्थैर्य ही तिनही मूल्ये खोलवर रुजली आहेत.रामायणकाळात भगवान श्रीराम,सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या चौदा वर्षांच्या वनवासातील काही काळ याच तपोवनात व्यतीत केला,असा उल्लेख रामायणात आढळतो.त्यामुळे ही भूमी धार्मिकदृष्टया पवित्र,सांस्कृतिकदृष्टया महत्वपूर्ण आणि स्थानिक लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे.या स्थळातील प्राचीन वड,पिंपळ,चिंच,उंबर आणि असंख्य देशी प्रजातींची झाडे शेकडो वर्षांच्या जैविक प्रवासाची साक्ष देतात.इतकंच नव्हे तर या झाडांचा शहरी हवामानावर असलेला परिणाम वैज्ञानिकदृष्टयाही अत्यंत महत्वाचा आहे.
परिपक्व झाडे प्रचंड प्रमाणात पाणी वाष्परुपात वातावरणात सोडतात,जमिनीत खोलवर पाणी शोषून भूजलाची भर घालतात,शेकडो पक्षी,वटवाघळे,फूलपाखरे आणि कीटकांना अधिवास प्रदान करतात आणि रणरणत्या उन्हाळ्यात तापमानातील वाढ नैसर्गिकरित्या नियंत्रित करतात.एक मोठे हिरवेगार झाड अनेक वातानुकुलीनच्या(एअरकंडीशनर) एकत्रित थंडाव्या इतका परिणाम करीत असते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.
तपोवनातील हि हिरवाई संपूर्णत:व कायमची नष्ट करण्यासाठी सज्ज झालेले मंत्री तसेच नाशिक येथील सिंहस्थ कुंभ मेळाव्याचे अग्रगणी गिरीश महाजन यांनी तपोवनातील या अठराशे झाडांच्या मोबदल्यात दूसरीकडे वृक्षारोपण केले जाईल,असा वैज्ञानिक व  नैसर्गिक वास्तवा पलीकडील राजकीय उपाय सांगितला.७०-८० वर्षे वयाच्या झाडांना पर्याय म्हणून रोपटी लावणे म्हणजे एका जटिल परिसंस्थेची जागा अंगणातील बागेने भरुन काढण्यासारखे आहे.दिर्घकाळ टिकणा-या पर्यावरणीय लाभांना अल्पकालीन राजकीय अथवा आर्थिक लोभा पुढे दुय्यम स्थान देण्यात आल्याचे हे उदाहारण आहे.
याच तपोवनातील १,८२५ झाडे साधुग्राम उभारणीच्या नावावर नष्ट करण्याचा विरोध सयाजी शिंदे यांनी केला.या वृक्षतोडीला नाशिककरांसह राज्यभरातील वृक्षप्रेमींंनी तीव्र विरोध केला आहे.कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शेवटपर्यंत तपोवनातील झाडे ही कापली जातीलच,असे पर्यावरणप्रेमींना ठणकावले तर राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनीही,वृक्षतोडीचे समर्थन करीत या विषयावर राजकारण होत असल्याचा आरोप केला.वृक्षतोड ही अपरिहार्य असल्याचे सांगत ‘धर्म ही अफूची गोळी म्हणणारेच वृक्षतोडीविरोधातील आंदोलनात सहभागी’ असल्याची टिका केली.२०१५-१६ मध्ये महानगरपालिकेने मोकळ्या जागेवर झाडे लावली होती,तेच वृक्ष आता साधुग्रामसाठी अडचणीचे ठरत असल्याचे फडणवीस म्हणाले.
