फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअब्दूल लतीफ बाबू यांचा दूर्देवी मृत्यू:पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह

अब्दूल लतीफ बाबू यांचा दूर्देवी मृत्यू:पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह

Advertisements

हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सुपुर्दे खाक:ताजबाग परिसराला आले पोलिस छावणीचे स्वरुप

ताजबाग ट्रस्टी,पोलिस आयुक्त व राजकीय नेत्यांच्या विरोधातील जनक्षोभाला संयमाची झालर

सत्य दाबू नका ख-या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे:ज्वाला धोटे यांची मागणी

माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही:प्यारे खान

नागपूर,ता.९ जून २०२२: ताजबाग परिसरातील सुप्रसिद्ध समाजसेवी व काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दूल लतीफ बाबू यांचा काल दूर्देवी मृत्यू झाला.सक्करदरा पोलिस ठाण्यात गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना, कुख्यात गुन्हेगार व मकोकाचा आरोपी आबू उर्फ फिरोज खान याच्यावरील कारवाईच्या संदर्भात बोलावले जात होते,प्रत्येक वेळी अब्दूल लतीफ यांच्यावर आबू खानच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यासाठी व बयाण देण्यासाठी पोलिसांकरवी दवाब टाकण्यात येत होता,परवा देखील सध्या अटकेत असलेल्या आबू खानने केलेल्या अारोपाच्या संदर्भात अब्दूल लतीफ या सद् गृहस्थाला सक्करदरा पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले,त्यांना अतिशय अवमानकारक वागणूक देण्यात आली,जमीनीवर बसवण्यात आले,उठाबश्‍या करण्यास सांगण्यात आले व दमदाटी करुन सोडण्यात आल्याने घरी जाताच त्यांना ह्दयघाताचा झटका आला आणि यात त्यांचा दूर्देवी मृत्यू झाला असल्याचे अब्दूल लतीफ यांचे भाऊ हफीज बालू शेख यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना सांगितले.

अब्दूल लतीफ यांनी काँग्रेसच्या तिकीटावर दोनवेळा नगरसेवकाची निवडणूकही लढली होती मात्र अतिशय कमी फरकाने ते पराभूत झाले होते मात्र तरीही त्यांची लोकप्रियता बघता त्यांना ’अब्दूल लतीफ नगरसेवक’च्याच नावाने संपूर्ण ताजबाग परिसरातील नागरिक ओळखत होते.आपली नोकरी सांभाळून ते आपल्या दोन मुली,एक मुलगा,पत्नी व कुटुंबियांचा सांभाळ करीत होते.त्यांच्या एका मुलीचा निकाह झाला असून अद्याप एका मुलीच्या निकाहाची जवाबदारी त्यांच्यावर होती.

(छायाचित्र: अब्दूल लतीफ यांचे बंधू माध्यमांना माहिती देताना व सोबत विशाल जनसमुह)

गेल्या अनेक वर्षांपासून ताजबाग परिसरात त्यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते.अनेकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा माणूस म्हणून ते परिसरात लोकप्रिय होते.त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच हजारोंच्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणा-या समर्थकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.यावेळी समर्थकांमध्ये ताजबागचे ट्रस्टी प्यारे खान,शकील पटेल,परिमंडळ क्र-४ चे उपायुक्त नरुल हसन,भारतीय जनता पक्ष व एका केंद्रिय मंत्र्याच्या विरोधात पराकोटीचा जनक्षोभ उसळला होता.संपूर्ण ताजबाग परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते,एवढा तगडा बंदोबस्त पोलसांना आज अब्दूल लतीफ बाबू यांचा सायंकाळी चार वाजेपर्यंत अंत्यविधी होईपर्यंत ठेवावा लागला.

हे संपूर्ण प्रकरण ताजबाग परिसरातील कुख्यात गुंड आबू खानच्या अटकेनंतर शिगेला पोहोचले.आबू खान हा अमली पदार्थ तस्कर म्हणूनही पोलिसांनच्या रडारवर होता.मागील सात महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.आबूने मोठा ताजबाग ट्रस्टच्या मालकीच्या अनेक दुकानांवर अवैधपणे ताबा मिळवून त्याची विक्री केली होती.परिसरातील नागरिकांना धमकी देऊन तो त्यांच्याकडून खंडणी उकळायचा.खंडणी व अमली पदार्थ तस्करीतून आबूने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली होती.आबूविरुद्ध आतापर्यंत खंडणीसह पाच गुन्हे दाखल आहेत.यापूर्वी त्याच्याविरुद्ध तीन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून यात चार खुनांच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

