फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशअपघाताच्या देशा...

अपघाताच्या देशा…

Advertisements
(रविवार विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior jounalist)
नागपूर,ता.१६ फेब्रुवरी २०२५: देशाची राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्र.१४ च्या पाय-यांवर काल रात्री साढे नऊ वाजता जे घडले ते खूप दूर्देवी होते.९ महिला,६ लहान मुले आणि २ पुरुष यांचा गर्दी अंगावर पडल्याने गुदमरुन मृत्यू  झाला असल्याचे विविध माध्यमात समोर आले असून १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.सध्या संपूर्ण देशात प्रयागराजमधील महाकुंभात ‘गंगा नहाने’चा ज्वर चढला असून मिळेल त्या वाहतूकीच्या साधनाने प्रत्येकाला गंगेत डूबकी मारुन शुद्ध होण्याचा,पुण्य कमाविण्याचा आणि मोक्षाला प्राप्त करण्याचा हव्यास सूटला आहे.अर्थात धर्माच्या बाबतीतील हा परंपरागत भारतीय समाजाचा स्थायी भाव आहे,याला दोष देता येत नाही मात्र,हे भाबडे भाविक ज्या प्रशासकीय व राजकीय व्यवसथेवर विश्‍वास ठेऊन लहान-लहान मुलांना घेऊन प्रयागराजकडे धाव घेतात आहे,ते अत्यंत धोकादायक असून ,मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या या देशात प्रशासकीय व राजकीयस्तरावर भाविकांच्या जीवांचे मोल अद्याप कळले नसून,त्याची पुर्नरावृत्ती काल राजधानी दिल्लीत घडली आणि या देशातील नागरिकांच्या जीवाचे मोल हे किती ‘कवडीमोल’ आहे हे भारत नावाच्या या ‘अपघाताच्या देशाने’ पुन्हा एकदा सिद्ध केलं.
राजधानी दिल्लीच्याही रेल्वे स्टेशनवरुन प्रयागराजसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत.ऑन कॅमरा दिलेल्या प्रवाश्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एका तासात १५०० च्या वर प्रयागराजसाठी तिकीटा रेल्वे विकत होती!परिणामी,एकाच रेल्वेत जागा मिळवण्यासाठी दहा हजारांच्या वर प्रवासी प्लॅटफॉर्म क्र. १२,१३ आणि १४ वर जमा झाली होती.दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन प्रयागराजसाठी दोन रेल्वे सोडली जाणार होती मात्र,उद् घोषणा झाली प्रयागराजसाठी प्लॅटफॉर्म क्र.१६ वरुन रेल्वे सुटणार आहे आणि…येथेच घात झाला!प्लॅटफॉर्म क्र.१२,१३,१४ चे प्रवासी यांनी एकसाथ प्लॅटफॉर्म क्र.१६ साठी धाव घेतली.त्याचवेळी पाय-यांवरुन उतरणारे आणि चढणारे यांची एकच गर्दी झाली.वरुन गर्दीचा लोट आला आणि मधोमध पाय-यांवर उभे असणा-या प्रवाशांच्या अंगावर कोसळला,त्यांना तुडवत खाली उतरला!धड वर नही व खाली पण जाता-येता येण्याची संधी नव्हती,आपल्या मुलांबाळांसोबत महिला सर्वात आधी या गर्दीच्या पायाखाली तुडवल्या गेल्या.प्रयागराजमध्ये जाऊन मोक्ष मिळवण्याचा अट्टहास अश्रू आणि किंकाळ्यात क्षणात परिवर्तित झाला.
कोणाची आई,कोणाची बहीण,कोणाची वहिणी,कोणाची लहान-लहान मुले यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता,या घटनेनंतर सर्वांना रेल्वे स्टेशनच्या बाहेर काढण्यात आले.तिथे माध्यमांजवळ आपली व्यथा मांडताना प्रवाश्‍यांनी प्रशासनाच्या दुरावस्थेवर खापर फोडले.पोलिस,एसआरपीएफ,रेल्वेचे मोठे अधिकारी हे घटना घडून गेल्यावर ‘कर्तव्यावर’ दिसले!तोपर्यंत ज्यांनी अजून जग ही पाहिले नव्हते अशी निष्पाप बालके ही प्रशासनाच्या आणि राजकीय अनास्थेच्या बळी चढली होती !