या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे हे देखील गरजेचे असल्याचे सांगत, पर्यावरण वाचले तरच पुढची पिढी सुरक्ष्त राहील हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे,अशी एक्सवर पोस्ट केली.यासंदर्भात सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरणहिताची असल्याचे त्यांनी नमूद केले.मात्र,पुणे जिल्ह्यात  अतिशय निसर्गरम्य डोंगरे पोखरुन त्या ठिकाणी ‘लवासा’थाटण्याचा प्रयोग याच उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या दशकात केला होता व हेच फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना लवासाच्या नावाने घशाला कोरड पडे पर्यंत विधान सभेत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत होते.लवासासाठी तर अजित पवार यांनी खळाळणा-या नदीचे पात्रच बदलून त्याचा प्रवाह लवासाकडे वळवला आणि अनेक गावात दुष्काळ पडला,शेती नष्ट झाल्या.गावेच्या गावे उधवस्त झाली.आज तो लवासा,अर्धवट विकासाच्या थडग्यात दफन झाला असून,केलेली पर्यावरण हानी कधीही भरुन निघणारी नाही.परिणामी,विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल साधण्याचा ‘शहाणपणा’अजित पवारांना लवासामुळे आला असावा,अशी चर्चा समाज माध्यमांवर चांगलीच रंगली.पर्यावरण -हासाच्या नावाने गळे काढणारे आज तेच फडणवीस पर्यावरणाचा मुद्दा, धार्मिकतेच्या उन्मादाच्या अफूच्या गोळीत बंदिस्त करु पहात आहेत.
तपोवनाचा प्रश्‍न फक्त नाशिक किवा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहीला नसून तो जगभर गाजला.न्यायालयाने देखील नाशिक महानगरपालिकेला तंबी देत महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती दिली.यानंतर अचानक राज्यभरातील हजारो,लाखो डोंगर सोडून अभिनेते सयाजी शिंदे यांचीच देवराई पेटून उठते…आगीत भस्मसात होते…ही आग निसर्गत: लागली यावर शेंबडे पोर देखील विश्‍वास ठेवण्यास तयार नाही.हे समाज माध्यमांवरील संताप बघता सिद्ध होत आहे.
आज दिल्लीपासून तर नागपूरपर्यंत पर्यावरणाचा अतोनात -हास होत असून,काही मोजके लोकं पर्यावरणाचा सातत्याने बिघडत चाललेला समतोल राखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करीत आहे,रस्त्यांवर येऊन आंदोलन करीत आहेत मात्र,त्यांचा आवाज सरकारांच्या तथाकथित विकासप्रकल्पात, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या प्रशासनशाहीत व न्यायसंस्थेच्या लहरी कारभारात क्षीण ठरतो. ‘अरवली’पर्वत रांगेचे उदाहरण यासाठी देता येईल.
भारताच्या नकाशाकडे बारकाईने पाहिले तर पश्‍चिम ते उत्तर भारताला जोडणारी एक तुटक,झिजलेली पर्वतरांग दिसते,ती आहे ‘अरवली.’दिल्लीपासून सुरु होऊन हरियाणा,राजस्थान ओलांडत ती गुजरातमध्ये शांतपणे विरते.हिमालयासारखी उंच नाही,सह्याद्रीसारखी हिरवीही नाही,पण अब्जावधी वर्षांचा काळ ऊन,वारा,पाऊस आणि क्षरण सहन करत उभी असलेली ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक आहे.उत्तर भारताचे हवामान,भूजल आणि परिसंस्थेचे मूक रक्षण करणारी अरवली पर्वत रांग आज मात्र,वेगाने त्या-त्या प्रदेशातूनच मोठ्या प्रमाणात गिळंकृत केली जात आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अरवलीच्या संरक्षणासाठी फक्त १०० मीटरपेक्षा उंच टेकड्यांनाच संरक्षीत मानले आणि त्याच क्षणी पर्यावरणाच्या इतिहासात एक दूर्देवी अध्याय जुळला.हा निकाल केवळ कायदेशीर दस्तावेज नाही तर तो निसर्गाला मीटरच्या फूटपट्टीतील मोजमापात बसवणा-या अतिशय संकुचित दृष्टिकोणाचा परिपाक आहे.पर्वतरांग म्हणजे फक्त उंची नव्हे तर हवामान,भूजल आणि परिसंस्थेचा कणा असतो.जवळजवळ दोन अब्ज वर्षे टिकून राहिलेल्या अरवलीचे महत्व अंकात मोजता येत नाही.अरवली उत्तर भारताच्या हवामानाला स्थिर ठेवणारा सर्वात महत्वाचा घटक आहे.थर वाळवंटाच्या काठावर उभार असलेला हा पर्वतरक्षक पश्‍चिमेकडील उष्ण,कोरडे आणि धुळीने भरलेले वारे थोपवतो.
