महान पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन
नागपूर,ता. १२ एप्रिल २०२६: ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.आशा भासेले यांच्या निधनाने संगीत जगत पुन्हा एकदा स्तब्ध झालं आहे.आठ दशकांहून अधिक काळ हा सूरमयी चैतन्याचा झरा अविरत संगीतप्रेमींना आपल्या सुरेल गायनाने व दिलखुलास व्यक्तिमत्वाने तृप्त करीत होता.वयाच्या ९० व्या वर्षीही त्यांनी स्टेजवर लाईव्ह गाऊन संगीतप्रेमींना थक्क केलं होतं.त्यांनी त्यांच्या कारकार्दीत वेगवेगळ्या भाषेत १२ हजारांहून अधिक गाणी गायली आहे.
महाराष्ट्राच्या सांगलीत ८ सप्टेंबर १९३३ मध्ये त्यांचा जन्म मराठी कुटूंबात झाला होता.त्यांचे वडील पं.दिनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध गायक होते. त्या ९ वर्षांचा असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले.आशा भोसले या स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण असून वडीलांच्या निधनानंतर लता यांनी संपूर्ण कुटूंबाचा भार उचलला होता. एका मुलाखतीत आशा भोसलेंनी सांगितले की त्यांना गायनाच्या क्षेत्रात यायचेच नव्हते मात्र,तीन मुलांचे संगोपण आणि पती गणपतराव भोसले यांच्यासोबतच्या घटस्फोटानंतर त्यांच्या अर्थाजणाचे एकमेव साधन हा त्यांचा ‘गळा’होता.परिणामी,त्यांनी लता बाईंनी नाकारलेली गाणी गाण्यास सुरवात केली.आशा भासलेंचं वैयक्तिक आयुष्य हे खूप संघर्षमय होतं.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १५ वर्ष मोठे असलेल्या व लता यांचे तबला वादक असलेल्या गणपतराव भोसलेंसोबत पळून जाऊन लग्न केले हाेते.लता व मंगेशकर कुटूंबियांना आशा यांचे हे नाते मंजूर नव्हते.त्या वेळी आशा यांचे वय १६ तर गणपतराव यांचे वय ३१ वर्ष होते.हे लग्न फक्त ११ वर्ष टिकले.अाशा भोसले यांना तीन अपत्य झाली.यातील तिसरे अपत्य गर्भात असतानाच आशा या पतीपासून विभक्त झाल्या.१९४९ साली झालेला हा विवाह १९६० साली संपुष्टात आला.
आशा यांना सासरच्या मंडळीकडून खूप वाईट वागणूक मिळत होती.त्यांना प्रचंड मारहाण व घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागत होतं.आशा यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.एकीकडे सासर हे त्यांच्यासाठी नरक बनलं होतं तर दूसरीकडे माहेर त्यांनी स्वत:हून सोडलं होतं.मात्र,अखेर आपल्या मुलांना घेऊन त्यांना माहेरचाच आश्रय घ्यावा लागला.हेमंत,वर्षा व अानंद भोसले या तिन्ही अपत्यांची जबाबदारी आशा यांनी फार हिंमतीने उचलली.
आशा भासले यांनी १९४३ मध्ये एका मराठी चित्रपट ‘माझा बाळ’पासून गायनास सुरवात केली. यानंतर १९४८ मध्ये ‘चुनरिया’या हिंदी चित्रपटातील ‘सावन आया‘या गाण्याद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.१९५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’चित्रपटात मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’हे गीत गाण्याची संधी दिली,ज्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.
त्यांचा गायनाचा प्रवास हा देखील साक्षात गंधर्वाला देखील थक्क करुन जाणारा आहे.त्यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली असून यात शास्त्रीय,गझल,भजन,कव्वाली,पॉप,कॅबरे ते आधूनिक बीट्स असा प्रत्येक संगीत प्रकार समाविष्ट आहे.
आशा भोसले यांना पद्मविभूषण,दादासाहेब फालके पुरस्कार तसेच अनेक राष्ट्रीय-फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना सर्वोकृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,२००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार,२००८ साली पद्मविभूषण यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सर्वाधिक गाणी असलेल्या कलाकार म्हणून २०११ मध्ये त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्समध्ये नोंद आहे.
संगीत क्षेत्राव्यतिरिक्त आशा भोसले यांनी उद्योजकतेतही प्रावीण्य मिळवलं आहे.त्यांनी दुबई,कुवेत आणि मँचेस्टरमध्ये‘आशा’नावाची रेस्टॉरेंट साखळी सुरु केली,जी आजही लोकप्रिय आहे.अाशा या स्वत: उत्तम स्वयंपाक करत होत्या.एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की,त्यांची गायन कारकीर्द सुरु झाली नसती तर तर त्या उत्तम स्वयंपाकी झाल्या असत्या.मी चार घरांमध्ये स्वयंपाक करुन पैसे कमावले असते.
