

खान कुटूंबियांवर काळाचा आघात
नादुरुस्त इको स्पोर्ट फोर्ड कार इंटरलॉक झाल्याने गुदमरुन मृत्यू पावल्याचा पोलिसांचा अंदाज
नागपूर,ता.१८ जून २०२३: पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल शनिवार दुपारपासून हरवलेले तिन्ही चिमुकल्या भावंडांचे अखेर आज सायंकाळच्या सुमारास घराजवळील मॅकेनिकने दुरुस्त करुन ठेवलेल्या इको स्पोर्ट फोर्ड कारमध्ये कलेवरच सापडले व खान कुटूंबियावर दू:खाचा डोंगर कोसळला.आलिया फिरोजखान व आफरीन ईरशाद खान या ६ वर्षीय दोघी जुळ्या बहीणी तर त्यांचा ४ वर्षीय लहान भाऊ तौफिक अशी या तिन्ही चिमुकल्यांची नावे आहेत.
काल शनिवार दिनांक १७ मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही तिन्ही भावंडे नेहमीसारखीच घराजवळील वस्ती खंतेनगर येथील पिवळ्या शाळेच्या मैदानावर खेळायला गेली होती,असे त्यांचे वडील फिरोज खान भुग्गाखान यांनी पाचपावली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते.
काल दूपारपासून खान कुटूंबिय व त्यांच्या नातेवाईकांनी युद्ध पातळीवर या चिमुकल्यांचा शोध चालवला होता.एकाच घरातील,कुटूंबातील तीन-तीन चिमुरडे हे बेपत्ता झाल्यामुळे खान कुटूंबियांचा जीव टांगणीला लागला होता.पोलिसांनी देखील या तिन्ही भावंडांच्या शोधात संपूर्ण शहर पिंजून काढले होते.या मुलांच्या घरा शेजारीच एक कार मेकॅनिक राहतो.त्याच्याकडे एक इको स्पोर्ट फोर्ड कंपनीची कार दुरुस्तीला आली होती.त्याने कार दुरुस्त करुन घराच्या बाजूलाच पार्क करुन ठेवली होती.
ही मुले खेळता खेळता कारमध्ये शिरली असावी आणि इंटरलॉक होऊन ती आतमध्येच अडकून गुदमरुन मृत्यू पावली असावी,असा कयास लावला जात आहे.
पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.




आमचे चॅनल subscribe करा
