

(मुक्तेवध)
अभूतपूर्व संकट..र्निमनुष्य रस्ते…डोळ्यात भूकेचे अश्रू
सरकारने निम्म वर्गांची काळजी घेणे गरजेचे
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
’करोना’ हा शब्दच आता संपूर्ण जगासाठी परवलीचा बनला आहे. या विषाणूची लागण,संक्रमण,प्रसार,आैषधोपचार,घ्यावयाची काळजी इ.विषयी संपूर्ण जगात चर्चा होत असली तरी या विषाणूने कलियुगातील मानवासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे,हे मान्य करावेच लागेल. भारतासारख्या विकसनशील देशात आता लागू झालेल्या संचारबंदीचा अर्थ, हा विकसित देशाच्या तुलनेत कितीतरी वगेळा निघतो,हे देखील मान्य करावेच लागेल. एकशे तैहतीस कोटींच्या या देशात ३० टक्के जनता ही गरीबी म्हणजे दारिद्रय रेषेखालील आहे.याचा अर्थ जवळपास ३० कोटी जनतेचे पोट हे हातावर आहे.अश्यावेळी संचारबंदीमुळे त्यांच्या दैनदिन जीवनात प्रचंड प्रमाणात उलथापालथ निर्माण झालेली दिसून पडतेय.
सर्वात मोठा प्रश्न उभा झाला तो त्यांच्या रोजी-रोटीचा. करोना विषाणूचे संक्रमण वाहकाकडून स्वस्थ समाजामध्ये झपाट्याने होत असल्याने देशात आणि महाराष्ट्रात संचारबंदी लागू करने हे सरकारसाठी अत्यावश्यक होते,हे मान्य करावेच लागेल मात्र त्यामुळे गेल्या तीनच दिवसात आता निम्न वर्ग व अति निम्न वर्गाचा संयम अाता संपत चाललेला दिसून पडतोय. वस्तीत आणि झोपडपट्टीत राहणा-या वर्गाकडे पंधरा दिवस किवा एक आठवडा पूरेल एवढे अन्नधान्य साठवलेले नसते. दोन-तीन दिवसात जवळचे होते नव्हते ते सगळे पैसे संपलेत,आता प्रश्न ‘करोना’पेक्ष्ाही भयंकर निर्माण झाला तो म्हणजे,पोराबाळांना तेल,तिखट,मीठ,कनिक,साखर कुठून व कसे आणून दय्ावे?
संगमचाळीत राहणारी एका कामवाली बाईने त्या वस्तीतील ही दयनीय हकीकत सांगितली आहे.३१ मार्च तर सोडा,ताई उद्या या वस्तीत अनेकांच्या घरात चूली देखील पेटणार नाही…!बळाच्या जोरावर ही माणसे घरीच राहण्यास बाध्य होतीलही मात्र…एक दिवस या भूकेचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनापासून बचावासाठी सरकारने नक्कीच कौतूकास्पद पावले(उशिरा का होईना)उचलली आहेत मात्र त्यापूर्वी राज्यातील या गरिब जनतेला सूचना ही दिली असती,बाबांनो,पंधरा दिवसांचे राशन-पाणी भरुन ठेवा बरं..पिलांसाठी..कारण पुढे काळरात्र येणार आहे’कदाचित या वर्गाने आणखी जास्त काबाडकष्ट करुन पंधरा नव्हे तर एका महिन्याचे राशन-पाणी घरात भरले असते मात्र,दूर्देवाने असे घडले नाही.
