फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअंभोरा:केबल स्टे पूलावर पर्यटकांची तूफान गर्दी(भाग-२)

अंभोरा:केबल स्टे पूलावर पर्यटकांची तूफान गर्दी(भाग-२)

Advertisements

 ‘मिनी गोवाचा’मिळतो अनुभव
‘सत्ताधीश‘ऑन द स्पॉट
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २ ऑगस्ट २०२४: विदर्भातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक असलेल्या अंभोराच्या विकासासाठी राज्य शासनाने २४९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.त्याच बरोबर अंभोरा येथील पर्यटन विकासाला गती देणारा आणि भंडारा,गोंदिया येथील नागरिकांना अंभोरा येथे येण्यासाठीचा प्रवास सुखकर करणारा केबल स्टे पूल तयार झाला आहे.नुकतेच १३ जानेवरी रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पूलाचे उद् घाटन झाले.
२२ मीटर खोल पाण्यात काम करुन एकूण पाच पिल्लरवर हा पूल उभारण्यात आला असून पूल तयार होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला असल्याचे पूलाची निर्मिती करणा-या ‘टी ॲण्ड टी’कंपनीचे पदाधिकारी यांनी खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना सांगितले.या पूलाच्या बांधकामाला १७६ कोटी रुपयांचा खर्च आला.दोन पिल्लरमध्ये १४० मीटरचे अंतर आहे.
नागपूरवरुन पाचगाव,डोंगरगाव,कुही,वेलतूर मार्गे ८० किलोमीटर आणि भंडा-यावरुन १८ किलोमीटर अंतरावर अंभो-याचे देवस्थान आहे.वैनगंगा,कन्हान,आंब,मुर्जा आणि कोलारी या पाच नद्यांचे संगम अंभोरात झाले आहे.अंभोराचा निसर्गरम्य परिसर उंचावरुन बघता यावे यासाठी नदीत ४० फूट उंचावर हा केबल स्टे पूल उभारण्यात आला आहे.पर्यटकांच्या सुविधेसाठी यावर छतही तयार करण्यात आले असून या पुलाचे सौंदर्यीकरण आणखी वाढवण्यासाठी त्यावर खास विद्युतीकरण करण्यात आले आहे.

 

या पुलाची रुंदी १५.२८० एवढी असून ७००.२ एवढी लांबी आहे.साढे सात मीटर कॅरेज वे आहे.३.३ मीटरचा वॉक वे आहे.१५० पर्यटकांची क्षमता असणारी Viewing गॅलरी आहे.पुलाच्या दोन्ही बाजूला टफन ग्लास कॅपसिटी १ स्के.मी.असून याचे वजन ५०० किलो एवढे असल्याची माहिती ‘टी ॲण्ड टी‘कंपनीचे कर्मचारी अजिंक्य कुंभारे यांनी दिली.

 

Viewing गॅलरी ही पूलाच्या मधोमध असून या गॅलरीतून पाच नद्यांच्या संगमाचे विहंगम दृष्य पर्यटक टिपताना आढळतात.नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी असा नजारा दिसतो.त्यात हिरवेगार डोंगर,त्याचे सौंदर्य आणखी खुलवताना दिसून पडतात.
‘टी ॲण्ड टी’ कंपनीने या पूर्वी महाबळेश्‍वर आणि नांदेडमध्ये विष्णुपुरी गावामध्ये अशाच प्रकारचा  केबल स्टे पूल उभारला आहे.महाबळेश्‍वरच्या दरीमध्ये असाच प्रकारचा पूल उभारुन अशाच प्रकारच्या आरस्पानी दिसणा-या काचेच्या गॅलरी व्यूहची रचना केली आहे.महाबळेश्‍वराच्या दरीमध्ये ४० मीटर अलीकडे व ४० मीटर पलीकडे असा तो केबल स्टे पूल आहे.याशिवाय कोयनाच्या बॅक वॉटरवर देखील या कंपनीने असाच पूल निर्मित केला आहे .परभणीच्या येल्लारी या ठिकाणी देखील अश्‍याच प्रकारच्या पूलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र,अंभोरा येथील नदीच्या आत निर्माण करण्यात आलेल्या पूलाची लांबी ही सर्वाधिक असल्याचे कंपनीचे कर्मचारी अंजिक्य कुंभारे सांगतात.

केवळ ४० फूट उंच Viewing गॅलरीतूनच पर्यटक अंभाेराचा वेड लावणारा निसर्ग टिपत नाही तर नदीवरील या पूलावर आपापली वाहने थांबवून सभोवतालचा अतिशय सुंदर नजारा आपापल्या मोबाईलमध्ये टिपताना आढळून येतात.‘रिल’चा मोह तरुणाईला आवरता येणे अशक्य आहे,रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.

खालून वाहणारी शांत नदी,समुद्रासारखी कोणतीही खळखळ नाही,त्यात लखलखणा-या विद्युत रोषणाईचे प्रतिबिंब,अंभोरा या ठिकाणाला ‘गोवा’च्या समुद्र किना-यापेक्षाही अधिक सुंदरतेचे वैभव प्राप्त करुन देते.

Viewing गॅलरीतून सभोवतालचा नजारा काचेतून घ्यायचा असल्यास प्रत्येकी ५० रुपये तिकीट असून खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ‘टी ॲण्ड टी’कंपनीचे कर्मचारी सांगतात.

या पूलाच्या निर्मितीमुळे भंडारापासून अंभोरापर्यंचा ८० किलोमीटरचा फेरा वाचला असून वेळ आणि पैशांची बचत झाली असल्याचे भंडा-यातून आलेल्या अनेक पर्यटकांनी ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.

या पुढील टप्पा आता अंभो-यातील तीर्थस्थळावरील पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्वारातून साधण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभाग व विदर्भ विकास मंडळातर्फे अंभो-याच्या सौंदर्यीकरणावर २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.येत्या दोन वर्षात अंभोराचा कायापलट होणार असून,ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात चढता यावे यासाठी लिफ्ट,सभागृह,मोठे किचन शेड,भाेजनाची व्यवस्था,व्हीआयपी गेस्ट हाऊस,शौचालयांची निर्मिती,नदीच्या किना-यांचे सौंदर्यीकरण,अस्थी विसर्जनासाठी येणा-यांसाठी सुविधा,आठ एकरमध्ये पार्कींग,१० एकरमध्ये पर्यटकांसाठी उद्यानाची निर्मिती,ओपर एअर थेटर,महादेवाचा भव्य पुतळा,प्रेक्षक गॅलरी इत्यादी अशा सुविधा सार्वजनिक बांधकाम विभाग निर्मित करणार असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता प्रगती माटे देतात.
थोडक्यात,नागपूर जिल्ह्यातील अंभोरा हे ठिकाण येत्या काही काळात विदर्भातील महत्वाच्या तीर्थस्थळासोबतच सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याच्या मार्गावर असून, या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे.
……………………………………
(समाप्त)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या