आबू व त्याच्या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर ताे पसार झाला होता.तो अहमदाबाद,अमरावती,अजमेर,गडचिरोली व भंडारा येथे वास्तव्यास होता.आबूने स्थानिक पोलिसांशी हातमिळवणी केली असल्याची देखील चर्चा होती.आबू हा भंडा-यात असल्याचे कळताच उपायुक्त नुरुल हसन यांच्या विशेष पथकाने वेषांतर करुन त्याला नुकतीच अटक केली.न्यायालयाने त्याची आठ दिवसांसाठी पोेलिस कोठडीत रवानगी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर अब्दूल लतीफ यांना वारंवार पोलिस ठाण्यात बोलावले जात होते कारण आबूने अब्दूल लतीफ यांनाही एक लाख रुपये दिले असल्याचे आपल्या बयाणात पोलिसांना सांगितले मात्र आबूनेच अब्दूल लतीफ यांना, मी पोलिसांना हे खोटे सांगितले असून माझ्यावर खूप दवाब असल्याचे अब्दूल लतीफकडे कबूल केले असल्याचा दावा अब्दूल लतीफ यांचे भाऊ हफिज बालू शेख यांनी माध्यमांकडे केला.

नुरुल हसन यांच्याकरवी अब्दूल लतीफ यांना वारंवार पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार असल्याची खात्रीच त्यांनी आपल्या कुटुंबियांकडे बोलून दाखवली होती.एवढ्या दशकांची प्रतिष्ठा खोट्या आरोपामुळे धुळीस मिळणार असल्याचे दडपण त्यांना आले होते अखेर याची परिणीती त्यांच्या दूर्देवी मृत्यूमध्ये झाली असल्याची हळहळ आज हजारोच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.

त्यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जमाव अब्दूल लतीफ बाबू यांच्या चांगल्या कामांची साक्ष देणारा होता.पोलिस,ताजबागचे विशवस्त,भारतीय जनता पक्ष व एका केंद्रिय मंत्र्यांच्या विरोधात पराकोटीचा जनक्षोभ यावेळी उसळला होता.गेल्या महिन्यात असाच एका सज्जन माणसाचा मृत्यू देखील सक्करदरा पोलिसांच्या अश्‍याच कारवाईमुळे, कुख्यात आबू खानसंदर्भात, झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.अब्दूल लतीफ यांच्या रुपाने हा दूसरा मृत्यू असल्याचे त्यांनी सांगितले.आबू खानच्या संदर्भात असेच वारंवार एका सद् गृहस्थाला सक्करदरा पोलिस ठाण्यात बोलावले जात होते,यामुळे त्यांचा देखील मृत्यू ह्दयघाताने झाला,आता आमचा देखील मृत्यू असाच होणार आहे,अशी भीती याप्रसंगी उपस्थित सहा ते सात गृहस्थांनी केली कारण त्यांना देखील आबूच्या संदर्भात सक्करदरा पोलिसांकडून वारंवार पोलिस ठाण्यात बोलावले जात असल्याचे त्यांनी सांगितले!

एवढ्या पराकोटीच्या संतप्त वातावरणात देखील जमावाने शांत व संयतपणाचा परिचय देत अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले,याची प्रशंसा झालीच पाहिजे.कायदा सुव्यवस्थेला तडा जाईल अशी आशंका असल्यानेच चार-चार डीसीपींसह शेकडो पोलिसकर्मीं हे कर्तव्यावर तैनात होते मात्र अब्दूल लतीफ यांच्यावर निरातिशय प्रेम करणा-या जनतेने कुठेही कायदा-सुव्यवस्थेला तडा जाऊ दिला नाही मात्र तरी देखील त्यांच्या मनात खदखदत असणारा असंतोष हा, शब्द आणि अश्रू यांच्या रुपाने निरंतर प्रकट होत होता.

माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही:प्यारे खान(ताजबागचे विश्‍वस्त)
अब्दूल लतीफ बाबू यांचा मृत्यू हा खरंच अतिशय दूर्देवी आहे मात्र यात माझा काय दोष?मला बोल का लावले जात आहे?मी बाबा ताजुद्दीन दरगाहचा विशवस्त आहे,कोणत्याही राजकीय पक्षाचा मी सभासद नाही.माझे सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत.नुकतेच आम्ही राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनाही या येत्या रविवारी ताजबागला भेट देण्यासंबधी निमंत्रण पत्रिका पोहोचवली.ते या रविवारी ताजबागला भेट देखील देणार आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी देखील माझे चांगले संबंध आहेत.मूळात मला माझा स्वतंत्र व्यवसाय आहे,मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिल नाही.माझा हेतू फक्त आणि फक्त बाबा ताजुद्दीन दरगाहचा विकास करण्याचा व या धार्मिक स्थळाला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करुन देण्याचा आहे.

