फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअतिक्रमण, पार्कींगबाबत नागरिकांनी मांडल्या समस्या: 'वाॅक अँड टाॅक विथ मेयर' उपक्रम

अतिक्रमण, पार्कींगबाबत नागरिकांनी मांडल्या समस्या: ‘वाॅक अँड टाॅक विथ मेयर’ उपक्रम

 मेजर सुरेंद्रदेव पार्क धंतोली येथे महापौरांनी ऐकल्या समस्या

नागपूर, ता. 24: रस्त्यावर अतिक्रमण, अतिक्रमणामुळे अरूंद रस्त्यांवर होणारा वाहतुकीचा खोळंबा, पार्कींगची समस्या, मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये असलेली दहषत, त्यातच फुटपाथवरील दुकाने, काही ठिकाणी तुटलेले फुटपाथ अशा स्थितीत पायी चालणा-यांनी चालावे तरी कुठून, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी मांडला. रविवारी ता.24 धंतोली येथील मेजर सुरेंद्रदेव पार्क येथे ‘वाॅक अँड टाॅक विथ मेयर’मध्ये महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला.  यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह नगरसेवक लखन येरवार, नारायण अग्रवाल, माजी नगरसेवक बबलू देवतळे, राजेंद्र मुंडले आदी उपस्थित होते.

परिसरातील रहिवासी, माजी नगरसेवक बबलू देवलळे यांनी मोकाट कुत्र्यांची समस्या यावेळी मांडली. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सकाळी उद्यानात फिरायला येणा-या नागरिकांवर कुत्री भुंकणे व हल्ला करीत असल्याने परिसरातील नागरिक नेहमीच दहशतीत राहतात. याशिवाय कंत्राटदारांकडून वस्तीमध्ये करण्यात येणा-या कामांमध्ये दिरंगाई केली जाते तसेच बांधकामाचे साहित्यही अनेक दिवस रस्त्यावरच पडून असते, याबाबत त्यांनी समस्या मांडली.

कर्नल दाते यांनी फुटपाथ, मुख्य मार्गावर पार्कींगमुळे रस्त्यावर वाहतुकीला व पायी चालणा-यांना त्रास संबंधी समस्या मांडली. धंतोलीमधील दुकानांमधून निघणा-या कच-याचे योग्य व्यवस्थापन करण्याची सूचना अँड. सुनील पारधीकर यांनी मांडली.

धंतोली परिसरातील हाॅटेल हरदेवच्या मागील बाजुला असलेल्या फुल मार्केटमुळे परिसरातील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सायंकाळी फुल मार्केट बंद झाल्यानंतर परिसरात सडक्या फुलांची दुर्गंधी पसरते. तसेच जवळीलच भिडे कन्या शाळेच्या भिंतीजवळ लोक लघवी करीत असल्याने त्यामुळेही परिसरातील नागरिकांना घाण वास सहन करावा लागतो या समस्येबाबत  श्री. वैरागडे यांनी अवगत केले.

सायकल स्टॅंड वाल्यांकडून होणारी दादागीरी, अजनी रेल्वे स्टेशन ते धंतोली पोलिस स्टेशन मार्गावर वाहतुकीची समस्या असल्याचे अतुल घावरे यांनी सांगितले. धंतोली येथील आॅल इंडिया रिपोर्टर जवळ आपली बसचे शहर बस स्थानक उभारल्यास या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न काही अंशी सुटेल अशी संकल्पना श्री. चक्रदेव यांनी मांडली.

धंतोली येथील मेजर सुरेंद्रदेव पार्कमध्ये ग्रीन जिम आहे. मात्र येथेे येणा-या नागरिकांची संख्या लक्षात घेता महिला व पुरूषांसाठी वेगवेगळे ग्रीन जिम असावे, अशी मागणी श्री.नाईक यांनी केले.

यावेळी परिसरातील पी.के. ठाकुर, मनोेज जोशी, दिपक मोहता, जयमाला काशीकर, हेमा माळी यांच्यासह अनेक नागरिकांनी समस्या मांडल्या. रहाटे काॅलनी चैकातील डम्पिंग यार्डमुळे पसरणारी दुर्गंधी, धंतोली येथील प्रकाश किराणा जवळ ड्रेनेजची समस्या, धंतोली पार्कचे सौंदर्यीकरण, पार्कमध्ये प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे आदी समस्यांच्या पूर्तीची मागणी यावेळी करण्यात आली.

नागरिकांनी शहर स्वच्छ व सुंदर  ठेवण्यात सहकार्य करावे : महापौर

नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांना उत्तर देताना महापौर संदीप जोशी म्हणाले, आपल्या सुविधेच्या दृष्टीने करण्यात येणा-या तक्रारी आणि विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. परिसरातील पार्कींग, वाहतूक याबाबतीत शिस्त लावण्यासाठी यापुर्वीच धंतोली नागरिक मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले आहेत. पंचशील चैक ते धंतोली पोलिस स्टेशन आणि नीलगगन ते लोकमत चैक मार्गावर एकमार्गी वाहतूक व्हावी यासाठी यापूर्वीच नोटीफिकेशन दिले होते मात्र ते कायदेशीर प्रक्रियेमुळे हाउ शकले नाही. या मार्गावर एकमार्गी वाहतूक लागू करण्यात आल्यास या परिसरातील बहुतांशी वाहतूक समस्या सुटेल, यासाठी प्रयत्नरत आहे. मात्र यासोबतच नागरिकांनी आपलीही जबाबदारी समजून घ्यावी. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरातून निघणारा कचरा ओला आणि सुका असा वर्गीकृत करूनच द्यावा, असे आवाहनही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी केले.

शहरातील डुकरांबाबत जी संकल्पना राबविण्यात आली तशीच काही संकल्पना न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन न करता राबविता आली तर कळवा, असे आवाहन करताना महापौरांनी सांगितले की, मोकाट कुत्र्यांबाबत शहरातील खासगी डाॅक्टर्सची बैठक बोलाविण्यात आली आहे. आपले शहर ही आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्या शहराच्या संरक्षण, संवर्धन व स्वच्छतेच्या दृष्टीने कर्तव्याने कार्य करणे गरजेचे आहे, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

अतिक्रमण संदर्भात नगरसेवक आणि मनपातील वरीष्ठ अधिका-यांची समिती लवकरच गठीत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या