Advertisements

मोदींचा आरोप सत्तर कोटींचा घाटाळेबाज:शहांची टिपण्णी योग्य ठिकाणी बसलात!
संघाच्या मुखपत्रातील अजित पवारांबाबतचा मजकूर काय अधोरेखित करतो?
बारामतीचा मतदार राजा जिंकला,मान्य कराल का?
डॉ.ममता खांडेकर
(senior Journalist)
नागपूर,ता.१४ जून २०२४: बहूचर्चित सिंचन गैरव्यवहारामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फार उशिरा जबाबदार धरले.सत्तर हजार कोटी रुपये खर्च करुनही जेमतेम शून्य दशमलव एक (०.१)दशांश सिंचन क्षमता वाढविण्यात आलेले यश नागपूरमधील स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे महाराष्ट्रासमोर आले.त्यात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही भरपूर वेळ घेत, विभागाने अखेर आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले.यात अजित पवार यांनी अधिकारांचा गैरवापर करुन कंत्राटांमध्ये हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला!यावर राजकीय हस्तक्षेपाचा कळस म्हणजे पवार यांची,हे सर्व काम बघण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची होती ही भूमिका अमान्य करीत अनेक कंत्राटे त्यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने दिल्याचे स्पष्ट झाले!
ही याचिका विदर्भातील सिंचन प्रकल्पांबाबत असली तरी त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर बोट ठेवणारी ठरली.या प्रकरणात २४ तक्रारी दाखल झाल्यात तरी याची जबाबदारी कोणाची हे निश्चित होत नव्हते.अखेर उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर प्रतिज्ञापत्र दाखल झाले.स्वातंत्र्यानंतर सिंचन वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प आखले गेले,पण ते कागदावरच राहीले.इतकंच नव्हे तर अनेक प्रकल्पांची कामे एकदम सुरु करुन कोणत्याच प्रकल्पाला पुरेसा पैसा न देण्याचे पाप ही राज्यकर्त्यांनी केले.त्यात ही प्रकल्पाची कामे आपल्याच कंत्राटदारांना देऊन खो-याने माया जमवण्याची किमया राज्यकर्त्यांनी लीलला आत्मसात केली.
दूर्देवाची बाब म्हणजे शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र, त्यात ही विदर्भाची ओळख आहे.दुष्क़ाळ आणि अवकाळी पावसाने शेतक-यांना दर वर्षीच दणका दिला.साहजिकच उत्पन्नाचे एकमेव स्त्रोत असणारा अन्नदाता शेतकरी फाशीचे दोर जवळ करीत गेले.अजित पवार यांनी केवळ ३ महिन्यात ३२ मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली.इतकेच नव्हे तर यातील काही प्रकल्पांचा खर्च वाढत असल्याचे जलसंपदा विभागातील अधिका-यांनी नजरेस आणून दिल्यानंतरही आपल्या अधिकारात हे आक्षेप बाजूला सारत ही कंत्राटे देण्यास अजित पवार यांनी भाग पाडले!
रायगड जिल्हातील बाळगंगा प्रकल्पाचे कंत्राट ४० टक्के जास्त रकमेचे देण्यात आले.हे कमी काय होते म्हणून ३५२ कोटी रुपयांच्या या धरणाचे अंदाजपत्रक एका वर्षात,१ हजार २२० कोटी रुपयांवर गेले!कोंढाणे(कर्जत)येथील प्रकल्पाची किंमतही ५०० टक्क्यांनी वाढवली.अनेक प्रकल्पांबाबत हेच घडले,ज्याचे उत्तर अद्यापही अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिली नाहीत. एकेकाळी ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मूग गिळून गप्प बसणे पसंद केले.