(छायाचित्र: याच त्या प्लॅटफॉर्मवरील पाय-या ज्याच्यावरील गर्दीने ६ चिमुरड्यांसह १८ भाविकांचा बळी घेतला!)

या देशाचे हे एक खास वैशिष्ठ आहे,कोणत्याही पूर्वीच्या दुर्घटनेवरुन भारतीय प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेते हे बोध घेत नाही कारण….असे अपघात घडत राहणे व त्या अपघातात सर्वसामान्य लोकांचा बळी जाणे यालाच ते त्यांची ‘नियती’ मानतात!क्षणात १७ कुटूंबे उधवस्त झाली,कधीही न भरुन निघणारी पोकळी मृतकांच्या कुटूंबियांच्या जीवनात निर्माण झाली.मात्र,दोषी कोणीही ठरणार नाही,कोणालाही शिक्षा होणार नाही..ही..प्रशासकीय व राजकीय लोकांची ‘नियती’असते!महाकुंभ मेळाव्यातून कोट्यावधी रुपये कमावणारे रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव हे देखील नैतिकतेच्या नावाखाली आपला राजीनामा देणार नाही कारण मूळात..ते पूर्वीचे प्रशासकीय अधिकारी म्हणजे एक आयएएस अधिकारीच आहेत ज्यांच्या लेखी भारतातील जनतेप्रति संवेदनशील राहण्या ऐवजी दिल्लीतील आपल्या आकांप्रतिची निष्ठा ही जास्त महत्वाची असल्याचा अनुभव आहे.

गेल्या पंचाहत्तर वर्षात देशाच्या प्रशासकीय अधिकारी व नोकरशाहीमध्ये खोलवर रुजलेली सर्वसामान्य जनतेप्रतिची ही असंवेदनशीलताच वारंवार घात करत असते.कोणत्याही मोठ्या दुर्घटनेनंतर कोणत्याही दोषी प्रशासकीय अधिका-याला तुरुंगात जाताना जनतेने बघितले नाही.राजकीय सूड उगवण्यासाठी,गुजरातचे माजी पोलिस अधिकारी संजीव भट हे मात्र,तुरुंगात सडत आहेत!२८ वर्षांपूर्वीचे एक प्रकरण शोधून काढून त्यांना अटक करण्यात आली!सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड,माजी पोलिस महासंचालक आरबी श्रीकुमारसह संजीव भट यांनी खोटी शपथपत्रे तयार करुन तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता!
थोडक्यात,अपघाताच्या या देशात असे अपघात राजकीय वर्तुळात ही घडतात,इतकंच की यात कोण्या सर्वसामान्याचा बळी जात नाही.मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभ मेळ्यात घडलेली पहीली घटना नव्हती.तत्कालीन अलाहबाद(आजचे प्रयागराज)मध्ये १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ८०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.यंदा हा आकडा नेमका किती होता?हे वास्तव योगी सरकार पुढे येऊ देणार नाही,योगी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या दूर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला मात्र,घटनास्थळावरील अस्ताव्यस्त सामांनाचा ढिग  बघता ३०० च्या वर भाविक मृत्यू पावले असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी सांगतात!