आज जेमतेम २४ मार्च झाली..पुढे ३१ मार्च पर्यंत या गरीब आणि हातावर पोट असणा-या कष्टकरी जनतेला ‘संयम’ पाळायचा आहे.नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी खाजगी कंपन्यांना सूचना दिल्या आहेत,मजूरांचा सुटीचा पगार कापू नये,मात्र त्यांनी मजूरांना सर्व खाजगी कंपन्यांनी आगाऊ रक्कम देण्याची सूचना केली असती तर ती जास्त फलदायी ठरली असती. स्टेशनवरचे कूली उपासमार झेलतात आहेत. मंदिरे आणि देवस्थाने बंद झाल्यामुळे फूल विक्रेते यांची स्थिती दयनीय झाली आहे. रद्दी विकत घेणारे,चहा टपरीवाले,ऑटो चालक,ई-रिक्शा चालक,फूटकळ विक्रेते,शो-रुममध्ये काम करणारे कामगार, इतर दूकांनामध्ये काम करणारे कामगार,नाभिक समाज..अशी यांची संख्या असंख्य आहे. देशावर आणि जगावर कोसळलेले हे अभूतपूर्व संकट असले तरी या निम्न वर्गासाठी आर्थिक हितासाठी केंद्र किवा राज्य सरकारकडे शिवाय ’सूचना’ आणि ‘उपदेशांच्या’ काही ठोस व भरीव उपाययोजना आजच्या तारखेला तरी नाही. या सूचनांमुळे या असंख्य मोल मजूरी करणा-यांच्या पोटाची खळगी भरणार आहे का?
सरकारने तातडीने जनधन योजनेद्वारे तसेच इतर यंत्रणेद्वारे या असंख्य गरिबांसाठी बँकेत एक हजार रुपये जमा करावे तसेच सर्व रेशन दूकानातून दारिद्रय रेषेखालील जनतेसाठी तेल,साखर,गहूं,डाळ हे जीवनावश्यक जिन्नस मोफत देण्याची घोषणा करावी,अशी मागणी आज देशातील हा निम्म व अति निम्न वर्ग करतो आहे.
आम्हाला ‘करोना’होऊन नाही मरायचे,आमच्या मुलाबाळांनाही नाही मारायचेय पण मायबाप सरकार आता आम्हाला उपाशी मारत आहे,त्याचे काय?वृत्तपत्रात फोटो छापून आणणारे कुठे आहेत सुप्रसिद्ध सामाजिक संस्था?वृद्धाश्रमात ब्लँकेट वाटणारे,रुग्णालयात फळांचे वाटप करणारे..देशासमोर आलेल्या या जीवघेण्या संकटासमोर लढताना,आता कुठे गेले त्यांचे सामाजिक भान?का नाही नागपूरातील जाटतरोडी,संगमचाळ,नंदनवन झोपडपट्टी,तकीया,दिघोरी,वाडी इ.ठिकाणच्या झोपडपट्ट्या त्या अल्पकाळासाठी ‘दत्तक’घेत?उच्चभ्रू आणि मध्यम वर्गीयांना आवाहन केल्यास प्रशासनाच्या देखरेखेखाली,योग्य ती काळजी घेऊन गरिबांच्या पेटलेल्या पोटाच्या खळगीचा विचार आताच नाही केला तर… ही संचारबंदीही कोळमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सरकारच्या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा विषाणू हा माणसाचे फूफ्फूस निकामे करतो मात्र पोटाची ‘भूक’ही माणूसच निकामी करते,याची जाणीव केंद्राला व राज्य शासनालाही आहे तरी देखील,गरीबी रेषेखाली जगणा-या या जिवंत माणसांच्या भूकेसाठी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही.‘आणिबाणि’ घोषित करुन घरात या कष्टकरी वर्गाला डांबून ठेवता येईलही कदाचित मात्र आपली पिल्ले,ही भूकेने कासाविस होऊन मरताना जगातला कोणताही माणूस बघू शकत नाही हे देखील तेवढेच भयाण वास्तव आहे,हे नाकारता येत नाही.