नागपूर खंडपीठापुढे सहा वर्षे या याचिकेवर सुनावणी सुरु होती.राज्य तसेच विदर्भातील शेतक-यांना हक्काच्या सिंचनापासून वंचित ठेवण्याचे पाप पवारांच्या हातून घडले,हे मान्य करावे लागेल.कोरडवाहू शेतीमुळे शेकडो बळीराजांनी आत्महत्या केल्या,काही कायमचे कर्जबाजारी झाले तर काहींच्या पिढ्याच बर्बाद झाल्या.७० हजार कोटींचा आकडा हा राज्याच्या तिजोरीवर पडणारा दरोडाच आहे, जग सोडून निघून जाणा-या बळीराजांच्या जीवाची किंमत त्याहून अधिक बहूमूल्य आहे.
याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२३ रोजी भोपाळ मध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबाेधित करताना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाच्या सिंचन घोटाळा,सहकारी बँक घोटाळा,अवैध उत्खनन घोटाळा याविषयी टिपण्णी केली.यानंतर लगेच २ जुलै रोजी अजित पवार हे ४० आमदार घेऊन भाजप-शिंदे सेनेच्या युतीच्या सरकारमध्ये सहभागी होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री बनतात.पुढे या सिंचन घोटाळ्यांच्या केसचे काय झाले?हे सर्वविदीत आहे.ज्यावेळी झारखंडमध्ये मोदी हे भ्रष्टाचारावर भाषण देत होते त्याच वेळी महाराष्ट्रात अजित पवार हे राज्यपालांच्या हस्ते शपथ घेत होते!
२ जुलै २०२३ रोजी अजित दादा महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर ६ जुलै २०२३ रोजी चिंचवड येथे अमित शहा यांच्या हस्ते केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या ‘वेब पोर्टलटचे उद्धघाटन झाले त्या कार्यक्रमात ‘अजित दादा तुम्ही योग्य ठिकाणी बसलात मात्र,खूप उशिर केला’अशी टिपण्णी शहा यांनी केली होती.शहा यांच्या या विधानावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता.लोकसभेत मतदारांनी मात्र कोणाची,कोणती योग्य जागा होती,हे चोखपणे दाखवून दिले.
अजित पवारांच्या महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दोनच दिवसानंतर ७० हजार कोटींच्या सिंचन घाेटाळ्याशी संबंधित ९ खटले बंद करण्याचा निर्णय महराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)ने घेतला व या ९ केसेसची फाईल बंद केली.
सर्वाधिक घोटाळा विदर्भातील सिंचन क्षेत्रात झाला असताना व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे सुपुत्र असतानाही त्यांनी केवळ सत्तेसाठी(दिल्लीश्वरांच्या) विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम केले,अशी टिका समाज माध्यमात उमटली.एसीबीचे संचालक परमबीर सिंह यांनी सांगितले जे केसेस बंद करण्यात आले त्यात अजित पवार यांचे नाव नव्हते!महत्वाचे म्हणजे हे केसेस ‘सशर्त’ बंद करण्यात आले असून ,नवी काेणती माहिती मिळाल्यास चौकशीसाठी त्यांना पुन्हा खुले करण्यात येईल!याचा अर्थ अजित पवारांच्या डोक्यावरील टांगती तलवार बखुबीने कायम ठेवण्यात आली.राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या १९९९ ते २०१४ वर्षांच्या कार्यकाळात अजित पवार हे सर्वाधिक काळासाठी जलसंपदा मंत्री होते!
या प्रकरणात तीन हजार कंत्राटांची चौकशी झाली,जलसंपदा विभागाच्या एका अभियंताने तर एक पत्रच लिहून आरोप केला की राजकीय दबावाखाली अनेक असे धरण निर्माण करण्यात आले ज्याची काहीही गरज नव्हती!एवढंच नव्हे तर वारंवार खर्चापोटी पैसे उकळले जावेत यासाठी अनेक धरणे हे अतिशय कमकुवत बनवण्यात आले.२०१४ मध्ये सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजपने हा भष्ट्राचाराचा मुद्दा ,महाराष्ट्रात निवडणूकीचा मुद्दा बनवला होता व १०८ विधानसभेच्या जागा जिंकल्या .भाजप सत्तेवर आल्यानंतर विदर्भाच्या बळीराजाला तसेच शहरी जागरुक मतदारांना ही अपेक्षा होती, आता अजित पवार हे तुरुंगात दिसतील मात्र,मतदारांची फसवणूक करीत अजित दादा हे महाविकासआघाडी तसेच महायुतीच्या सत्तेत दिसले!