१९८६ मध्ये उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरबहादूर आपल्या सा-या मंत्रीमंडळाला घेऊन कुंभस्नानाला आले असता गर्दी अनियंत्रित होऊन २०० च्या वर भाविकांचा बळी गेला होता.यंदा देखील अति विशिष्ठांसाठी फार मोठी जागा व्यापून ठेवली असल्याने सर्वसामान्यांना अतिशय रुंद जागेवरुन मार्गक्रमण करावे लागल्यानेच मौनी अमावस्येच्या दिवशी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.२००३ मध्ये नाशिक मधील अरुंद अशा सरदार चौकातून जाताना साधूंनी उधळलेली नाणी गोळा करण्यासाठी झालेल्या धावाधावीत गुदमरुन ३९ जणांचा बळी गेला होता.१९५४ च्या दुर्घटनेनंतर व्हीआयपी संस्कृतीला चाप बसवण्यात आला होता.१९८९ मध्ये प्रयागराजच्याच कुंभमेळ्याच्या वेळी सरकारमधील मंत्र्यांनी भाविक म्हणूनच कुंभ मेळ्यात सहभागी व्हावे,त्यांना कोणतेही राजशिष्टाचार देऊ नये,अशी सक्त सूचना तत्कालीन मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांनी दिल्या होत्या.योगी राजमध्ये त्या सूचनांना तिलांजली देण्यात आली.परिणामी,देशभरातून दररोज राजकीय नेते,मंत्री यांचे कुंभ स्नान सुरुच आहेत आणि त्यांच्या मागे पळताना प्रशासनाची दमछाक होत आहे.सामान्यांच्या जिवितेच्या सुरक्षेसाठी ना प्रशासनाकडे वेळ आहे ना राजकारण्यांकडे नैतिकता!पंतप्रधानांनी शोक संवेदना एक्सवर व्यक्त केली….!शिक्षा मात्र कोणालाही केली नाही.
अपघातांच्या या देशात कारखान्यांमध्ये होणा-या स्फोटात मृत्यू हा कामागारांचा होत असतो,आजपर्यंत एका ही कारखान्यातील स्फोटात कारखाना किवा कंपनीचा मालक मृत्यू पावला असल्याची घटना घडली नाही!याच वर्षी जानेवरी महिन्याच्या २४ तारखेला भंडारा येथील जवाहर नगरच्या आयुध निर्माणीतील(ऑर्डनन्स) कमी तापमानाच्या प्लास्टिक स्फोटक विभागात सकाळी दहा वाजता भीषण स्फोट होऊन आठ निरपराध कामगारांचा मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले.सकाळी आपापल्या प्रियजनांना निरोप देऊन,घरी लवकर परतण्याचे आश्‍वासन देऊन हे कामगार घरुन निघाले होते मात्र…..!समाेर आलेल्या माहितीनुसार ही स्फोटके शिकाऊ कामगार(अप्रेंन्टीस)हाताळत होते….!
दिल्ली येथील राजकोट येथील गेमझोनला लागलेल्या आगीत खेळाच्या आनंदात मशगुल असलेल्या ९ लहान निष्पाप मुलांचा खेळ झाला!एकूण २७ जणांचा मृतदेह नातेवाईकांचा डीएनए तपासून यंत्रणेला द्यावा लागला.महत्वाचे म्हणजे मे २०२४ मध्ये ज्या दिवशी ही घटना गेमझोनमध्ये घडली त्याच दिवशी दिल्लीतील नवजात अर्भकांच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत चार
बालकांचा मृत्यू झाला होता!
राजकोटमधील गेमिंग झोन ‘गुजरात व्यापक सामान्य विकास नियंत्रण‘ निमयावलीतील(जीडीसीटीआर)त्रुटींचा फायदा घेत उभारण्यात आल्याचे वास्तव समोर आले होते.संबंधित प्रशासनाच्या परवागनीशिवाय ते गेमझोन सुरु होते.अग्शिनशमचे ना-हरकत प्रमाणपत्र व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या टाळण्यासाठीच राजकोटमधील टीआपी गेम झोनमध्ये तात्पुरते बांधकाम करण्यात आले होते!केवळ राजकोटमध्येच नव्हे अहमदाबाद शहरात देखील अश्‍या अनाधिकृत गेमझोन्सची भरमार आहे.या गेमझोन्समध्ये पेट्रोल,फायबर आणि फायबर ग्लासशीट्स यासारख्या अत्यंत ज्वलंतशील पदार्थांचा साठा होता.उन्हाळाच्या सुटीचा अानंद लृटण्यासाठी आलेले १२ वर्षाखालील चार मुलांसह २७ निरपराध जण आगीत होरपळून मृत्यू पावले तर ३ जण जखमी झाले.मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली…!पंतप्रधान मोदींकडून २ लाखांची मदत…!