मोलकरीण-मालकिन वाद-
नागपूरात प्रशासनाने ‘लॉक डाऊन’घोषित करताच मध्यम वर्गीय नोकरदार व गृहीणींसमोर सर्वात मोठं संकट उभं राहीलं ते मोलकरणी कामावर येईल का?पोळेवाली बाई,धूणं,भांडेवाली बाई, झाडू,पोछा करणारी बाई,एका उच्चभ्रू सोसायटीत मोलकरणी-मालकिनीचा वाद चांगलाच रंगला होता. काहीही झाले तरी तुला ३१ मार्च पर्यंत म्हणजे तब्बल १२ दिवस मी सुटी देणार नाही,तुला स्वत:हून सुटी घ्यायची असल्यास पगार देणार नाही..असा संवाद ऐकू आला.पुढे ‘करोना’विषयी आणखी जास्त जनजागृती झाली आणि…या मालकिणींनीच मोलकरणींना सुुटी दिली पण…पंधरा दिवसांचं रेशन भरुन घे म्हणून आगाऊ रक्कम हातावर ठेवली का?
मागील लेखात वादक,गायक कलावंत,बॅक स्टेज काम करणारे कामगार,नेपथ्यकार,ध्वनि व्यवस्थापक,प्रकाश व्यवस्थापक यांची व्यथा मांडली होती,त्यावेळी ‘कलादालन’च्या संचालिका माधवी पांडे यांनी वर्षभर जे कलावंत माझ्या संचासाठी काम करतात त्यांना गरज असल्यास आगाऊ रक्कम देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती,निश्चितच हा अतिशय स्तूत्य निर्णय आहे. आजचा दिवस ढकळणे महत्वाचे..पुढे अनेक कार्यक्रम असतील त्यातून हळूहळू ती रक्कम वजा करता येऊ शकते,नागपूरातील किती संचालकांनी अशी पावले उचलली?
गेल्या तीन दिवसांपासून नागपूर शहराचे रस्ते जसे निर्जिव व र्निमनुष्य दिसत आहेत तसेच भकास जगणे या वस्ती-वस्तीतील कष्टकरी लोकांच्या जीवनात अवतरले आहेत. नुसतीच भपकेबाजी किवा ‘चमकोगिरी’न करता समाजातील उच्चभ्रू व मध्यमवर्गाचे,विविध सामाजिक संस्थांचे हे राष्ट्रीय कर्तव्य झाले आहे,त्यांनी सरकारसोबतच पुढे येऊन आपापली जवाबदारी ओळखावी, ३१ मार्च पर्यंत हे जागतिक संकट आटोक्यात न आल्यास सरकारकडे पुन्हा पुढील पंधरा दिवस संचारबंदी लागू करणे गरजेचे असणार आहे,कारण हा विषाणू १४ दिवस सुप्तावस्थेत असतो व प्रसार करतो,अश्यावेळी समाजभान ठेऊन कष्टकरी वर्गाचे भूकेचे अश्रू हे पुसल्या गेलेच पाहिजे.
सोशल मिडीयावर आपणच कसे ‘करोनातज्ज्ञ’आहोत याचे बिनबुडाचे डोज पाजण्यापेक्ष्ा आणि व्हिडियोज फॉरवर्ड करण्यापेक्ष्ा गोरगरीबांसाठी ‘माणूस’या पातळीवर त्यांनी आज दिवसभरात काय केले,याचे पाेस्ट आता व्हायरल करावे,ही अपेक्ष्ा…!
तेव्हाच उद्याचा मराठी माणसाचा नूतन संवत्सर ख-या अर्थाने मराठी माणसाला साथर्की लागेल.गुडी उभारावी मात्र ती ‘माणूसकीची असावी परोपकाराची’असावी तरच येणारे नूतन वर्ष हे त्यांना फलित होऊ शकेल.
आपण केलेल्या,योग्य ती काळजी घेऊन, एकातरी सत्कार्याचे फोटोज किवा व्हिडियोज,संक्ष्प्ति माहितीसह drmamta21@gmail.com वर पाठवावे. ‘सत्ताधीश’या लोकप्रिय वेबपोर्टलवर त्यांना निश्चितच प्रसिद्धी दिली जाईल.




आमचे चॅनल subscribe करा