याचाच परिणाम म्हणजे विदर्भात भाजपला तोंडघशी पडावे लागले व १० पैकी केवळ नागपूर व अकोलाची जागा यंदाच्या लोकसभा निवडणूकीत जिंकता आली. ती देखील उमेदवारांच्या स्व-प्रतिमेमुळे या जागा जिंकता आल्या यात माेदी यांचे कोणतेही कर्तृत्व नव्हते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनाइजर’मध्ये नुकतेच विदर्भात,राज्यात तसेच देशात मोदी सरकारला बहूमत न मिळू शकल्याचे विश्लेषण करताना, अजित पवार यांना सत्तेत सहभागी करुन घेतल्याच्या निर्णयावर सडकून टिका करण्यात आली.याचे खापर जरी फडणवीस यांच्यावर फोडण्यासाठी दिल्लीचे शीर्षस्थ नेते तत्पर असले ,तरी कोणाताही निणर्य मोदी-शहा यांच्या संमतीशिवाय होत नाही.‘इंडिया’आघाडीला देशात कमकुवत करायचे असल्यानेच शरद पवार गटातील ताटातुट मोदी-शहा जोडीला महत्वाची वाटत होती, भाजप-सेनेच्या युतीत अजित पवार यांचा समावेश करुन ’इंडिया’आघाडीची प्रतिमा मतदारांसमोर कमकुवत ठरविण्याचा मोदी यांचा डाव फसलाच.महराष्ट्रात केवळ ९ जागा देऊन भाजपची बोळवण झाली आणि देशात बहूमताचा आकडा मोदींचा ‘चेहरा’गाठू शकला नाही.आता संघाच्या मुखपत्रातील आरोपांवर देशात चर्वितचर्वण सुरु असले तरी,अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडून नेमके काय मिळाले?सिंचन घोटाळ्याच्या खटल्यातून ‘तात्पुरता’दिलासा व ईडीपासून सूटका,याचे उत्तर आता तरी अजित पवार महाराष्ट्रातील जनतेला देणार का….?
आता तर सहकारी बँक घोटाळ्यातूनही अजित पवार हे निर्दोष सुटले आहेत,अजित पवारांची विचारधारा गुंडाळून संधीसाधू सहभागिता यातून ठलकपणे अधारेखित होते.
बारामतीत अतृप्त आत्म्याचा उमेदवार विजयी-
महायुतीच्या पुणे येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘अतृत्प आत्मा’असा उल्लेख केला.यावर ४ जून रोजी समजेल,अतृप्त आत्मा कोण?असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.यावर विचारणा केली असता,पंतप्रधान नेमके कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नसल्याचे सांगत पुढील सभेत नरेंद्र मोदींना विचारेन,असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.सहकारी गेले,घर दुभंगले,पक्ष हातातून गेला,चिन्ह` गेले अशाही परिस्थितीत शरद पवार यांनी निवडणूकीच्या रणांगणात विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याची किमया साधली.सर्वाधिक महत्वाची लढत होती ती बारामतीत.
बरामतीत ‘लेक विरुद्ध सून’ असा सामना रंगला.राष्ट्रवादीत उभ्या फूटीनंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे पारडे जड राहणार की पुतणे अजित पवार बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.एकीकडे राज्य सरकारमध्ये महत्वाचे उपमुख्यमंत्री पद मिळवत डेरेदाखल झालेले अजित पवार तर दूसरीकडे महत्वाचे नेते गमावलेले शरद पवार.एकीकडे शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी पातळी न सोडता प्रचार करत अतिशय शिस्तबद्ध केलेली वाटचाल,पक्षफुटीची मिळालेली सहानुभूती तर दुसरीकडे,बारामातीमध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवल्याने अजित पवारांचे आपल्या उमेदवारांचा प्रचारसाठी कुठे ही न जाता बारामतीतच गुंतून राहणे,शरद पवार यांनी बारामती जिंकण्यासाठी दशकांचे वैर विसरुन मतदारसंघातील घराण्याशी पुन्हा प्रस्थापित केलेले संबंध,तर माढा लोकसभेतही मोहिते-पाटील घराण्याला आपल्या बाजूला वळविण्यात मिळालेले यश,अशी अनेक कारणे सुप्रिया सुळे यांच्या विजयात दडलेली आहे.