मुंबईत तर जाहीरात फलक कोसळून त्या खाली १५ जणांचा हकनाक जीव गेला होता.जनतेचा जीव गेल्यानंतर काही काळापुरतीच सत्तेला शहाणपण येत असतं.यानंतर पुन्हा प्रशासन आणि राजकारण्यांची निष्क्रियता, नियमांमधून पळवाटा,लाचखोरी,भ्रष्टाचाराने बरबटलेली कार्यपद्धती आणि सर्वसामान्य जनतेप्रतिची असंवेदनशीलता यांचं चक्र पुन्हा सुरु होतं…!
भंडारामध्ये ९ जानेवरी २०२१ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये मध्यरात्री आग लागून दहा नवजात शिशुंचा गुदमरुन झालेला मृत्यू हा संपूर्ण संवेदनशील मनाला चटका लाऊन गेला होता.यातील एक शिशू तर जन्मदात्यांना लग्नाच्या दहा वर्षांनतर झाला होता!काय झाली असावी त्या मातेची अवस्था?सगळ्या माता या ओल्या बांळतीण होत्या,शरीराची बाळंतपणाची वेदना ही आपल्या बाळासाठी विसरणा-या त्या मातेच्या मनाची आणि जिवनाची अवस्था काय झाली होती?रात्र पाळीत कर्तव्यावर असणा-या दोन महिला कर्मचा-यांना  रात्रीची झोप इतकी प्रिय होती की,नवजात शिशूंच्या कक्षाची कडी बाहेरुन लावून त्या शेजारच्या खोलीत चक्क जाऊन झोपी गेल्या होत्या.मध्यरात्री शॉट सर्कीटमुळे त्या कक्षात आधी काळासार धूर पसरला नंतर हळूहळू आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण कक्ष आला,त्या दोन महिला कर्मचा-यांना जेव्हा जाग आली तोपर्यंत…काचेच्या पेटीत जिवनासाठी धडपडणा-या त्या अबोल नवजात शिशूंचे प्राण काळ्यासार धूरांत रडून-रडून कधीचेच निघून गेले होते!
यावरही राज्य सरकारने नेमलेली तज्ज्ञांची समिती,अहवाल व पुढे…कोणतीही कार्यवाही नाही!हाच कित्ता गिरवण्यात आला.नगरच्या जिल्हा रुग्णायात सहा रुग्णांचा गुदमरुन मृत्यू भंडारातील घटना घडल्याचा एक दिवस आधी झाला!नगरच्या जिल्हा रुग्णालयाची ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधून घेण्यात आली होती.आरोग्य विभाग केवळ निधी उपलब्ध करुन देतो.बाकी तांत्रिक गोष्टी आणि बांधकाम त्या विभागाकडूनच होत असंत.अग्निसुरक्षा व्यवस्थेसाठी बांधकाम विभागाने २ कोटी ६० लाखांचे अंदाजपत्रक दिले होते,ते तांत्रिक मंजुरीच्या प्रतिक्षेत असतानाच ही दुर्घटना घडली!तांत्रिक मंजुरीच्या अर्जाला सुद्धा वर्षानुवर्ष उलटले होते!सर्वसामान्य रुग्णांच्या जिवितेच्या सुरक्षेसाठी सरकारला मंजूर करण्यास हा निधी खूप जास्त नव्हता,पण….या निधीत ‘टक्केवारीच’नसल्याने पुढाकार घेण्यास कोणालाही उत्सुकता नव्हतीच त्यामुळेच अग्निशमन यंत्रणाच नसलेल्या शासकीय रुग्णालयात लाचार रुग्ण होरपळून मृत्यू पावलेत.
