Advertisements

तीन महिन्यांपासून साचले पाणी:रोगराईचा फैलाव,नागरिक त्रस्त
आठ दिवसांत समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडणार:आ.विकास ठाकरेंचा इशारा
नागपूर,१९ एप्रिल २०२५: प्रियदर्शिनी कॉलनी, गोरेपेठ आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिक मागील तीन महिन्यांपासून दुर्गंधी, डासांचा उपद्रव, डासांमुळे होणारे आजारांचा फैलाव आणि प्रचंड अस्वच्छतेचा सामना करत आहेत. यामागे कारणीभूत ठरले आहे टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड या ठेकेदाराचे निष्काळजी, बेफिकीरी.यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणारे काम करणा-या कंपनीच्या कंत्राटदाराला काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आठ दिवसात समस्या न सोडविल्या कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
शनिवारी विकास ठाकरे यांनी अमरावती रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळील नाल्याची पाहणी केली. ठेकेदाराने जुन्या पुलाच्या ठिकाणी नाला पूर्णपणे बंद केला असून,दोन्ही बाजूंना मलबा टाकला आहे आणि नवीन नाल्याचे काम सुरूच केलेले नाही. परिणामी परिसरात सांडपाण्याचे साचलेले डबके, दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीमुळे मोठ्या प्रमाणात रोगराईचा फैलाव झालेला त्यांना आढळले.
नागरिकांच्या तक्रारींनंतर तातडीने घटनास्थळी ठाकरे पोहोचले.टी अँड टी इन्फ्रा लिमिटेडने नाल्याचा प्रवाह अडवला, मलबा टाकून रचना बिघडवली आणि काम पूर्णपणे ठप्प ठेवले,ही अक्ष्म्य बाब असल्याचे सांगितले.या समस्येबाबत नागरिकांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र कोणीही दखल घेतली नाही. नागरिकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ असून, कंत्राटदाराचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
ठाकरे यांनी कंत्रादाराला स्पष्टपणे आठ दिवसांची मुदत दिली असून ,जर लवकरात लवकर समस्येचे निराकरण झाले नाही आणि नवीन पुलाचे काम सुरू झाले नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,असे ठणकावले.
या उड्डाणपुलाच्या २.८५ किमी लांबीच्या प्रकल्पाचे कंत्राट नोव्हेंबर २०२१ मध्ये देण्यात आले होते. जानेवारी २०२२ पासून काम सुरू करून दोन वर्षांत पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम होता. मात्र, आज १५ महिने मुदत संपून गेली असतानाही काम पूर्ण झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने अद्याप ठेकेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही, हा व्यवहार अत्यंत संशयास्पद आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
ठाकरे यांनी रविनगर चौकातील तशीच परिस्थिती उघड केली, जिथे आजही जुना पूल न तोडता नवीन पुलाचे काम सुरूच झालेले नाही.
ठाकरे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या विलंबामुळे नागपूरकर नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांसह आरोग्यविषयक संकटांचा सामना करावा लागत आहे. नागपूर महानगरपालिका देखील या समस्यांसाठी जबाबदार असून, त्यांनी जबाबदारी झटकून सारा भार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागावर टाकला असल्याची टिका केली.
यासोबतच, ठाकरे यांनी तीन महत्त्वपूर्ण मागण्या केल्या त्यात ठेकेदारावर कठोर कारवाई करावी,ठेकेदारावर विलंबाबद्दल मोठा आर्थिक दंड ठोठवावा तसेच उड्डाणपुलाचे तांत्रिक लेखापरीक्षण (Technical Audit) करावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये.
टी अँड टी इन्फ्रा लिमिटेडने बांधलेला बुटीबोरी उड्डाणपूल काही महिन्यांतच खराब झाला. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. हजारोंच्या संख्येने नागरिक हा नवीन उड्डाणपूल आणि त्याखालचा रस्ता वापरणार आहेत. त्यामुळे या पुलाची रचनात्मक स्थिरता तपासणे अनिवार्य आहे,असे ठाकरे यांनी सांगितले.
…………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