हे अपयश जिव्हारी लागल्यानेच दिल्ली येथील एनडीएच्या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारली.पक्षातील सर्व नेत्यांनी बारामतीत शक्ती पणाला लावली मात्र,सुनेत्रा पवार यांचा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव झाला.या निवडणूकीत मित्र पक्ष भाजप व शिंदे सेनेकडून अपेक्षीत मदत न मिळाल्याचे खापर फोडण्यात आले.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा आरोप केला.
बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर २०१४ मध्ये भाजपने महादेव जानकरांच्या रुपाने आव्हान उभे केले त्यावेळी ५८.८१ टक्के मतदान झाले होते.त्यावेळी मागील निवडणूकीपेक्षा १२.७४ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली होती.२०१९ मध्येही मतदान वाढून ते ६१.८२ टक्क्यांपर्यंत पोहोचले.यावेळी मात्र ‘पवार विरुद्ध पवार’अशी थेट लढत होती.काका-पुतण्याच्या संघर्षात दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.मी साठीच्या पुढे गेलो,आम्हाला कधीतरी संधी आहे की नाही?८० च्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायची असते,मी साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती की नाही?असा थेट सवाल अजित पवारांनी ५ मे रोजी शिरुरच्या प्रचारसभेत केला.यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना संधी दिली,शरद पवारांनी मला संधी दिली.मी काम दाखविले.म्हणून मला बारामतीकर निवडून देतात.साहेबांचा पुतण्या म्हणून मला मते मिळतात का?असा सवाल ही अजित पवारांनी केला.बारामतीत या निवडणूकीत ५९.५० टक्के मतदान झाले.त्यात दौंड ६०.२९,इंदापूर ६७.१२,बारामती ६९.४८,खडकवासला ५१.५५,पुरंदर ५३.९६ तसेच भोर मधून ६०.११ टक्के मतदान झाले.विकासकामे की सहानुभूती हे प्रभावी मुद्दे या मतदारसंघात होते.
अजित पवारांचे साहेबांवर प्रेम आहे पण या वयात साहेबांना सोडायला नको होते,असा सवाल अनेकजण मला करतात,मात्र,मी साहेबांना सोडत नव्हतो.तुम्ही घरी बसा.तब्येती सांभाळ,मार्गदर्शन करा,कोठे चुकले, तर कान धरा,कोठे सुचवायचे असेल तर सूचवा,३० ते ३२ वर्ष ऐकत आलो,तुम्ही म्हणाल ते केले.२००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी सोडली.यावर त्यानंतर २०१४ मध्ये भाजपसोबत जायचे ठरले.तुम्ही सांगाल तसेच वागलो,आम्ही हू की चू केली नाही,अशा शब्दात पवारांचा शब्द खाली पडू दिला नसल्याचे अजित पवार म्हणाले.
दूसरीकडे भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी,’बारामतीत शरद पवारांचा पराभव करणे हे भाजपचे उद्दिष्ठ आहे’,असे विधान केले.यावर शरद पवार हे बारामतीत उमेदवार नाहीत,त्यामुळे साहेबांचा पराभाव करण्याचा प्रश्नच उद् भवत नाही अशी सारवासारव अजित पवारांना करावी लागली.