महत्वाचे म्हणजे हा काळ कोरोनाचा होता आणि ही दुर्घटन कोरोना अतिदक्षता विभागातच घडली होती!सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना अतिदक्षता विभागातील कर्मचा-यांच्या निष्काळजीपणा आढळून आला.त्यांनी थोडा धोका पत्करला असता तर अनेकांचे जीव वाचले असते असे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी सांगितले होते.घटनेच्या वेळी काही मिनिटांचे चित्रिकरण पोलिसांच्या हाती लागले होते.त्यामध्ये छताच्या बाजूने धूर निघत असल्याचे दिसून पडले.एकूण परिस्थिती पाहता रुग्णांना त्वरित अतिदक्षता  विभागा बाहेर काढण्याची ब-यापैकी संधी होती.काही रुग्णांचे नातेवाईक धावत येऊन आपल्या रुग्णांना बाहेर घेऊन जाताना दिसून पडले.एक रुग्ण तर स्वत:रांगत अतिदक्षता कक्षातून बाहेर पडला.मात्र,ज्यांची जबाबदारी होती ते आरोग्य कर्मचारी कुठेही बचाव कार्य करताना दिसून पडले नाहीत.शासकीय कर्मचारी कर्तव्यावर नसून चक्क झोपी गेले होते….!११ जणांचा बळी घेणा-या या दुर्घटनेत देखील चौकशीचा उपचार आणि कारवाईचे सोपस्कार पार पडले..ऐन दिवाळीत ११ कुटूंबियांची दिवाळी कायमची अंधारलेली झाली…!
नाशिकमध्येच झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीमधून वायुगळती झाली आणि अग्नितांडव सुरु झाले.त्यात कोरोनाची गंभीर बाधा झालेल्या व जीवनरक्षक प्रणालीवर असलेल्या २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता! याचा देखील चौकशी अहवाल मंत्र्यालयातील एक नस्ती म्हणजेच फाईल बनून आरोग्य खात्यात पडून राहीली.
या घटनेनंतर नंतरच्या चारच दिवसात पालघर येथे वातानुकूलित यंत्रणेतल्या बिघाडामुळे १३ रुग्णांचा बळी गेला होता.या सर्व घटनांची गंभीर दखल मुंबई  उच्च न्यायालयाने घेतली व राज्यातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालये यांचे फायर ऑडिट तातडीने करण्याचे आदेश सरकारला देतानाच प्रतिबंधक उपाय न योजना-या रुग्णालयांना टाळे लावण्याची निर्देश दिले हाेते.न्यायालयाचे हे निर्देश सरकारने गांर्भीयाने न घेतल्यानेच अवघ्या सहा महिन्यातच नगर मधील दूर्घटना घडली व ‘राज्यातील रुग्णालये ही लाक्षागृहे बनली आहेत‘अशा तिखट शब्दांत  मुख्य न्यायाधीशांनी सरकारला बोल लावून देखील सरकारने त्याकडे कानाडोळा केला.
यामागे खासगी रुग्णालये,त्यांना परवानगी देणारी मेडिकल कौन्सिल तसेच आरोग्य खात्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले निबर कातडीचे अधिकारी यांच्या साटेलोट्यात हे मृत्यू दडले आहेत!संपूर्ण देशातच हे घडतं.२०२० च्या नोव्हेंंबर महिन्यात राजकोटमधील उदय शिवानंद रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांना मृत्यूने गाठले.एप्रिल २०२१ मध्ये रायपूर येथील राजधानी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आगीत ५ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.
१७ डिसेंबर २०२४ म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नागपूरात अमरावती महामार्गावरील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत रविवारी सकाळी शक्तीशाली स्फोटात ९ कामगा-यांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या.मृतांमध्ये ६ महिला होत्या.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनास्थळ गाठले,मृतकांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.बाहेर नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.या युनिटमध्ये सकाळी एकूण १२ कामगार ‘ट्रायनायट्रोटोल्यून‘स्फोटकाचे पॅकेजिंग करीत होते.यातील ३ कामगार घटनेच्या अवघ्या काही मिनिटा आधीच त्या यूनिटमधून बाहेर पडले हाते मात्र….!