२०१३ साली आशा यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटात पदार्पण केले.त्यांनी ‘माई’नावाच्या मराठी चित्रपटात आईची भूमिका साकारली होती.दूरदर्शनसह अनेक खासगी वाहीन्यांवरील गाण्याच्या स्पर्धांमध्येही त्या मुख्य अतिथी म्हणून झळकल्या.
१९६१ साली चित्रपट ’हम दोनो’मधील ‘अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही’हे गीत संगीतकार जयदेव यांनी संगीतबद्ध केले आहे.हिंदी चित्रपटसृष्टीतील हे सदाबहार व रोमँटिक गीत सुरवातीला लता मंगेशकर गाणार होत्या मात्र,या गीताचे बोल ऐकून त्यांनी या गीताला ‘अश्लील’म्हणून गाण्यास नकार दिला.त्यानंतर हे गीत आशा भोसलें यांनी मोहम्मद रफींसोबत गायले व या गीतानेही एक इतिहास घडवला.त्या काळातील तरुणाईंच्या गळ्यातील हे गीत ताईत बनले होते.रफी यांच्या स्वरातील आर्जव आणि आशा भोसले यांच्या स्वरातील मार्दव यांची अनोखी व तितकीच पवित्र जुगलबंदी या गीतात उमटली होती. आशा भोसले यांचे निधन जरी वयाच्या ९२ व्या वर्षी झाले आणि ही निसर्गाची एक नैसर्गिक कृती असली तरी समस्त भारतीय व जगभरातील संगीतप्रेमींनी त्यांना ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’असा भावपूर्ण आर्जव केला आहे.
संगीतकार ओ.पी.नय्यर हे पहिले असे संगीतकार होते ज्यांनी आशा यांना त्यांची स्वत:ची ओळख घडवून दिली होती.नय्यर यांच्याशी आशा यांची पहिली भेट १९५२ मध्ये ‘छम छमा छम’च्या संगीत रेकाँर्डिंगच्या वेळी झाली होती.१९५०-६० च्या दशकातील संगीत क्षेत्रातील ही सर्वात जास्त यशस्वी व लोकप्रिय जोडी मानली जात होती.नय्यर यांनी आशा यांना वेगळ्या शैलीच्या गाण्यांसाठी मोठी संधी दिली होती.उदा.नया दौर,हावडा ब्रिज इत्यादी चित्रपट.यामुळे आशा यांची एक अष्टपैलू गायिका म्हणून ओळख निर्माण झाली.ओ.पी.नय्यर असे संगीतकार होते ज्यांनी आशा भोसलेंना लता मंगेशकर यांच्या अफाट सावलीतून अलगद बाहेर काढले होते.नय्यर यांच्या संगीतातील ‘कजरा मोहब्बतवाला’,आओ हूजूर तुमको’,मांग के साथ तुम्हारा’ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
नय्यर यांनी आशा यांच्या आवाजातील उत्साह आणि ताजेपणा ओळखून त्यांना पाश्चात्य आणि भारतीय वाद्यांचा योग्य मेळ असणारी गाणी दिली.नय्यर हे त्यांच्या संगीतातील ऊर्जा आणि आनंदी सुरांसाठी ओळखले जात असत,त्यांच्या गाण्यांच्या चालींवरही त्यांच्या रंगेल व्यक्तिमत्वाचा प्रभाव दिसायचा.उत्साह,प्रसन्नता,ऊर्जा आणि आनंदाने भरलेले सूर हीच नय्यर यांची खरी ओळख होती.त्यांच्या चाली उडत्या होत्या ज्या गुणगुणायला सोप्या होत्या, त्यामुळे त्या सामान्य लोकांच्या सहज पसंदीस उतरल्या.मात्र,त्यांच्या संगीताला फाळणीच्या रक्तलांच्छित काळाची वेदना ही होती.
आरपार,सीआयडी,नया दौर,हावडा ब्रिज,फागुन,मिस्टर अँड मिसेस ५५,तुमसा नही देखा या आणि अशा अनेक सिनेमांच्या यशात ओपींच्या संगीताचा प्रमुख वाटा होता.त्या काळात रेडिओ सिलोनवरुन प्रसारित होणा-या बिनाका गीतमाला या प्रसिद्ध कार्यक्रमात वाजवल्या जाणा-या १६ गाण्यांपैकी १४ गाणी ही ओपींची असायची.गीता दत्त,शमशाद बेगम,मोहम्मद रफी आणि अाशा भोसले हे त्यांचे आवडते गायक होते.आेपींच्या सांगीतिक कारकिर्दीत गीता दत्त यांच्या ६२ गीतांचे योगदान आहे.गीता दत्तच्या आवाजातील मादर्वचा पुरेपूर उपयोग ओपींनी चाली देताना करुन घेतला.असेच योगदान शमशाद बेगम यांचेही होते.