माढा लोकसभा मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ऐवजी महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने पंढरपूरमधील श्री विठ्ठल सहकारी सारख कारखान्याला जप्तीच्या कारवाईपासून मोठा दिलासा मिळाला.राज्य सरकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरुन य कारखान्यावर जप्तीची कारवाईसाठी पुढाकार घेतला होता.माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह-नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवले होते.मोहिते पाटीले यांना या कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठींबा जाहीर केला होता.या पार्श्वभूमीवर शिखर बँकेने ४०० कोटींच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांची गोदामे सील केली.त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर अडकून पडली.मात्र, अभिजित पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेऊन माढा व सोलापूरच्या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा जाहीर करताच,जप्तीची कारवाई टळली.
वरील उदाहरण हे देश आणि महाराष्ट्राचे राजकारण ज्या स्तरावर पोहोचले आहे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.लोकशाही आणि मतदारांची क्रूर थट्टा करणारे राजकारण महाराष्ट्राच्या सुजाण मतदारांनी धुडकावून लावीत युतीच्या उमेदवारांचा पराभव केला.
पाच वर्षांपूर्वी सातारा येथे सभा घेताना शरद पवार पावसात भिजले आणि ते दृष्य बघून मतदारांच्या काळजात कळ उठली,परिणामी,उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला.हाच अनुभव लोकसभेत यंदा ११ मे रोजी चाकणच्या सभेत अजित पवारांना आला.अजित पवारांसह आढळराव पाटील ही भिजले मात्र,मतदार राजाच्या मनात ओल निर्माण झाली नाही.बारामतीच्या लढयाला ते कौटूंबिक नव्हे तर राजकीयच मानत राहीले.बारामतीत २ मार्च रोजी पार पडलेल्या ‘नमो राेजगार’मेळाव्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले.सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांचा फौजफाटा होता.शरद पवार व्यासपीठावर येताच तरुणांनी एकच जल्लोष केला.हात उंचावून अभिवादन केल्यानंतर व भाषणाला उभे राहील्यानंतरही त्यांना उपस्थितांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत राहीला.शिंदे यांनी विकासाच्या बाबतीत ‘बारामती मॉडेलचे’कौतूक केले.विकासकामांसाठी हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही दिली तर शरद पवार यांनीही विकास आणि राेजगाराच्या बाबतीत माझी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहका-यांना साथ राहील,अशी ग्वाही दिली.
बारामतीच्या निवडणूकीसाठी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाच दम देताना,मी किवा साहेब या निवडणूकीत उभे नाहीत,आतापर्यंत मी आणि तुम्ही साहेबांचा शब्द अंतिम मानला.या निवडणूकीत सून आणि लेक उभी आहे.सून घरची लक्ष्मी असते.४० वर्षांपूर्वी घरात आलेल्या सूनेला मतदान करायचे,का मुलीला मतदान करायचे,हे तुम्ही ठरवा.सध्याच्या खासदारापेक्षा उजवे काम सुनेत्रा पवारांचे असेल,विकासाची जबाबदारी माझी असेल,कार्यकर्त्यांना न मागता पदे दिली,प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला.तरीही त्यांनी निवडणूकीत दगाफटका केल्यास माझ्या घराची पायरी चढायची नाही,गाठ माझ्याशी आहे’असा सज्जड दमच कार्यकर्त्यांना देण्यात आला होता.
सध्याच्या खासदाराची पंधरा वर्षे आणि आमच्या उमेदवाराला निवडून दिले,तर पुढची पाच वर्षे याची तुलना केल्यास आमची पाच वर्षे उजवी असतील.सध्याच्या खासदाराने पंधरा वर्ष काय केले?याचा विचार करण्याचा सल्ला अजित पवारांनी बारामतीकरांना दिला होता.आमच्या उमेदवारांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी गाव पहिले आणले.विद्या प्रतिष्ठानाचे कामही पाहिले.टेक्सटाईल पार्कमध्ये पाच हजार महिला काम करीत आहेत.सध्याच्या खासदाराला १५ वर्ष झाली पण तुम्हाला काहीच मिळाले नाही.बारामतीचा चेहरा-मोहरा मी बदलला आहे.मला विकास करायचा अनुभव आहे.लोकांचे प्रश्न सोडवण्याची आवड आहे.आमचा फायदा उठवायचा असेल तर साथ द्या,असे आवाहन अजित पवारांनी केले.