त्यांच्या खडगांच्या रांगांमुळे वा-यांचा वेग कमी होतो,दिशा वळते आणि धुळीची वादळे दिल्ली,हरियाणा,राजस्थानच्या पूर्व भागात सरळ घूसू शकत नाहीत.
त्याच्या या भिंतीसारख्या अस्त्विामुळे राजस्थानच्या कोरड्या वा-यांचे उग्र रुप पूर्ण उत्तर भारताला व्यापून टाकत नाही,असा हा अरवली नष्ट झाला तर दिल्लीचे संपूर्ण हवामान काही दशकातच अर्धवाळवंटी होण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात.आधीच हरियाणा व राजस्थानमध्ये अरवलीच्या पायथ्याचा मोठा भाग सपाट करण्यात आला आहे,खडक कापण्यात आले आहेत आणि जंगलतोड करण्यात आली आहे.त्यामुळे दिल्लीमध्ये धुळीचे प्रमाण वाढले,तापमान ३ ते ४ अशांनी वाढले आणि स्थानिक पर्जन्यमान अनिश्‍चित झाले.अरवलीचा -हास दिल्लीच्या विषारी हवेचे एक मुख्य कारण आहे,ही बाब शेकडो वैज्ञानिक अभ्यासांमध्ये स्पष्ट झाली आहे.
अरवलीचा हवामानावरचा प्रभाव इतका विस्तृत,सूक्ष्म आणि बहूपेडी आहे की त्याला एका वाक्यात किंवा एका मोजमापात बंदिस्त करणे अशक्य आहे.तो हिमालयासारखा नसला तरी त्याच्या रांगा हवेत आर्द्रतेचे नाजूक धागे विणतात,त्यातील वनस्पती आर्द्रतेला जिवंत ठेवतात आणि त्याच्या खडकांमधून वातावरणाशी होणारी उष्णतेची देवाणघेवाण दिवस-रात्रीच्या तापमानाचे सूक्ष्म संतुलन जपते.
मान्सूनच्या वा-यांच्या प्रवासात त्याचा हस्तक्षेप शांत असला तरी निर्णायक ठरतो.अरवलीच्या भौगोलिक स्थितीमुळे हवेेचे तापमान आणि दाब विशिष्ट राहतो.त्यातून वा-याची दिशा बदलते.ढगांची चाल बदलते आणि हिमालयाकडे धावणा-या पावसाच्या मार्गाला एक शिस्त प्राप्त होते.अरवलीतील खडग हे बाहेरुन कोरडे असले तरी त्याच्या खडकातील नैसर्गिक भेगा पावसाचे पाणी जमिनीत मूरवून भूजल साठवतात.दिल्ली,गुरुग्राम,जयपूर आणि फरिदाबादसाख्या शहरांचे भूजल या प्राचीन जलसंचयावर अवलंबून आहे पण,खाणकाम,जंगलतोड आणि बांधकामांमुळे या भेगा नष्ट होत आहेत.एकदा त्या तुटल्या तर कधीही तयार होणार नाहीत आणि त्याचबरोबर शहरांचे पाणीही हळूहळू आटत जाणार.
अरवली हा फक्त हवामान किवा भूजलाचा आधार नाही तर तो वाळवंट आणि वन यांच्या सीमेवर उभा असलेला जैवविविधतेचा महत्वाचा पट्टा आहे.बिबट्या,मोर,गिधाडे,औषधी वनस्पती आणि विविध गवतप्रकार यांचे अस्तित्व याच पर्वत टेकड्यांवर अवलंबून आहे.टेकड्या सपाट होऊ लागल्या तर या परिसंस्थेची साखळी ही तुटत जाणार आणि हळूहळू एक सजीव प्रदेश पूर्णत:कायमचा निर्जिव होणार.