अब्दूल लतीफ यांच्या ज्या भावाने माझ्यावर आरोप केलेत तेच नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात अभिनंदनाचे पोस्टर लावण्यासाठी परवानगी घेण्यास माझ्याकडे आले होते व ती परवानगी मी त्यांना आनंदाने दिली.त्यांच्या पटोले यांच्यासोबतच्या अभिनंदनपर फलकांसाठी आम्ही ट्रस्टतर्फे लावण्यात आलेले फलक ही काढलेत.आम्हाला फलकांद्वारे आमची जाहीरात करण्याची गरज वाटत नाही, आम्ही काम करणारी माणसे आहोत.पटोले यांचे अभिनंदनपर फलक अब्दूल लतीफ यांचे बंधू एक-दोन दिवस लावतील नंतर काढून घेतील,यात आम्ही समंजसपणाच दाखवला.

राहीला प्रश्‍न नुरुल हसन यांच्यावरील आरोपांच्या फैरीचा तर आमच्या मुस्लिम धर्मात एक तर एवढ्या मोठ्या पदावर पोहोचणारा असा प्रामाणिक अधिकारी विरळाच दिसतो. नुरुल हसन यांनी अब्दूल लतीफ यांना चौकशीसाठी बोलावले असले तरी त्यांना अटक केली नाही.ते त्यांना अटक ही करु शकले असते तरी देखील नुरुल हसनवर दोषारोपण करने योग्य नाही,नुरुल हसन यांनी त्यांचे फक्त कर्तव्य बजावले होते.त्यांनाही असे काही अघटित घडेल याची जाणीव नव्हती.अब्दूल लतीफ यांना या पूर्वी देखील दोन वेळा ह्दयघाताचे झटके येऊन गेलेले आहेत.दूर्देवाने त्यांचा मृत्यू झाला,त्यांना जन्नत नशीब होवो हीच अल्लहातालाकडे मी दूआ करतो.

सत्य दाबू नका :ज्वाला धोटे(अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा)
पोलिस उपायुक्त नुरुल हसनवर आज जमावाचा रोष असला तरी प्यारे खान सांगतात त्याप्रमाणे हा कोणत्याही जाती,धर्म,समाजाचा विषय होऊ शकत नाही.जो कर्तृत्ववान आहे,प्रामाणिक आहे,चांगला माणूस आहे तर मग तो कोणत्याही जाती,धर्म,पंथाचा नागरिक असला तरी चांगला अधिकारी म्हणून वावरु शकतो.प्यारे खान,नुरुल हसन,भारतीय जनता पक्ष किवा केंद्रिय मंत्र्यांशी माझे कोणतेही वैयक्तीक शत्रूत्व नाही मात्र आज त्यांच्याप्रति जो जनक्षोभ मी अनुभवला तो ही शब्दात व्यक्त करता येणार नाही.या घटनेत सत्य दाबल्या न जाता ख-या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.

अब्दूल लतीफ हे अतिशय सज्जन माणूस होते.१२ जणांच्या कुटुंबियांचा भार त्यांच्यावर होता त्यात या परिसरात घडलेली ही दूसरी दूर्देवी घटना आहे हे ही विसरता येत नाही. आबू खानच्या विरोधात पोलिसांकडे पुरावे पुरेशे उपलब्ध नसल्यानेच परिसरातील नागरिकांवर पोलिस दडपण आणत असल्याची माहिती मला मिळाली आहे.आबूने गुन्हे केले आहेत तर त्याच्यावर कारवाई करा,परिसरातील निरपराध नागरिकांवर पोलिसांनी दडपण का आणले?कोणाच्या सांगण्यावरुन आणले?नुरुल हसन यांच्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे दडपण होते का?आबू विरोधात गुन्हे दाखल करण्याची जवाबदारी परिसरातील नागरिकांची आहे का?त्यांनी आबूविरोधात बयाण द्यावे,गुन्हे दाखल करावे यासाठी नागरिकांवर दडपण आणने,त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून वारंवार अपमान करने,त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवणे,हे कोणत्या अधिकारात बसतं?यासाठीच खाकी वर्दी त्यांना मिळाली आहे का?