मला अनेकांनी सांगितले की मी केलेली कामे सुळे यांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध केली.मागच्या २०१९ च्या निवडणूकीत भोर,वेल्हे भागात एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लाऊ असे आश्वासन सुळे यांनी दिले होते.पण प्रत्यक्षात काहीच केले नाही.माझ्यासारख्याला तर लाज वाटली असती,कोणत्या तोंडाने मत मागायला जाऊ?मी सकाळी पासून रात्री पर्यंत भाषणे करु शकतो मात्र,केवळ भाषणाने लोकांचे पोट भरत नाही.असा निशाणाही सुळेंवर साधण्यात आला.
आजपर्यंत तुम्ही माझ्यावर माझ्या वडीलांवर बोलला तोपर्यंत ऐकून घेतलं.मात्र,तुम्ही माझी आई किवा रोहित पवार यांची आई यांच्याबाबत बोलाल तर करारा जबाब देईन,असा इशारा सुळे यांनी अजित पवारांना दिला होता.आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही किवा बोलू शकत नाही असे नाही.नात्यांचे वाभाडे मी तरी निघू देणार नाही.बारामतीत महाविकासआघाडीच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यात सुळे यांनी हा इशारा दिला.यावेळी पवार कुटूंबातील प्रतिभा पवार,सुनंदा पवार,शर्मिला पवार,शुभांगी पवार,रोहित पवार,रेवती सुळे उपस्थित होत्या तर,आम्ही सून म्हणून पवार कुटूंबात आलो पण सुप्रिया सुळे जन्माने पवार आहेत.त्यांचं रक्ताचं नातं असून त्यांचा ओरिजनल डीएनए पवारांचाच आहे आणि मी कधीही नणदेची जागा घेणार नाही,असे शर्मिला पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या मोठ्या पक्षाला माझ्याविरुद्ध उमेदवारच मिळाला नाही.
आमच्याच कुटुंबातील एका माऊलीला माझ्या विरुद्ध उभे केले.वार करायचा असेल तर समोरुन करा,कुटूंब फोडून कशाला वार करता?असा सवाल सुळे यांनी केला.
आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो.४० वर्ष झाली तरी सुनेत्रा बाहेरचीच?किती वर्ष झाल्यावर घरची म्हणणार?चार दिवस सासूचे संपले आहेत आता चार दिवस सुनेचे येऊ द्या,कायम सासू-सासू असे म्हटल्यावर सुनेने कायम बाहेरची-बाहेरची म्हणत बसायचे का?असा प्रश्न अजित पवारांनी १६ एिप्रल रोजी प्रचारादरम्यान केला.
प्रचाराच्या या रणधुमाळीत मात्र शरद पवारांचा बारामतीकरांवरील विश्वास अडीग होता.बारामतीच्या निवडणूकीची उत्सुकता अमेरिकेतसुद्धा आहे.तुमच्या निर्णयाचे महत्व महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या लोकांनाही आहे.कोणी,काही म्हणो,देशाची सत्ता कुणाच्याही ताब्यात असो.जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही.तुमचा निर्णय बारामतीच्या व महाराष्ट्राच्या हिताचा होईल अशी मला खात्री आहे.असा निर्धार शरद पवार यांनी ५ मे रोजी व्यक्त केला होता.लोकांना आश्वासने द्यायची आणि प्रत्यक्षात कुटनीती खेळायची,ही मोदींची नीती आहे.सत्तेचा उन्माद काय असतो हे झारखंड,दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आणि पश्चिम बंगालच्या मंत्र्यांना ऐन निवडणूकीत तुरुंगात टाकून मोदींनी दाखवून दिला आहे.लोकशाही ही लोकांसाठी असते.प्रत्यक्षात लोकशाही उधवस्त करण्याचे काम सुरु असून, लोकशाही संपविण्यास निघालेल्या उन्मादी सरकारला उलथवून टाकण्याची आपली जबाबदारी असल्याचे आवाहन शरद पवारांनी केले.
