

इसासनीच्या बटालीयनसाठी १०८ कोटी रुपयांची मंजुरी: सलील देशमुख
नागपूर, ८ ऑक्टोबर २०२४: काटोल व नरखेड तालुक्यासाठी एक नवी दिशा देणाऱ्या भारत राखीव बटालीयन क्र. ५ ला या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी मंजुरी दिली होती. यासाठी महसुल विभागाची १०० एकर जमीन ही पोलिस विभागाला हस्तांतरित करण्यात आली. परंतु त्यांच्या अडचणीच्या काळात पुढील कामे थांबली होती. नंतर राज्यात सत्तापालट झाले आणि या बटालीयनचे संपुर्ण काम थंडबस्त्यात गेले. पुढील कामासाठी भाजपाच्या नेत्यांनी निधीच मिळु नये यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रशाकीय स्तरावर सात्यतपूर्ण पाठपुरावा केल्याने ९०० कोटीच्या या प्रकल्पाला पायाभुत सुविधा उभारणीसाठी १०८ कोटी रुपयाचा पहिला हप्ता मंजुर करण्यात आला. सध्या निविदा प्रक्रियचे काम सुरु असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अकोला जिल्हातील तेल्हारा तालुक्यात हिंगाणा येथे राज्य राखीव दलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर होते. पंरतु जमीन मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसापासुन तेथील काम थांबले होते. राज्याच्या गृहमंत्री पदाचे सुत्र हातात घेताच अनिल देशमुख यांनी ते बटालीयन काटोल – नरखेड मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी सुरुवातीला जागेचा शोध घेण्यात आला. काटोल व नरखेड तालुक्याच्या मधोमध असलेल्या इसासनी येथे महसुल विभागाची १०० एकर जमीन यासाठी निवडण्यात आली. नंतर ही जमीन पोलिस विभागाला हस्तांतरित करून बटालीयनला मंजुरी देण्याची प्रकीया सुरु करण्यात आली. परंतु चुकीच्या आरोपामुळे अनिल देशमुख यांना पद सोडावे लागले. यानंतर या बटालीयनसाठी मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अंतीम मंजुरी दिल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.
पुढे राज्यात सत्तापलट झाले आणि या कामाचे श्रेय अनिल देशमुख यांना मिळेल म्हणुन भाजपाच्या नेत्यांनी ९०० कोटीच्या या प्रकल्पाला पैश्याची तरतुद करण्यासाठी टाळाटाळ केली. यासाठी अनिल देशमुख यांनी अनेक वेळा विधानसभेत आवाज उठविला. सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे पत्रव्यवहार केला. परंतु भाजपाच्या स्थानीक नेत्यांपासून ते वरीष्ठ पातळीवरील नेत्यांनी या बटालीयनला निधी मिळु नये यासाठी प्रयत्न केला. भाजपाचे नेते मंडळी या कामासाठी निधी देत नसल्याने शेवटी सलील देशमुख यांनी गृह विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून त्यांना निधी देण्याची मागणी केली.
एक महत्वाकांक्षी दुष्टीकोणातुन व पोलीस विभागाचाच यात फायदा होत असल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गृह विभागातुन या बटलीयनच्या पायाभुत सुविधेसाठी १०८ कोटीच्या पहिला हप्त्याला मंजुरी मिळाली आहे. यात प्रामुख्याने प्रशासकीय ईमारत, रस्ते, नाल्या, सुरक्षा भिंत विज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची प्राथमीक व्यवस्था यासह इतर बाबींचा समावेश करण्यात आला असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.
या बटालीयनमध्ये ३२६ पदे मंजुर असून यात प्रामुख्याने समादेशक, पोलिस निरीक्षक, सशस्त्र पोलिस, वैद्यकीय अधिकारी, चालक, परिचारीका, सफाई कामगार यांचा सह इतर पदाचा समावेश आहे. इसासनी येथे सुविधा नसल्याने एस.आय.पी.एफ. कॅम्प अमरावती येथे ही बटालियन गेल्या दोन वर्षापासुन कार्यान्वित करण्यात आली आहे. मंजुर झालेल्या निधीचे काम सुरु झाल्या नंतर, ही बटालियन इसासनी येथे स्थालांतरी करण्यात येणार आहे. काटोल व नरखेड तालुक्याच्या मधोमध ही बटालियन होणार असल्याने दोन्ही तालुक्यातील नागरीकांना याचा फायदा होणार आहे. यामुळे अनेकांना रोजगारीची संधी सुध्दा उपलब्ध होणार असल्याचे सलील देशमुख यावेळी म्हणाले.
………………………….




आमचे चॅनल subscribe करा