या पर्वतांना फक्त ’जमीन’म्हणून पाहण्याची केंद्र व राज्य सरकारांची मनोवृत्ती आणि आर्थिक लाभाचा हव्यास हा अरवली ते तपोवन अगदी सारखाच आहे.केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी अरवलीच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ ०.१९ टक्केच क्षेत्रा तखाणकाम होणार असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात सादर केला.आधीच बेकायदा खाणकामामुळे अरवली पर्वतरांगांच्या २५ टक्के भागाची मोठी हानी झाली आहे.ही आकडेवारी दूर्लक्ष्त करण्यासारखी नक्कीच नाही.अशा खाणकामातून माफियांची ताकद वाढत गेली तर दूसरीकडे अरवली वाचवण्यासाठी पर्यावरणवादी ही पुढे सरसावले.१९९५ मध्ये अरवलीच्या पर्वत रांगांमध्ये खाणकामांवर बंदी घालण्यात आली.त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.२००२ पासून २०१८ पर्यंत विविध खटल्यांंद्वारे ही बंदी कायम राहीली. मात्र,अरवलीला ओरबाडणे सुरुच होते.माफिया व हितसंबधियांच्या जाळ्यातून बेकायदा खाणकाम कायम राहिले.त्यामुळेच सर्वोच्च न्यायलयाने समिती नेमली.अरवलीचा पाव भाग पुरता ओरबाडला गेल्याचे या समितीच्या पाहणीतून समोर आले.
देशाच्या वायव्य भागात सुमारे दीड लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या डोंगररांगा वाळवंटीकरण रोखण्यासाठी फार महत्वाच्या आहेत,केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या पर्वतरांगांच्या ९० टक्के भागाचे रक्षण होणार असल्याची हमी सर्वोच्च न्यायालयाला दिली याचा अर्थ दहा टक्के भाग हा ओरबाडला जाणार आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने केलेल्या नव्या व्याख्येमुळे,शंभर मीटरहून लहान असलेल्या डोंगरांवर तसेच दोन डोंगरांमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक नसल्यावर खाणकाम होऊ शकते.

महत्वाचे म्हणजे २०२४ मध्ये अरवली बेकायदा खाणी संदर्भात केंद्र सरकारने जी समिती नेमली त्यात केंद्रीय पर्यावरणमंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीत राजस्थान,गुजरात,हरियाणा आणि दिल्ली या राज्यांचे प्रतिनिधी होते याच समितीने १०० मीटरहून अधिक उंचीच्या टेकड्या व सुमारे ५०० मीटर अंतरावरील अशा दोन टेकड्यांचा समूह अरावली पर्वत क्षेत्र मानले जाईल,असा बदल खाणमाफियांसाठी केला असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला.पुढे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या समितीचे हेच निकष ग्रार्ह्य धरले.
भौतिक विकासाच्या नादीलागून निसर्गाला हवे तसे ओरबडण्याचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षात देशभर दिसत आहेत.भूस्खलनामध्ये गावेच्या गावे गाडली जात आहे तर महापूरात बळीराजाची शेती कायमची खरडली जात असून मानवी अन्नसाखळीच संकटात आली आहे.दुष्काळी भागात मुसळधार पाऊस तर ढगफूटीतून शहरे तुंबत आहेत.अरवलीपासून तर हिमालयीन पर्वतराजीपर्यंत सर्वच ठिकाणी निसर्गाचे लचके तोडण्याचे ‘कायदेशीर’काम सुरु आहे.बेकायदा खाणकाम आणि बेसुमार बांधकाम यामुळे निसर्गच संपूर्ण देशात विद्रूप झाला आहे.
परिणामी,हवामान बदलांच्या काळात ‘विकास’या संकल्पनेची नवी व्याख्या करणे गरजेची आहे.मात्र, ‘विश्‍वगुरु’होण्याची वल्गना करणा-या भारताच्या धोरणनिर्मात्यांकडे तसेच राज्यातील सरकारांकडे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कोणतेही शाश्‍वत धोरण नसल्याचेच स्पष्ट होतं.उलट त्यांच्या आर्थिक हितसंबधांच्या आड येणा-यांच्या कष्टाने फूललेले पृथ्वीवरचे नंदनवन ते क्षणार्धात जाळून फूंकण्यास ही मागे-पुढे बघत नाहीत.तपोवन व त्या अनुषगांने घडलेली सह्याद्री देवराईची घटना याच मानसिकतेचे द्योतक आहे,असे आता म्हणावे लागेल.
(वाचा भाग-२ मध्ये नागपूरचे पर्यावरण आणि नॉर्वे)
…………………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या