प्यारे खानसारख्या ट्रस्टींनी तर जाहीरातींसाठी कब्रस्तानही सोडले नाही?कब्रस्तानातही त्यांचे मोठमोठे फलक नेमके काय प्रदर्शित करतात?परिसरातील शेंबडे पोरही सांगतो प्यारे खान हा गडकरींचा माणूस आहे,प्यारे खान हा चांगला माणूस आहे,ऑक्सीजन मॅन म्हणून त्यांची चांगली ख्यातीही आहे मात्र त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या हाताचे बाहूले होऊन आपल्याच समाजाचे नुकसान करता कामा नये.देवस्थान,दरगाी,मजार या सारखी ठिकाणे राजकीय चांडालांपासून दूरच ठेवली गेली पाहिजे,असे माझे ठाम मत आहे.राजकारण करायला राजकारण्यांना लाखो मतदारसंघ आहेत,राजकारणात धर्म आणू नये.धार्मिक स्थळांना आपल्या भ्रष्ट कारभारापासून दूर ठेवण्यात ,यावे,क्रीडा,सांस्कृतिक,वाहतूक,पाटबंधारे,आरोग्य,प्रशासन इ.सारख्या सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली असताना धार्मिक स्थळांवरील राजकारण हे निष्पाप लोकांच्या जीवावर अश्‍यारितीने बेततं हे आता तरी राजकारण्यांनी लक्षात घ्यावं.आज ज्या पद्धतीने हजारोंच्या जमावाने संयम दाखवला,पराकोटीचा जनक्षोभ उसळला असताना कायदा हातात घेतला नाही त्यासाठी मी त्यांचे आभारच मानते.एक नेक बंदा जग सोडून गेला,त्यांच्या नावाला गालबोट लागू नये म्हणून आपले आतले दू:ख,नैराश्‍य आणि संतापाला या विशाल जनसागराने आवर घातला त्याचे कौतूकच करायला हवे.माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला व अब्दूल लतीफ बाबा या नेक बंद्याची अंत्यंयात्रा शांततेत पार पडली.

मात्र महाराष्ट्राच्या उपराजधानीत एक एवढा मोठा समुदाय पराकोटीचा आक्रोश करीत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे होते?शहराचे खासदार यांना तरी त्यांच्याच मतदासंघातील नागरिकांवर कोसळलेल्या दू:खाशी काहीच घेणे-देणे नव्हते का?निदान या प्रभागातील नगरसेवक तरी या जनआक्रोशाची दखल घेत परिसरात फिरकलेत का?राज्यात महाविकास आघाडीची सरकार आहे,या सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेहमी आपल्या भाषणात सांगतात,त्यांच्या पक्षाचे आमदार,खासदार मुस्लिम मतांमुळेच निवडून येतात मग उपराजधानीत त्यांच्या पक्षाचे नेते काय करीत होते?शरद पवार छातीठोकपणे सांगतात त्याप्रमाणे त्यांचेच मतदार असणा-या मुस्लिम बांधवांच्या एवढ्या मोठ्या दू:खात आज त्यांना सहभागी होण्यावाचून कोणी रोखले होते?फक्त मतांसाठीच मुस्लिमांचा साथ हवा असतो का?फक्त मतांसाठीच मुस्लिमांप्रति कैवार वाटतो का?

अब्दूल लतीफ हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते होते,काँग्रेसचे पालकमंत्री हे राज्यसभेच्या निवडणूकीत मुंबईत व्यस्त असले तरी त्यांच्या वतीने एखादा प्रतिनिधी तरी उपस्थित राहू शकला असता ना?पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मकोका आरोपी आबू खानवर गुन्हे सिद्ध करण्याची एवढी घाई झाल्याचे बघून आनंदच वाटला मात्र पालकमंत्र्यांचे सुपुत्र कुणाल राऊत व त्यांच्या पत्नी, अभिषेक सिंग नावाच्या मकोका आरोपीसोबत खुलेआम विदेश वारी करतात,लाखोंच्या विमानाच्या तिकीटा काढून सैरसपाटा करतात तेव्हा अमितेश कुमार यांना मकोकाच्या आरोपीला तातडीने अटक करण्याची घाई का होत नाही?कायदा सर्वांसाठी समान असताना ते राजकीय व्यक्तीवरील मकोका व सामान्य गुंडावरील मकोका असो भेद कसा करु शकतात?

गंगा जमुनातील ग्राहकांवरील कारवाईत अमितेश कुमार यांनी तात्काळ दोन पोलिसांना निलंबित केले मात्र त्यांच्याच दडपणाखाली त्यांच्याच पोलिस विभागातर्फे सामान्य व सज्जन माणसांचा बळी जात असताना ते आता सक्करदरा पोलिस ठाण्यातील पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत?

या सर्व दूर्देवी घटनांसाठी पोलिस आयुक्त हेच जवाबदार असून शासनाने त्वरित निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी करावी तसेच पोलिस आयुक्त यांची नागपूर शहरातून त्वरित बदली करावी,अशी आमची मागणी आहे.या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या