हाय वोल्टेज बारामतीच्या लढतीत ‘लेक विरुद्ध सूनेपेक्षा’ ही लढत ‘मोदी विरुद्ध शरद पवारांचीच ’झाली,यात दुमत नाही.भाजप हा मग्रूर पक्ष आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध राहूल गांधी अशी नसून स्थानिक प्रश्नांची आहे.पण बारामतीत ही लढाई घरगुती झाल्याचे शरद पवार म्हणाले.सुप्रिया ही माझी मुलगी आहे.तिने संसदेत जोरदार कामगिरी केली आहे.देशातील तीन पहील्या खासदारांमध्ये सुळे यांचे नाव आहे.तिची संसदेतील उपस्थिती ९० टक्क्याहून जास्त आहे.भाजप व स्थानिक नेत्यांची मग्रुरी मोडण्यासाठी सुप्रियाला साथ देण्याचे आवाहन शरद पवारांनी केले.
माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातो.लोकांच्या हिताची जपवणुक करणे माझे काम आहे.मला बारामतीकरांनी आमदार,मंत्री,चार वेळा मुख्यमंत्री केले.संरक्षण,कृषिमंत्री केले.या काळात मी एक दिवस ही सुटी घेतली नाही.५६ वर्षे मी कार्यरत आहे.शेतात काम करणा-या बैलालाही शेतकरी सुटी देतो,मग मला ५६ वर्षात एकदाही सुटी दिली नाही,हे वागणे बरे नव्हे,अशी मिश्किल टिकाही त्यांनी केली.
एका मेळाव्यात तर महायुतीतील घटक पक्षांसाठी वेगवेगळी गाणी लावण्यात आली.त्यात अचानक ‘कितीही लावा ईडी-फडी,पण आमचा दादा आहे रुबाबदार‘हे गाणे वाजले.मंचावरील नेत्यांच्या हे लक्षात येताच ते तत्काळ बंद करण्यात आले.मेळाव्यातील हूशार मतदारांना मात्र अनावधानाने का होईना, योग्य संदेश पोहोचला होता.९ मे च्या भाषणात अजित पवार यांनी ‘मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर?’अशी व्यथा व्यक्त केली.मात्र,मुलगा नसले आणि पुतणे असले तरी सत्तेच्या वाट्यात अजित पवारांना कुठेही कमी पडू दिले गेले नाही हे बारामतीकरांना माहिती होते.स्वत:अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवर यांनी देखील शरद पवारांची साथ दिली.
निवडणूक,प्रचार,मतदान आणि निकालाचे सर्व टप्पे संपले आहेत.बारामतीत नि:संदिग्धरित्या बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मत टाकले. पर्यायाने नरेंद्र मोदींच्या विरोधात ते मत होते यात शंका नाही.आता सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्यात आले असून.आजपर्यंत प्रतिष्ठेने सामाजिक कार्य सांभाळणा-या या सुनेला,राजकारणात उतरविण्याचा अट्टहास अनेकांच्या गळी उतरला नसल्याची टिका सोशल मिडीयावर पहायला मिळते.
राज्यसभेत निर्विरोध निवडून गेलेल्या सुनेत्रा पवारांना आता मोदी सरकारमध्ये मंत्री करण्याच्या हालचाली सुरु आहे.मात्र,महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाचा कौल कळून देखील अजित पवारांची ही तडफड अनेकांच्या समजण्या पलीकडची आहे.‘याला राजकारण असे नाव’म्हणत असले तरी प्रत्येक कृतीसाठी अखेर राजकारण्यांना मतदारांच्याच दरबारात जावे लागते आणि हीच लोकशाहीची थोरवी आहे,अजित दादा कधी मान्य करतील?
………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