ओपींनी लता मंगेशकरसोबत कधीही काम केले नाही तरीही त्यामुळे त्यांच्या गाण्यांच्या दर्जात काहीही कमतरता आली नाही.१९४९ मध्ये ‘महल’प्रदर्शित झाला.‘आयेगा आनेवाला’हे गीत लता मंगेशकरांचे अजरामर झाले.मात्र,लताच्या सुरांनी संपूर्ण चित्रपटसृष्टी भारुन गेली असताना, लता शिवाय मी यशस्वी होईल ही प्रतिज्ञा करणारा होता ओ.पी.नय्यर नावाचा संगीतकार आणि ती पूर्ण करने शक्य झाले कारण तेवढ्याच प्रभावी नावाने त्यांना साथ दिली ते नाव होते आशा भोसले.
खरं तर १९५६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सीआयडी’ या सिनेमातील ‘लेके पहला पहला प्यार भरके आँखो मे खुमार’हे गीत शमशाद आणि रफींचे असताना, गुरुदत्तच्या मागे लागून ओपीने या सिनेमाच्या नायिकेसाठी आशा भोसलेंचा आवाज वापरला.त्यांच्या सांगीतिक आयुष्यातील नायिकेचे स्थान,कुठेतरी त्यांनी पक्के केले .ओपींची झेप खूप मोठी होती.लताबाईंशी टक्कर हा केवळ प्रतिष्ठेचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न होता.गीता दत्तने याच काळात आपले गाणे फक्त गुरुदत्तच्या चित्रपटांपुरते मर्यादित केले होते आणि शमशादचा पंजाबी खणखणीत आवाज सर्वच नायिकांंसाठी योग्य नव्हता.लतापेक्षा वेगळे गाऊन आपण इतके यशस्वी होऊ शकतो याची कल्पनासुद्धा तेव्हा आशा यांनी केली नव्हती.अशा वेळी ’जादू नगरी से आया है कोई जादूगर’,हे गीत देणा-या जादूगाराच्या प्रतिभेचा परिस्पर्श आशा भोसलेंना झाला व हिंदी चित्रपट संगीतात एका नव्या ‘आशा’चा उदय झाला.
आशाबाईंच्या आवाजातील मादकता आणि भरीवपणा त्यांना इतर गायिकेत मिळाला नाही,असे एक कारण त्यांनी स्वत:च,त्यांच्या आशा फिक्सेशनसाठी दिले होते.‘तुला स्वत:चा स्वर आहे,तो वापरायला शिक,लता मंगेशकरसारखे गाऊन तुला काहीही मिळणार नाही’,केवळ असे म्हणून ओपी थांबले नाहीत तर बी.आर.चोप्रांना त्यांनी ’नया दौर’साठी दोन पर्याय दिले.एक ओपी-आशा किंवा दूसरा पर्याय लता!बी.आर यांनी पहीला पर्याय निवडला व पुढे या चित्रपटाच्या संगीताने इतिहास घडवला.अाशा भोसले यांना ओपींनी लताच्या सावलीतून बाहेर काढले.१९५७ पर्यंत केवळ बी आणि सी ग्रेड सिनेमातील नायिकांसाठी गाणारा आवाज,नया दौर या सिनेमापासून ए ग्रेड सिनेमातील नायिकेचा आवाज बनला.
‘दिल जवां और रुत हंसी,चल यूँ ही चल दे कहीं..तू चल ले चल कहीं,तुझ पे है मुझको यकीं’…हा केवढा मोठा विश्वास आशाबाईंनी ओपींवर ठेवला.,या गाण्यात वापरलेली घोड्यांच्या टापांची लय म्हणजे खास ओपी टच.या लयीतील,यूँ तो हमने लाख हंसी देखे है,पिया पिया पिया मेरा जिया पुकारे,ये क्या कर डाला तुने दिल तेरा हो गया,जरा हौले हौले चलो मोरे साजना,मांग के साथ तुम्हारा,हे गीत म्हणजे सूर आणि आवाज यांची साथ जी पुढे पंधरा वर्ष सिनेजगतातील संगीतसृष्टीत अविरत गाजत राहीली.
(वाचा भाग २ मध्ये का सूटला ओपींचा साथ?)
………………………………..
तळटीप-
आशा भोसले ही एक कीवंदती आहे.आठ दशकांचा त्यांचा सुवर्ण इतिहास काही हजार शब्दांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही.त्यांचं प्रत्येक गाणं हे एक सांगितीक विद्यापीठ आहे.असा सूर हा पारलौकिकच असतो.आशाबाईंचे सूर आणि त्यांचं जीवन,संगीताप्रतिचं अफाट समर्पण,त्यांचा संघर्ष,माणूस म्हणून उपजत असलेल्या स्वभावातील काही दोष यासोबतच त्यांचे अफलातून व्यक्तित्व यांचा वेध घेण्याचा ‘सत्ताधीश’चा आपल्या वाचकांसाठी हा अल्पसा प्रयत्न असून शतकातील या महान गायिकेला ‘सत्ताधीश’ची भावपूर्ण श्रद्धांजली.
Advertisements

Advertisements

Advertisements