२०१८ मध्ये ही याच कंपनीत स्फोट झाला होता ज्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता!केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेक मंचावर नुवाल हे दिसून पडतात!गडकरी यांनी दिवंगत आत्म्यांना सद् गती मिळण्याची प्रार्थना माध्यमांकडे व्यक्त केली….!फडणवीस यांनी राज्य सरकार ठामपणे मृतकांच्या कुटूंबियांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.सरकार ५ लाख तर कंपनी २० लाख रुपये मदत देणार असल्याचे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घटना दूर्देवी असल्याचे सांगत जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी दिली मात्र…९ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असलेली यंत्रणा व माणसे यांना दोषी धरुन जबर शिक्षा करण्याचे आश्‍वासन मायबाप सरकार व नेत्यांनी टाहो फोडणा-या गरीब मृतक कामगारांच्या कुटूंबियांना दिलेच नाही…!
यातील चौघांचे पूर्णपणे भाजलेले मृतदेह आणि २० पाकिटांमधून अवयवांचे तुकडे डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले गेले होते….!हातावर पोट असणारे हे कामगार सकाळी घरुन आपल्या कुटूंबात नेहमीप्रमाणे जिवंत परत येतील या आशेवर यूनिटमध्ये गेले होते पण….?कमी वेतनावर ठेवण्यात आलेले अकुशल कामगार आणि सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली यावर मायबाप सरकार आणि नेतेगण काही बोललेच नाही…!
डोंबिवलीत २३ मे २०२४ रोजी एमआयडीसीच्या फेज दाेनमधील केमिकल कंपनीत दुपारी १.३० वा.रिॲक्टरचे तीन भीषण स्फोट झाले व स्वत:चा बचाव करण्यासाठी अर्धवट जळालेले कामगार सैरावैरा पळत सुटलेले दृष्य अंगावर काटा आणणारे होते.घटनास्थळी ८ जणांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह पडले होते.६४ जण गंभीर जखमी झाले होते.या कंपनीत मिथील इथिल केटोल पेरॉक्साईड,ऑरगॅनिक केमिकल्स यासारख्या रसायनांचे उत्पादन घेतले जात होते.दूपारी रिॲक्टरमध्ये वेगवेगळी केमिकल्स मिळसत असतानाच हे स्फोट झाले.पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर या स्फोटांमुळे दणाणून गेला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देत मृतकांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत जाहीर केली….!
ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाला.या नवजात बालकांमध्ये काही मुलांचे वजन कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाने केला.याच रुग्णालयात १३ ऑगस्ट २०२३ रोजी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती.रुग्णालयाच्या कार्यक्षमेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून या रुग्णालयात अवघ्या ४८ तासात ८ नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
अपघातांच्या या मालिकेत २ जुलै २०२४ रोजी हाथरस येथील सुटाबुटातील बाबांच्या प्रवचनात चेंगराचेंगरीत १०० च्या वर भाविकांचा मृत्यू झाला होता.भक्तांनी मला बोलावले असल्याचे हे बाबा सांगतात मात्र,त्यांच्या या कृत्यामुळे १०० च्या वर निष्पाप भाविकांना देवाने बोलावून घेतले त्याचे काय?महाराष्ट्रातील मांढरदेवी आणि राजस्थानमधील चामुंडा देवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या ही ५०० हून अधिक आहे!२५ जानेवरी २००५ रोजी महाराष्ट्रातील मांढरदेवी चेंगराचेंगरीच्या घटनेत ३४० भाविकांचा मृत्यू झाला होता!

३ ऑगस्ट २००८ रोजी हिमाचल प्रदेशात नैना देवी मंदिर येथे पादच-यांसाठी उभारलेले शेड कोसळल्याने झालेल्या पळापळीत १६२ भाविकांचा मृत्यू,१२ गंभीर जखमी,३० सप्टेंबर २००८ जोधपूर येथील मेहरागढच्या चामुंडा देवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत २०० पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू,४ मार्च २०१० उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्हातील रामजानकी मंदिराजवळ चेंगराचेंगरीत ६३ भाविकांचा मृत्यू,१४ जानेवरी २०११ केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुलमेदू येथे शबरीमाला मंदिराच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी होऊन १०४ भाविकांचा मृत्यू,८ नोव्हेंबर २०११ रोजी हरिद्वार येथील हर की पौडी येथे चेंगरा चेंगरीत २० भाविकांचा मृत्यू,२५ सप्टेंबर २०१२ झारखंडच्या देवघर येथे ठाकूर अनुकूल चंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात आश्रमाच्या परिसरात चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू,१९ नोव्हेंबर पाटण्यातील अदालत घाटावर छट पुजेच्या वेळी चेंगराचेंगरीत २० भाविकांचा मृत्यू, १० फेब्रुवरी २०१३ रोजी अलाहबाद येथे कुंभ मेळ्यासाठी जमलेल्या भाविकांची रेल्वे स्थानकावर अचानक धावपळ उडाली व त्यात चेंगराचेंगरीत ३९ भाविकांचा मृत्यू,१३ ऑक्टोबर २०१३ रोजी नवरात्रीच्या काळात मध्य प्रदेशातील दातिया येथील रत्नगड मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन ११५ जणांचा मृत्यू,१५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकुट येथे कामतनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन १० भाविकांचा मृत्यू ६० जखमी,३ ऑक्टोबर २०१४ रोजी पाटण्यातील गांधी मैदान येथील दसरा उत्सवात चेंगराचेंगरी होऊन ३२ जणांचा मृत्यू,१४ जुलै २०१५ रोजी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथे पुष्पकरम उत्सवदरम्यान गोदावरीच्या काठावर जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी होऊन २७ जणांचा मृत्यू,२० जखमी,१ जानेवरी २०२२ रोजी जम्मू काश्‍मीरमधील माता वैष्णव देवी भवन येथे पहाटे अडीच वाजता झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू २० जखमी,३१ मार्च  २०२३ रोजी इंदोर शहरात रामनवमीनिमित्त आयोजित होम हवनच्या कार्यक्रमात प्राचीन बावडीवरचा स्लॅब कोसळल्याने ३६ जणांना मृत्यू…..!या सर्व घटना व अपघातील मृत्यू प्रशासकीय अनास्था व राजकीय असंवेदनशीलतेचे बळी असले तरी भाविकांच्या भक्तीभावावर याचे सोयीस्कर खापर फोडून प्रशासन व नेते जबाबदारीमुक्त झालेले दिसून पडतात.

१५ नोव्हेंबर २०१७ रोजी झाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागाला आग लागून इन्क्युबेटरमध्ये असलेल्या दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.१६ बालके गंभीर भाजली होती.शॉटसर्कीटमुळे आग लागली होती.पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री योगी यांनी घटनेबद्दल संवेदना व्यक्त केली.या घटनेचे काही व्हिडीयोज काळजाचा थरकाप उडवणारे आहेत.आपल्या पिलांना वाचवण्यासाठी मातापित्यांची जीवघेणी धडपड आणि रुग्णालया प्रशासनावरील संताप शब्दबद्ध करण्या पलीकडे होते.भीषण आग आणि काळ्याशार धूरामुळे अतिदक्षता कक्षात कोणालाही जाता येत नव्हते.त्यावेळी अतिदक्षता कक्षात त्या काचेच्या पेटीत एकूण ५२ ते ५४ नवजात बालके उपचार घेत होती.हे रुग्णालय उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे!
या संपूर्ण घटनाक्रमातून देशाच्या किवा राज्यांच्या मायबाप सरकारने ज्या जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी ते निवडूण आल्याचा दावा करतात, त्याच जनतेच्या,कामगारांच्या आणि भाविकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी काहीही केले नसल्याचे सिद्ध होतं.त्यामुळेच राजकीय व प्रशासकीय अनास्थेचे हे दूर्देवी बळी असेच जात राहतील.मोठी धेंडे जगत राहतील,या सर्व दुघर्टना जणू हेच सिद्ध करतात,अपघातांच्या या देशातील संविधानात कितीही समानतेचे अधिकार असले तरी,गरिबांच्या वाटेला असेच अपघाती मृत्यू येणे हेच या देशाचे देखील प्राक्तन आहे,असेच आता म्हणावे लागेल.
…………………………………………
(तळटीप:-
आजच काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होऊन या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले आहेत.

या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत….!)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या